नीतिसूत्रे 16:17-33
नीतिसूत्रे 16:17-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळांचा धोपट मार्ग होय; जो आपला मार्ग धरून राहतो तो आपला जीव राखतो. गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे. जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते; जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात. मधुर वाणीने शिक्षणाचा संस्कार अधिक होतो. ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झर्याप्रमाणे होय. पण मूर्खांची मूर्खता हीच त्यांचे शासन होय. ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते. ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात. मजुराची क्षुधा त्याच्या हातून मजुरी करवते, कारण त्याचे तोंड त्याला ती करायला लावते. अधम कुयुक्ती उकरून काढतो; त्याच्या वाणीत जशी काय जळती आग असते. कुटिल मनुष्य वैमनस्य पसरतो; कानास लागणारा मोठ्या स्नेह्यांत फूट पाडतो. उद्दाम मनुष्य आपल्या शेजार्याला भुलथाप देऊन कुमार्गास लावतो. कुटिल कल्पना योजण्याला जो डोळे मिचकावतो व ओठ चावतो तो दुष्कर्म घडवून आणतो. पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; नीतिमत्तेच्या मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो; ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणार्यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणार्यापेक्षा श्रेष्ठ होय. पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.
नीतिसूत्रे 16:17-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुष्कर्मापासून वळणे हा सरळांचा राजमार्ग आहे, जो आपल्या मार्गाकडे लक्ष ठेवतो तो आपला जीव राखतो. नाशापूर्वी गर्व येतो, आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर विनम्र असणे चांगले. जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो, त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो, आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो. जो मनाचा सुज्ञ त्यास समंजस म्हणतात, आणि मधुर वाणीने शिकवण्यची क्षमता वाढते. ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे, पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे. सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; आणि त्याच्या वाणीत विद्येची भर घालते. आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत, ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत. मनुष्यास एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याचा शेवट मृत्यूमार्गाकडे आहे. कामगाराची भूक त्याच्यासाठी काम करते; त्याची भूक त्यास ते करायला लावते. नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो, आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे. कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो, आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो. जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो, आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो. जो कोणी मनुष्य कुटिल गोष्टीच्या योजणेला डोळे मिचकावतो; जो आपले ओठ आवळून धरतो तो दुष्कर्म घडून आणतो. पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो. ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा, आणि जो आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे. पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून आहे.
नीतिसूत्रे 16:17-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सुज्ञांचा मार्ग दुष्टाईला टाळतो; जे त्यांच्या मार्गांचे रक्षण करतात, त्यांचे आयुष्य सुरक्षित राहते. नाशापूर्वी गर्व आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे. जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते, आणि जो याहवेहवर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित असतो. सुज्ञ अंतःकरण समंजस म्हणून ओळखले जाते, आणि मधुर वचनांनी शिक्षणाला प्रोत्साहन मिळते. सुज्ञाला सुज्ञता हा जीवनाचा झरा आहे; पण मूर्खाची मूर्खताच त्यांच्यावर शिक्षा आणते. शहाण्याचे मन त्याच्या मुखावर ताबा ठेवते, आणि त्याचे ओठ ज्ञान प्रसार करते. मधुर शब्द मधाच्या पोळासारखे असतात; ते आत्म्याला गोड वाटतात आणि हाडांना आरोग्य देतात. एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो. परिश्रम करणार्यांना भूक लागणे योग्य; भूक भागविण्यासाठी त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते. अधम वाईट योजना करतो, आणि त्यांच्या ओठांवर ती होरपळणाऱ्या अग्नीसारखी असते. विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते. हिंसा करणारा आपल्या शेजार्याला मोहात पाडतो आणि त्याला कुमार्गावर जाण्यास प्रेरित करतो. जो कोणी त्याचे डोळे मिचकावतो तो विकृत योजना करीत असतो; जो कोणी त्याचे ओठ चावतो, तो वाईट प्रवृत्तीचा आहे. पांढरे केस गौरवी मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गात चालल्याने तो लाभतो. योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे, शहर जिंकून घेणार्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम. आपण पदरात नाणेफेक करतो, पण त्याचा प्रत्येक निर्णय याहवेहच्या हाती असतो.