YouVersion लोगो
सर्च आयकॉन

फिलिप्पैकरांस 1:20-30

फिलिप्पैकरांस 1:20-30 MRCV

याची मला खात्री व अपेक्षा आहे की मी यामुळे लज्जित होऊ नये, तर मला पुरेसे धैर्य प्राप्त व्हावे यासाठी की जगण्याने किंवा मरणाने, आता आणि सर्वदा, ख्रिस्त माझ्या शरीरात उंच केला जावा. कारण मला, जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे! जर मला हे दैहिक जीवन जगायचे आहे, तर ते माझ्यासाठी श्रमाचे फळ ठरेल. मी काय निवडू? हे मला कळत नाही! मी दोन्ही गोष्टीसंबंधाने पेचात आहे: कारण येथून जाऊन ख्रिस्तासोबत असावे, अशी मला तीव्र इच्छा आहे. तेथे असणे अधिक उत्तम आहे! परंतु मी शरीरात असणे हे तुमच्यासाठी अधिक आवश्यक आहे. मला माहीत आहे की, तुमची प्रगती आणि विश्वासातील तुमच्या आनंदासाठी मी येथे तुम्हाजवळ राहीन. मी तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा परत आलो म्हणजे ख्रिस्त येशूंमधील तुमचा माझ्यासंबंधीचा अभिमान भरून वाहू लागेल. पण काहीही झाले, तरी ख्रिस्ताच्या शुभवार्तेला साजेल असे तुमचे आचरण ठेवा, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटलो अथवा माझ्या अनुपस्थितीत मला तुमच्याबद्दल असे ऐकावयास यावे की तुम्ही एका आत्म्यामध्ये एका मनाने स्थिर आहात व विश्वासाच्या शुभवार्तेमध्ये एकत्र झटत आहात, पण तुमचे जे विरोधी आहेत त्यांना न घाबरता तुम्ही उभे आहात. कारण त्यांचा नाश हे त्यांना चिन्ह आहे, परंतु तुमचा उद्धार होईल व तोही परमेश्वराद्वारे होईल. केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, एवढेच नव्हे, तर त्यांच्यासाठी दुःखही सहन करावे हे दान तुम्हाला देण्यात आले आहे. पूर्वी मी कसे दुःख सहन केले, हे तुम्ही पाहिलेच आहे व जे मी आता सहन करीत आहे तेही तुम्ही आता ऐकत आहात, व तेच दुःख तुम्हीही आता सहन करीत आहात.