YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांना 2:1-18

फिलिप्पैकरांना 2:1-18 MACLBSI

ह्यावरून ख्रिस्तामध्ये काही प्रोत्साहन, प्रीतीचे काही सांत्वन, पवित्र आत्म्याची काही सहभागिता, काही करुणा व सहानुभूती, ही जर आहेत. तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकात्मतेने व एकमनाने रहा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. स्वार्थी महत्त्वाकांक्षेने अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, परत स्वतःपेक्षा दुसऱ्यांना लीनतेने श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही फक्त आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा. जी मनोवृत्ती ख्रिस्त येशूच्यामध्ये होती, ती तुमच्यामध्येही असो: तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनष्यरूपात प्रकट होऊन त्याने स्वतःला नम्र केले आणि तो मरणापर्यंत आज्ञाधारक झाला, अगदी क्रुसावरील मरणापर्यंत. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने वाकला जावा; आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, असे कबूल करावे. प्रियजनहो, मी तुमच्याजवळ असता तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात. तर विशेषकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही तुम्ही आज्ञापालन करावे, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपले तारण पूर्णत्वास नेण्यासाठी भयाने थरकाप होत असतानाही श्रम करीत राहा; कारण इच्छा बाळगण्यासाठी व त्याच्या योजनेनुसार कार्य करण्यासाठी तुम्हांला सक्षम करण्याकरिता परमेश्वर तुमच्यामध्ये सतत कार्य करीत असतो. जे काही तुम्ही कराल, ते कुरकुर व वादविवादाशिवाय करा. ह्यासाठी की, ह्या दुष्ट व विकृत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची मुले व्हावे. लोकांमध्ये जीवनाचे वचन सांगताना तुम्ही जगात आकाशातील ताऱ्यांसारखे दिसावे. असे झाले, तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत, असा अभिमान बाळगण्यास मला ख्रिस्ताच्या दिवशी कारण मिळेल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ अर्पिला जात असता जरी मी स्वतः अर्पिला जात आहे, तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुमच्या सर्वांना माझ्या आनंदात सहभागी करून घेतो. त्याचप्रमाणे तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.