YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 17

17
1कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा
शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे.
2सुज्ञ गुलाम आपल्या धन्याच्या लज्जास्पद मुलावर सत्ता गाजवील,
आणि कुटुंब सभासदाप्रमाणे मालमत्तेत वाटा मिळवील.
3चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते,
परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात.
4दुष्ट व्यक्ती फसवणूक करणार्‍याचे भाषण ऐकतो;
लबाड बोलणारा मनुष्य विनाशकारी जिभेचे लक्ष देऊन ऐकतो.
5जो गरिबांची चेष्टा करतो, तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अनादर करतो;
जो दुसर्‍यांवर आलेल्या संकटामध्ये आनंद करतो, त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
6वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत;
आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत.
7वक्तृत्वपूर्ण भाषण देवहीन मूर्खाला शोभत नाही—
राजाने खोटे बोलणे कितीतरी अशोभनीय आहे!
8लाच देणार्‍या माणसासाठी ती जादूच्या रत्नासारखी आहे;
त्यांना वाटते की त्याने त्यांची कामे यशस्वी होतील.
9जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो;
परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात.
10मूर्खाला मारलेल्या शंभर फटक्यांपेक्षा
विवेकी मनुष्याला रागावून बोललेला एक शब्द अधिक प्रभावी असतो.
11वाईट कृत्ये करणारे परमेश्वराविरुद्ध बंडखोरी वाढवितात;
मृत्यूचा दूत त्यांच्याकडे पाठविण्यात येईल.
12जिची पिल्ले पळवून नेली आहेत त्या अस्वलीची तिची भेट झालेली चालेल,
परंतु मूर्खपणाचा अट्टाहास करणाऱ्या मूर्खाची भेट नको.
13जो चांगल्याची फेड वाईटाने करतो,
त्याच्या घराला अरिष्ट कधीही सोडणार नाही.
14भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे;
म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे.
15दोषी व्यक्तीला निर्दोष ठरविणे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविणे—
अशा दोन्हीचा याहवेह तिरस्कार करतात.
16जर ते समजू शकत नाहीत
तर ज्ञानवर्धनासाठी मूर्खाच्या हातात पैसे का असावेत?
17खरा मित्र नेहमीच प्रेम करतो;
आणि संकटसमयासाठीच भावाचा जन्म झालेला असतो.
18जो हस्तांदोलन करून शपथ घेऊन शेजार्‍याच्या कर्जफेडीची हमी घेतो,
तो विवेकहीन मनुष्य आहे.
19जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो;
जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो.
20ज्याचे हृदय भ्रष्ट आहे त्याची समृद्धी होत नाही;
ज्याची जीभ विकृत भाषण करते, तो संकटात पडतो.
21जो मूर्खाला जन्म देतो तो दुःखाला पाचारण करतो,
आणि देवहीन मूर्खाच्या पालकांना आनंद मिळत नाही.
22आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते,
पण खिन्न मन हाडे शुष्क करते.
23न्यायाचे पारडे फिरविण्यासाठी,
दुष्ट मनुष्य गुप्त रीतीने लाच घेतो.
24समंजस मनुष्याची दृष्टी ज्ञानावर केंद्रित असते,
पण मूर्खाची नजर पृथ्वीच्या शेवटपर्यंत सैरभैर फिरत असते.
25मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो,
आणि ज्या आईने त्याला जन्म दिला तिला क्लेश देतो.
26निर्दोषांना दंड देणे योग्य नव्हे,
तसेच प्रामाणिक अधिपतींना शिक्षा करणे हे निश्चितच चुकीचे आहे.
27ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो,
आणि समंजस शांत स्वभावाचा असतो.
28जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात,
आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात.

सध्या निवडलेले:

नीतिसूत्रे 17: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन

YouVersion तुमच्या अनुभवाला वैयक्तिकृत करण्यासाठी कुकीज वापरते. आमची वेबसाइट वापरून, तुम्ही आमच्या कुकीजचा वापर करता आमच्या गोपनीयता धोरणात वर्णन केल्याप्रमाणे