गणना 23:13-30
गणना 23:13-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर बालाक त्यास म्हणाला, म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगळ्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांना माझ्यासाठी शाप दे. तेव्हा बालाक बलामास पिसगाच्या माथ्यावरील सोफीमाच्या माळ्यावर घेऊन गेला. तेथे बालाकाने सात वेद्या बांधल्या. नंतर बालाकाने प्रत्येक वेदीवर एक बैल आणि एक मेंढा बली दिला. तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, तू येथे आपल्या होमबलीजवळ या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो. परमेश्वर बलामाकडे आला आणि काय बोलायचे ते त्याने त्यास सांगितले. नंतर परमेश्वराने बलामास बालाकाकडे जायला सांगितले. आणि त्याने सांगितलेलेच बोलायला सांगितले. म्हणून बलाम बलाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबाचे पुढारी होमबलीपाशी उभे होते. बालाकाने बलामास येताना पाहिले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने काय सांगितले? बलामाने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, बालाका, उठ आणि ऐक. तू सिप्पोरेच्या मुला, माझे ऐक, देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे, किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे. जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय? तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय? पहा, मी आशीर्वाद द्यायला आज्ञा केली, देवाने आशीर्वाद दिला आणि मी तो उलटा फिरवू शकत नाही. त्यास याकोबात काही कष्ट किंवा इस्राएलात त्रास दिसला नाही. त्यांचा परमेश्वर देव त्यांच्याबरोबर आहे, राजाचा जयघोष त्यांच्यात आहे. देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. ते रानबैला इतके शक्तीमान आहेत. याकोबाच्याविरूद्ध मंत्रतंत्र चालणार नाही आणि इस्राएलींना दैवप्रश्र सांगणारे हानी पोचवू शकत नाही, याकोबाविषयी व इस्राएलाविषयी म्हणतील की पहा, देवाने केवढे महान कार्य केले! पहा, लोक सिंहिणीसारखे उठत आहेत, सिंहासारखा बाहेर येतो आणि हल्ला करतो. तो त्याची शिकार खाऊन आणि वधलेल्यांचे रक्त प्यायल्याखेरीज तो खाली बसणार नाही. नंतर बालाक बलामास म्हणाला, तू त्यांना शापहि देऊ नको आणि आशीर्वादहि देऊ नको. बलामाने बालाकाला उत्तर दिले, मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगेल तेच मला बोलता येईल. नंतर बालाक बलामास म्हणाला, तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुला त्या लोकांस शाप द्यायची परवानगी देईल. म्हणून बालाक बलामास घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरुन वाळवंट दिसते. बलाम बालाकाला म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बली देण्यासाठी तयार कर.” बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने साऱ्या गोष्टी केल्या. बालाकाने वेदीवर बैल आणि मेंढे बली दिले.
गणना 23:13-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बालाक त्याला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर दुसर्या ठिकाणी ये. तेथून ते तुझ्या दृष्टीस पडतील, पण ते सर्व तुला दिसायचे नाहीत, केवळ कडेकडेचे दिसतील. तेथून माझ्याकरता त्यांना शाप दे.” तो त्याला पिसगाच्या माथ्यावरील सोफिमाच्या माळावर घेऊन गेला; तेथे त्याने सात वेद्या बांधल्या व प्रत्येक वेदीवर एकेक गोर्हा व एकेक मेंढा अर्पण केला. मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू येथे आपल्या होमबलीजवळ उभा राहा, मी जरा पलीकडे दर्शनास जाऊन येतो.” परमेश्वराने बलामाला दर्शन दिले आणि त्याच्या तोंडी शब्द घातले व म्हटले, “बालाकाकडे परत जाऊन त्याला असे बोल.” तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक मवाबी सरदारांसह होमबलीजवळ उभा होता. आणि बालाकाने त्याला विचारले, “परमेश्वर काय बोलला?” तेव्हा बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय? पाहा, आशीर्वाद देण्याची मला आज्ञा झाली आहे; त्याने आशीर्वादच दिला आहे, तो मला मागे घेता येत नाही. त्याने याकोबात अनीती पाहिली नाही, त्याला इस्राएलात क्लेश दिसले नाहीत; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे; राजघोष त्याच्यामध्ये होत आहे. देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले; जणू काय रानबैलांचे बळ त्यांच्या ठायी आहे. याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत; इस्राएलावर काही चेटूक चालायचे नाही. यथाकाळी याकोब व इस्राएल ह्यांच्याविषयी असे म्हणतील, ‘देवाने केवढे कार्य केले!’ पाहा, हे राष्ट्र सिंहिणीसारखे उठत आहे. सिंहाप्रमाणे ते उभे राहत आहे; शिकार भक्षण करीपर्यंत, वधलेल्याचे रुधिर प्राशन करीपर्यंत ते बसायचे नाहीत.” बालाक बलामाला म्हणाला, “तू त्यांना शापही देऊ नकोस आणि आशीर्वादही देऊ नकोस. बलाम बालाकाला म्हणाला, “परमेश्वर सांगेल त्याचप्रमाणे मला केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?” मग बालाक बलामाला म्हणाला, “आता चल, मी तुला दुसर्या ठिकाणी नेतो, तेथून तू त्यांना माझ्याकरता शाप द्यावा असे कदाचित देवाला योग्य वाटेल.” तेव्हा बालाकाने बलामास रानाच्या कडेला असलेल्या पौर डोंगराच्या माथ्यावर नेले. बलाम बालाकाला म्हणाला, “येथे माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि सात गोर्हे व सात मेंढे तयार ठेव.” बालाकाने बलामाच्या म्हणण्याप्रमाणे केले; त्याने प्रत्येक वेदीवर एकेक गोर्हा व एकेक मेंढा अर्पण केला.