नीतिसूत्रे 12:15-28
नीतिसूत्रे 12:15-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो. मूर्खाची तळमळ तत्काळ कळते; शहाणा आपली लाज झाकून ठेवतो. ज्याच्या तोंडून सत्याचे उद्गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्याय्यत्व प्रकट करतो. परंतु असत्य साक्षी कपट उच्चारतो. कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे. सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल; असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे. वाईट योजणार्यांच्या अंत:करणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणार्यांच्या मनात हर्ष असतो. नीतिमानाला विपत्ती येत नाही, पण दुर्जन अरिष्टांनी व्याप्त होतील. असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवतो; परंतु मूर्खाचे मन मूर्खपणाचा पुकारा करते. उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते. मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. नीतिमान आपल्या शेजार्याला मार्ग दाखवतो, पण दुर्जनांचा मार्ग लोकांना बहकावतो. आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मोलवान धन आहे. न्याय्यत्वाच्या मार्गात जीवन आहे; त्याच्या वाटेत मरण नाही.
नीतिसूत्रे 12:15-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट असतो, परंतु सुज्ञ मनुष्य सल्ला ऐकून घेतो. मूर्ख त्याचा राग लागलाच दाखवतो, पण जो दूरदर्शी आहे तो अपमानाकडे दुर्लक्ष करतो. जो कोणी खरे बोलतो तो जे काय योग्य आहे ते सांगतो, पण खोटा साक्षीदार लबाड सांगतो. कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, पण सुज्ञाची जिव्हा आरोग्य आणते. सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल, पण लबाड बोलणारी जिव्हा क्षणिक आहे. वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीचा सल्ला देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो. नीतिमानावर संकटे येत नाहीत, परंतु दुर्जनावर अडचणी येतात. खोटे बोलणाऱ्या वाणीचा परमेश्वरास वीट आहे, पण जे कोणी प्रामाणिकपणे राहणारे त्यास आनंद देतात. शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो, पण मूर्खाचे हृदय मूर्खपणा ओरडून सांगते. उद्योग्याचे हात अधिकार चालवतील, पण आळशाला गुलामासारखे राबावे लागेल. मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते, पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो. नीतिमान आपल्या मित्राला मार्ग दाखवतो, पण दुष्टाचे मार्ग त्यांना बहकावतो. आळशी आपण धरलेली शिकार भाजित नाही, पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो. न्यायीपणाच्या मार्गात जीवन सापडते, आणि त्यांच्या वाटेत मरण नाही.
नीतिसूत्रे 12:15-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मूर्खाच्या दृष्टीने त्याचाच मार्ग योग्य असतो; परंतु जो शहाणा असतो, तो सल्ला ऐकतो. मूर्ख आपला क्रोध तत्काळ दर्शवितो, परंतु सुज्ञ मनुष्य अपमानाकडे दुर्लक्ष करतो. प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो, परंतु खोटा साक्षीदार लबाड बोलतो. निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो, पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते. सत्याची वाणी काळाच्या कसोटीला उतरते; लबाड जिव्हा ही क्षणिक आहे. दुष्ट योजना करणार्यांच्या हृदयात कपट असते, पण शांतीची मसलत देणार्यांच्या हृदयात आनंद असतो. न्यायी मनुष्यावर काहीही आपत्ती येणार नाही, परंतु दुष्ट लोक आपत्तींनी व्याप्त होतात. असत्य बोलणार्या ओठांची याहवेह घृणा करतात, परंतु विश्वसनीय लोक त्यांना प्रसन्न करतात. सुज्ञ मनुष्य आपले ज्ञान प्रकट करीत नाही, परंतु मूर्खाचे हृदय मूर्खपणाचे प्रसरण करतात. उद्योगी मनुष्यांचे हात सत्ता धारण करतील, पण आळशी लोकांना गुलामगिरी प्राप्त होईल. चिंता हृदयावर दबाव आणते, परंतु कोमल शब्द ते आनंदित करते. नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो. आळशी मनुष्याला शिकार मिळत नाही, परंतु उद्योगी मनुष्याला भरपूर मिळकत प्राप्त होते. नीतिमानाचा मार्ग जीवनाकडे जातो, व त्याच मार्गामधून अमरत्व मिळते.