YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस पत्र 2:1-18

फिलिप्पैकरांस पत्र 2:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करूणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा. अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा. आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्‍यांचेहि पाहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठायी आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा; ह्यासाठी की, या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे; त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता. जीवनाच्या वचनास दृढ धरुन राहा, असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो; आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.

फिलिप्पैकरांस पत्र 2:1-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यास्तव ख्रिस्ताच्या ठायी ऐक्यता असल्यामुळे काही उत्तेजन, त्यांच्या प्रीतिचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, जर काही करुणा व कळवळा आहे, तर तुम्ही एकमेकांशी सहमत होणारे, सारखीच प्रीती करणारे आणि एका आत्म्याचे व एकमनाचे होऊन माझा आनंद परिपूर्ण करा. स्वार्थी महत्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे. तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे. ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा: ते परमेश्वराच्या स्वरूपाचे असूनही त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही व परमेश्वराच्या बरोबरीचे असणे हा लाभ त्यांनी मानला नाही; उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप घेऊन, मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले. मानवी रूप धारण करून त्यांनी स्वतःस लीन केले, येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास, आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले. म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले; यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली, परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने कबूल करावे की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहे. यास्तव, प्रिय मित्रांनो, मी तेथे तुम्हाबरोबर असताना आणि याहीपेक्षा माझ्या अनुपस्थितीत तुम्ही नेहमीच आज्ञापालन केले आहे, म्हणून तुमच्या तारणाचे कार्य भयात व कापत साधून घ्या. कारण परमेश्वर आहे की ज्यांनी आपल्या उत्तम योजनेसाठी तुमच्यामध्ये इच्छा करणे व कृती करणे हे साधले आहे. जे काही कराल ते सर्व कुरकुर व वादविवाद न करता करा, म्हणजे, “तुम्ही या दुष्ट आणि कुटील आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे” म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्‍यांप्रमाणे चमकाल. तुम्ही जीवनाचे वचन मजबूत धरून ठेवले आहे म्हणून ख्रिस्ताच्या दिवशी माझी धाव व श्रम व्यर्थ झाले नाही याचा मला अभिमान बाळगता येईल. तुमच्या विश्वासाची सेवा आणि यज्ञ यावर मी स्वतः पेयार्पण म्हणून अर्पण केला जात आहे तरी मीही तुमच्याबरोबर आनंद करेन. त्याचप्रमाणे तुम्हीही उल्हासित व्हावे आणि माझ्याबरोबर आनंद करावा.

फिलिप्पैकरांस पत्र 2:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्‍यांचेही पाहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो; तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या; कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा; ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता; असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वत: अर्पण केला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो; आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.

फिलिप्पैकरांस पत्र 2:1-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्यावरून ख्रिस्तामध्ये काही प्रोत्साहन, प्रीतीचे काही सांत्वन, पवित्र आत्म्याची काही सहभागिता, काही करुणा व सहानुभूती, ही जर आहेत. तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकात्मतेने व एकमनाने रहा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. स्वार्थी महत्त्वाकांक्षेने अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, परत स्वतःपेक्षा दुसऱ्यांना लीनतेने श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही फक्त आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा. जी मनोवृत्ती ख्रिस्त येशूच्यामध्ये होती, ती तुमच्यामध्येही असो: तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनष्यरूपात प्रकट होऊन त्याने स्वतःला नम्र केले आणि तो मरणापर्यंत आज्ञाधारक झाला, अगदी क्रुसावरील मरणापर्यंत. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने वाकला जावा; आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, असे कबूल करावे. प्रियजनहो, मी तुमच्याजवळ असता तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात. तर विशेषकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही तुम्ही आज्ञापालन करावे, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपले तारण पूर्णत्वास नेण्यासाठी भयाने थरकाप होत असतानाही श्रम करीत राहा; कारण इच्छा बाळगण्यासाठी व त्याच्या योजनेनुसार कार्य करण्यासाठी तुम्हांला सक्षम करण्याकरिता परमेश्वर तुमच्यामध्ये सतत कार्य करीत असतो. जे काही तुम्ही कराल, ते कुरकुर व वादविवादाशिवाय करा. ह्यासाठी की, ह्या दुष्ट व विकृत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची मुले व्हावे. लोकांमध्ये जीवनाचे वचन सांगताना तुम्ही जगात आकाशातील ताऱ्यांसारखे दिसावे. असे झाले, तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत, असा अभिमान बाळगण्यास मला ख्रिस्ताच्या दिवशी कारण मिळेल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ अर्पिला जात असता जरी मी स्वतः अर्पिला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुमच्या सर्वांना माझ्या आनंदात सहभागी करून घेतो. त्याचप्रमाणे तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.