फिलिप्पैकरांस पत्र 1:20-30
फिलिप्पैकरांस पत्र 1:19-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार; आणि विश्वासात तुम्हांला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे; हे अशासाठी की, तुमच्याकडे माझे पुन्हा येणे झाल्याने, माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे. सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता; आणि विरोध करणार्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाहीत; हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे, आणि ते देवापासून आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले, व आता मी जे करत आहे म्हणून तुम्ही ऐकता, तेच तुम्हीही करत आहात.
फिलिप्पैकरांस पत्र 1:20-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही. कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे; तरीही, मला देहात राहणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आहे आणि विश्वासात तुमची प्रगती व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हास अधिक कारण व्हावे. सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हास भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्याबाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून शुभवर्तमानाच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता. आणि विरोध करणार्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे. मी जे युद्ध केले ते तुम्ही बघितले आहे व मी जे करीत आहे म्हणून ऐकता, तेच तुम्हीही करीत आहात.
फिलिप्पैकरांस पत्र 1:20-30 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा. कारण मला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे! जर मला हे दैहिक जीवन जगायचे आहे, तर ते माझ्यासाठी श्रमाचे फळ ठरेल. मी काय निवडू? हे मला कळत नाही! मी दोन्ही गोष्टीसंबंधाने पेचात आहे: कारण येथून जाऊन ख्रिस्तासोबत असावे, अशी मला तीव्र इच्छा आहे. तेथे असणे अधिक उत्तम आहे! परंतु मी शरीरात असणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. मला माहीत आहे की, तुमची प्रगती आणि विश्वासातील तुमच्या आनंदासाठी मी येथे तुम्हाजवळ राहीन. मी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा परत आलो म्हणजे ख्रिस्त येशूंमधील तुमचा माझ्यासंबंधीचा अभिमान भरून वाहू लागेल. पण काहीही झाले, तरी ख्रिस्ताच्या शुभवार्तेला साजेल असे तुमचे आचरण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटलो अथवा माझ्या अनुपस्थितीत मला तुमच्याबद्दल असे ऐकावयास यावे की तुम्ही एका आत्म्यामध्ये एका मनाने स्थिर आहात व विश्वासाच्या शुभवार्तेमध्ये एकत्र झटत आहात, पण तुमचे जे विरोधी आहेत त्यांना न घाबरता तुम्ही उभे आहात. कारण त्यांचा नाश हे त्यांना चिन्ह आहे, परंतु तुमचा उद्धार होईल व तोही परमेश्वराद्वारे होईल. केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, एवढेच नव्हे, तर त्यांच्यासाठी दुःखही सहन करावे हे दान तुम्हाला देण्यात आले आहे. पूर्वी मी कसे दुःख सहन केले, हे तुम्ही पाहिलेच आहे व जे मी आता सहन करीत आहे तेही तुम्ही आता ऐकत आहात, व तेच दुःख तुम्हीही आता सहन करीत आहात.
फिलिप्पैकरांस पत्र 1:19-30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या साहाय्याने मला तुरुंगातून मुक्त होता येईल, हे मला ठाऊक आहे. माझी प्रबळ अपेक्षा व आशा ही आहे की, मी माझ्या जबाबदारीत उणा न पडता सर्व समयी आणि विशेषतः आता परिपूर्ण धैर्याने सर्वस्व पणास लावून जगण्याने अथवा मरण्याने ख्रिस्ताचा महिमा वाढवीत राहावे. मला तर जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. पण देहात जगण्यामुळे मला अधिक चांगले काम करता येणार असले, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे फार चांगले आहे. मात्र मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आणि श्रद्धेमधील तुमची प्रगती व आनंद वाढत जावा म्हणून मी तुम्हां सर्वांजवळ राहणार, हे मला ठाऊक आहे. जेव्हा मी तुमच्याकडे पुन्हा येईन, तेव्हा ख्रिस्त येशूविषयीच्या तुमच्या अभिमानात अधिक परिपूर्णपणे सहभागी होईन. सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकात्मतेने शुभवर्तमानावरील विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर आहात. विरोधकांना घाबरू नका; नेहमी धैर्य बाळगा. हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे आणि ते परमेश्वराने केले आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे. कारण मी जे युद्ध केले, ते तुम्ही पाहिले व आता मी जे करीत आहे त्याविषयी तुम्ही ऐकता, त्यात तुम्हीही माझ्याबरोबर सहभागी होत आहात.