नीतिसूत्रे 17:1-14
नीतिसूत्रे 17:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एखाद्या घरात पूर्ण मेजवानीची मुबलकता असून त्यामध्ये संघर्ष असला तर त्यापेक्षा कोरड्या भाकरीचा तुकडा शांतीने खाणे उत्तम आहे. शहाणा सेवक लज्जास्पद वागणाऱ्या मुलावर अधिकार चालवीन आणि एका भावाप्रमाणे वतनाचा भागीदार होईल. चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय शुध्द करतो. जो मनुष्य वाईट करतो तो दुष्ट वाणीला कान देऊन ऐकतो; जे वाईट गोष्टी सांगतात ते लबाड लक्ष देऊन ऐकतो. जो कोणी गरीबांची थट्टा करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो, आणि जो दुसऱ्याच्या आपत्तीने आनंदित होतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत, आणि आईवडील आपल्या मुलांस वैभव आणतात. उत्कृष्ट बोलणे मूर्खास शोभत नाही; तसेच राज्यकर्त्याला खोटे ओठ किती तरी कमी शोभतात. लाच देणाऱ्याच्या दृष्टीने ती जादूच्या खड्यांसारखी आहे; जिकडे तो वळतो तिकडे तो यशस्वी होतो. जो कोणी एखाद्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करतो तो प्रेम शोधतो, पण जो कोणी गत गोष्टी घोकत बसतो तो जवळच्या मित्रास अंतरतो. मूर्खाच्या मनात शंभर फटके ठसतात, यापेक्षा निषेध बुद्धिमान मनुष्याच्या मनावर अधिक खोलवर ठसतो. वाईट मनुष्य केवळ बंड करायचे शोधतो, म्हणून क्रूर निरोपे त्याच्याविरुध्द पाठवण्यात येईल. मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची भेट होण्यापेक्षा जिचे पिल्ले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली बरी. जो कोणी बऱ्याची फेड वाईटाने करील, त्याच्या घरातून वाईट कधी जाणार नाही. कोणीतरी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, तसे भांडणाला सुरवात होण्यासारखे आहे, म्हणून भांडण होण्यापूर्वीच त्यापासून दूर निघून जा.
नीतिसूत्रे 17:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे. सुज्ञ गुलाम आपल्या धन्याच्या लज्जास्पद मुलावर सत्ता गाजवील, आणि कुटुंब सभासदाप्रमाणे मालमत्तेत वाटा मिळवील. चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात. दुष्ट व्यक्ती फसवणूक करणार्याचे भाषण ऐकतो; लबाड बोलणारा मनुष्य विनाशकारी जिभेचे लक्ष देऊन ऐकतो. जो गरिबांची चेष्टा करतो, तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अनादर करतो; जो दुसर्यांवर आलेल्या संकटामध्ये आनंद करतो, त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत; आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत. वक्तृत्वपूर्ण भाषण देवहीन मूर्खाला शोभत नाही— राजाने खोटे बोलणे कितीतरी अशोभनीय आहे! लाच देणार्या माणसासाठी ती जादूच्या रत्नासारखी आहे; त्यांना वाटते की त्याने त्यांची कामे यशस्वी होतील. जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो; परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात. मूर्खाला मारलेल्या शंभर फटक्यांपेक्षा विवेकी मनुष्याला रागावून बोललेला एक शब्द अधिक प्रभावी असतो. वाईट कृत्ये करणारे परमेश्वराविरुद्ध बंडखोरी वाढवितात; मृत्यूचा दूत त्यांच्याकडे पाठविण्यात येईल. जिची पिल्ले पळवून नेली आहेत त्या अस्वलीची तिची भेट झालेली चालेल, परंतु मूर्खपणाचा अट्टाहास करणाऱ्या मूर्खाची भेट नको. जो चांगल्याची फेड वाईटाने करतो, त्याच्या घराला अरिष्ट कधीही सोडणार नाही. भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे; म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे.
नीतिसूत्रे 17:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा. शहाणा सेवक लज्जा आणणार्या मुलावर हुकमत चालवील, व भाऊबंदांच्या वतनाचा विभागी होईल. रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखतो. दुष्कर्मी मनुष्य दुष्ट वाणी लक्ष देऊन ऐकतो; लबाड मनुष्य उपद्रवी जिव्हेला कान देतो. जो गरिबाची कुचेष्टा करतो तो त्याला उत्पन्न करणार्याचा अवमान करतो; जो दुसर्याच्या विपत्तीमुळे आनंद पावतो त्याला शिक्षा चुकणार नाही; पुत्रपौत्र वृद्धांचा मुकुट होत; मुलांची शोभा त्यांचे वडील होत; उत्कृष्ट बोलणे मूर्खाला शोभत नाही; मग खोटे बोलणे सरदारास कसे शोभेल? घेणार्याच्या दृष्टीने लाच रत्नासारखी मोलवान आहे; ज्या ज्या कामाकडे तो वळतो ते ते तो चातुर्याने करतो. जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो; पण जो गत गोष्टी घोकत बसतो त्याला मित्र अंतरतात. वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत. फितुरी मनुष्य केवळ बंड करू पाहतो, म्हणून त्याच्याकडे निर्दय जासूद पाठवण्यात येईल. जिची पिले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली पुरवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो. जो बर्याची फेड वाइटाने करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही. कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.