गणना 28:11-31
गणना 28:11-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वरास होमार्पणे करावे. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात. प्रत्येक बैलामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ. आणि प्रत्येक कोकराबरोबर अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पावे. हे होमार्पण, मधुर सुवासाचे परमेश्वरास अग्नीतून केलेले अर्पण असे आहे. लोकांची पेयार्पणे ही प्रत्येक बैलाकरता अर्धा हीन, व प्रत्येक मेंढ्याकरता एकतृतीयांश हीन व प्रत्येक कोकऱ्याकरता एक चतुर्थाश हीन इतका द्राक्षरस असावा, वर्षातील प्रत्येक महिन्यात हे होमार्पण करावे. आणि निरंतरचे होमार्पण व त्याचे पेयार्पण याखेरीज परमेश्वरास पापार्पणासाठी शेरडातला एक बकरा अर्पावा. परमेश्वराचा वल्हांडण सण महिन्याच्या चौदाव्या दिवशी आहे. बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता. या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करायचे नाही. तुम्ही परमेश्वरास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत. त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांस एफा आणि त्या मेंढ्याच्यामागे दोन दशमांस एफा, आणि सात कोकरापैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे. तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हास शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल. सकाळचे होमार्पण जे निरंतरचे होमार्पण आहे त्याव्यतिरिक्त हे अर्पण करावे. याप्रमाणे वल्हाडणाचे सात दिवस दररोज परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेल्या अर्पणाचे अन्न अर्पण करा, निरंतरचे होमार्पणे आणि त्याचे पेयार्पण याव्यतिरिक्त हे अर्पण असावे. नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि तुम्ही त्यादिवशी काहीही अंगमेहनीतीचे काम करू नये. सप्ताहांच्या सणात प्रथम पीक अर्पिण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वरास नव्या अन्नाचे अर्पण कराल त्यावेळी तुम्ही एक पवित्र मेळा बोलवा त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनीतीचे काम करू नये. तुम्ही परमेश्वरास सुवासासाठी होमार्पणे म्हणून तुम्ही दोन गोऱ्हे, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करा. आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा व मेंढ्यामागे दोन दशमांश एफा द्यावे. व त्या सात कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे. आणि तुम्हासाठी प्रायश्चित करायला एक बकरा अर्पावा. आणि निरंतरचे होमार्पण व अन्नार्पणाशिवाय ते अर्पण करावे. जेव्हा ते प्राणी तुम्हासाठी अर्पण करायचे ते निर्दोष असावे; त्याबरोबरची पेयार्पणे सुद्धा अर्पावी.
गणना 28:11-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण करावे; दोन गोर्हे, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे अर्पावीत; प्रत्येक गोर्ह्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ, आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ, आणि प्रत्येक कोकरामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पण करावे; हा सुवासिक होमबली परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होईल. त्यांबरोबरची पेयार्पणे ही असावीत. गोर्ह्यामागे अर्धा हिन, मेंढ्यामागे एक तृतीयांश हिन आणि कोकरामागे एक चतुर्थांश हिन द्राक्षारस. वर्षातील प्रत्येक महिन्यात होमबली अर्पायचा तो हा होय. आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज परमेश्वराप्रीत्यर्थ पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस परमेश्वराचा वल्हांडण सण पाळावा. तसाच ह्या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा. सात दिवस बेखमीर भाकर खावी. पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ एक हव्य म्हणजे होमार्पण करावे; दोन गोर्हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत. त्यांबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा आणि मेंढ्यामागे दोन दशमांश एफा अर्पावे; आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे; तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरता एक बकरा अर्पावा. सकाळचे होमार्पण म्हणजे नित्य होमार्पण, ह्याखेरीज हीदेखील अर्पावीत. ह्या प्रकारे सात दिवसपर्यंत दररोज तुम्ही परमेश्वराला सुवासिक हव्यान्न अर्पावे; नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांशिवाय आणखी हेदेखील अर्पावे. सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. सप्ताहाच्या सणात प्रथमपीक अर्पण करण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वराला नव्या अन्नाचे अर्पण कराल तेव्हा पवित्र मेळा भरवावा, त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे; दोन गोर्हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे; आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; प्रत्येक गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा आणि मेंढ्यामागे दोन दशमांश एफा, आणि त्या सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे; तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून एक बकरा अर्पावा. ही दोषहीन असावीत; आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण ह्यांखेरीज ही व ह्यांबरोबरची पेयार्पणे अर्पावीत.