YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 28

28
दैनिक अर्पणे
(निर्ग. 29:38-46)
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्न तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा.
3आणखी तू त्यांना सांग, परमेश्वराप्रीत्यर्थ जे हव्य तुम्ही अर्पायचे ते हे : नित्य होमार्पणासाठी रोज एकेक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे.
4एक कोकरू सकाळी अर्पावे आणि दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे.
5आणि हातकुटीच्या पाव हिन तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.
6हा नित्याचा होमबली परमेश्वराला सुवासिक हव्य व्हावा असे सीनाय पर्वतावर विहित केले होते.
7त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावेस.
8दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे; सकाळचे अन्नार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याप्रमाणे ते परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून अर्पावे.
शब्बाथ आणि मासिक अर्पणे
9दर शब्बाथ दिवशी एकेक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरचे पेयार्पण ही अर्पावीत.
10नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज आणखी हा होमबली दर शब्बाथ दिवशी अर्पावा.
11प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण करावे; दोन गोर्‍हे, एक मेंढा आणि एकेक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे अर्पावीत;
12प्रत्येक गोर्‍ह्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ, आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ,
13आणि प्रत्येक कोकरामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पण करावे; हा सुवासिक होमबली परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होईल.
14त्यांबरोबरची पेयार्पणे ही असावीत. गोर्‍ह्यामागे अर्धा हिन, मेंढ्यामागे एक तृतीयांश हिन आणि कोकरामागे एक चतुर्थांश हिन द्राक्षारस. वर्षातील प्रत्येक महिन्यात होमबली अर्पायचा तो हा होय.
15आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज परमेश्वराप्रीत्यर्थ पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.
नेमून दिलेल्या सणांत करायची अर्पणे
(लेवी. 23:1-43)
16पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस परमेश्वराचा वल्हांडण सण पाळावा.
17तसाच ह्या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा. सात दिवस बेखमीर भाकर खावी.
18पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.
19ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ एक हव्य म्हणजे होमार्पण करावे; दोन गोर्‍हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावीत; ही दोषहीन असावीत.
20त्यांबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा आणि मेंढ्यामागे दोन दशमांश एफा अर्पावे;
21आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे;
22तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरता एक बकरा अर्पावा.
23सकाळचे होमार्पण म्हणजे नित्य होमार्पण, ह्याखेरीज हीदेखील अर्पावीत.
24ह्या प्रकारे सात दिवसपर्यंत दररोज तुम्ही परमेश्वराला सुवासिक हव्यान्न अर्पावे; नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांशिवाय आणखी हेदेखील अर्पावे.
25सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.
26सप्ताहाच्या सणात प्रथमपीक अर्पण करण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वराला नव्या अन्नाचे अर्पण कराल तेव्हा पवित्र मेळा भरवावा, त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.
27पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे; दोन गोर्‍हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे;
28आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; प्रत्येक गोर्‍ह्यामागे तीन दशमांश एफा आणि मेंढ्यामागे दोन दशमांश एफा,
29आणि त्या सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे;
30तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून एक बकरा अर्पावा.
31ही दोषहीन असावीत; आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण ह्यांखेरीज ही व ह्यांबरोबरची पेयार्पणे अर्पावीत.

सध्या निवडलेले:

गणना 28: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन