नीतिसूत्रे 13:13-25
नीतिसूत्रे 13:13-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
वचन तुच्छ मानणारा स्वत:वर अनर्थ आणतो, पण आज्ञेचा धाक बाळगणार्यास चांगले प्रतिफळ मिळते. सुज्ञाचा बोध जीवनाचा झरा आहे, तो मृत्युपाश चुकवतो. समंजसपणाने कृपा संपादता येते, पण कपटी इसमांचा मार्ग खडतर असतो. प्रत्येक शहाणा मनुष्य अकलेने काम करतो, पण मूर्ख मनुष्य मूर्खतेचा पसारा मांडतो. दुष्ट जासूद संकटांत पडतो; पण विश्वासू वकील एक औषधी आहे. बोधाचा अव्हेर करणार्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो. इच्छातृप्ती जिवाला गोड वाटते, पण वाईट सोडून देण्याचा मूर्खाला वीट आहे. सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो. पाप्यांच्या पाठीस अरिष्ट लागते, पण नीतिमानांस कल्याणरूप प्रतिफळ मिळते. चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांना वतन ठेवतो, पण पाप्यांचे धन नीतिमानासाठी साठवलेले असते. गरिबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते; तरी अन्यायामुळे कित्येकांचा नाशही होतो. जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याच्यावर प्रीती करणारा होय. नीतिमान पोटभर जेवतो, परंतु दुर्जनांचे पोट रिते राहते.
नीतिसूत्रे 13:13-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो, पण जो कोणी आज्ञेचा आदर करतो त्यास प्रतिफळ मिळेल. सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे, ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल. सुबोध अनुग्रह मिळवून देतो, पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे. शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख मनुष्य त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो. दुष्ट निरोप्या संकटात पडतो, पण विश्वासू वकील समेट घडवून आणतो. जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल, पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल. इच्छातृप्ती जिवाला गोड लागते, पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो. शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल. आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते, पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते. चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो, पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते. गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो. जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो, पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो. जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते.
नीतिसूत्रे 13:13-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो शिक्षण तुच्छ लेखतो, तो त्याचा परिणाम भोगेल, पण जो आज्ञेचा मान राखतो, त्याला चांगले प्रतिफळ मिळेल. सुज्ञ मनुष्याचा सल्ला जीवनाचा झरा आहे. तो मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवितो. उत्तम बोधामुळे अनुकूलता मिळते, परंतु विश्वासहीनांचे मार्ग त्यांना नाशाकडे नेतात. जे सर्व समंजस असतात ते सुज्ञतेने वागतात, परंतु मूर्ख माणसे त्यांचा मूर्खपणा उघड करतात. दुष्ट निरोप्या संकटात पडतो, परंतु विश्वासू राजदूत आरोग्य आणतो. जो शिक्षण नाकारतो, त्याला दारिद्र्य आणि लज्जा प्राप्त होतात, पण जो अनुशासन स्वीकारतो, त्याला सन्मान लाभेल. अभिलाषेची तृप्ती जीवाला मधुरता प्रदान करते, परंतु मूर्ख वाईटापासून वळण्याचा तिरस्कार करतात. सुज्ञ मनुष्याबरोबर मैत्री कर आणि सुज्ञ हो, कारण मूर्खांच्या सोबतीने नुकसान सहन करावे लागते. अरिष्ट पातक्यांच्या पाठीस लागते, परंतु नीतिमानांना कल्याण हे प्रतिफळ मिळेल. चांगला मनुष्य त्यांच्या नातवंडांसाठी वतन ठेवून जातो, परंतु पापी मनुष्याने साठविलेले धन नीतिमानांसाठी असते. विना नांगरलेल्या शेतातही गरिबांसाठी धान्य उत्पन्न होते; परंतु अन्याय ते हिरावून नेते. जे कोणी छडी आवरतात, ते त्यांच्या लेकरांचा द्वेष करतात, परंतु जे त्यांच्या लेकरांवर प्रेम करतात, ते त्यांना काळजीपूर्वक शिस्त लावतात. नीतिमान मनुष्य जिवाचे समाधान होईपर्यंत खातो, परंतु दुर्जनाचे पोट रिकामेच राहते.