YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 13:17-26

गणना 13:17-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मोशेने कनान देश हेरण्यास पाठवताना लोकांस सांगितले की तुम्ही येथून नेगेब प्रांतामधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा. देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या. ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे किंवा वाईट आहे? ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात? संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का? त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का? या सर्व गोष्टी पाहा व समजून घ्या. तेथील जमीन पीक घेण्यास योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या. ते दिवस द्राक्षाच्या पहिल्या बहराचे होते. म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन रानापासून रहोब आणि लेबो हमाथपर्यंतच्या प्रदेशात शोध घेतला. त्यांनी नेगेबमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते. अहीमान शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहत होते. नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदीला द्राक्षाचा घोसासहीत त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघेजण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळिंबे व अंजीर ही घेतली. त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता. त्या लोकांनी त्या प्रदेशाचा चाळीस दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले. इस्राएल लोकांची छावणी पारानाच्या वाळवंटात कादेशजवळ होती ते लोक मोशे, अहरोन आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांस त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली.

सामायिक करा
गणना 13 वाचा

गणना 13:17-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा मोशे त्यांना कनान देश हेरायाला पाठवित होता तेव्हा तो म्हणाला, “नेगेव-दक्षिण-मधून वर डोंगराळ प्रदेशात जा. आणि तो देश कसा आहे, तिथे जे लोक राहतात ते बलवान आहेत की दुर्बल आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ हे पाहा. ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे की वाईट आहे? कोणत्या प्रकारच्या नगरांमध्ये त्यांची वस्ती आहे? ते उजाड आहेत की तटबंदीची आहेत? तेथील जमीन कशी आहे? ती सुपीक आहे की नापीक? त्यात झाडे आहेत की नाही? तुम्ही परत येताना त्या देशातील काही फळे तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा कसोशीने प्रयत्न करा.” (तो प्रथमपक्व द्राक्षाच्या फळांचा हंगाम होता.) मग ते गेले आणि सीन रानापासून हमाथाच्या जवळील रहोबा पर्यंतचा देश त्यांनी हेरला. ते वरती नेगेवमधून गेले आणि हेब्रोनात आले, जिथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते. (हेब्रोन हे इजिप्त देशातील सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले गेले होते.) ते जेव्हा अष्कोल खोर्‍याजवळ आले. तिथे त्यांनी एक द्राक्षांचा घड असलेली फांदी कापून घेतली. दोन माणसांनी त्यांच्यामध्ये तो एका काठीवर घालून वाहून नेला. त्याचबरोबर त्यांनी काही डाळिंबे आणि अंजिरेही घेतली. त्या खोर्‍याचे नाव अष्कोल असे ठेवले कारण इस्राएली लोकांनी तिथून द्राक्षाचा घड कापून घेतला होता. देश हेरून चाळीस दिवसानंतर ते परत आले. पारान रानातील कादेश येथे मोशे आणि अहरोन व सर्व इस्राएली लोकांकडे ते परत आले. तिथे त्यांनी त्यांना व सर्व समुदायाला अहवाल दिला व त्या देशाची फळे दाखविली.

सामायिक करा
गणना 13 वाचा

गणना 13:17-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मोशेने त्यांना कनान देश हेरायला पाठवताना सांगितले की, “येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा; आणि देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत, ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणीवजा आहेत की तटबंदीची आहेत, तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापीक आहे, त्यात झाडेझुडपे आहेत की नाहीत हे पाहून या. हिम्मत धरा, व त्या देशातली काही फळे घेऊन या.” ते दिवस द्राक्षांच्या पहिल्या बहराचे होते. मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरला. ते नेगेब प्रांतातून हेब्रोनास गेले; तेथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते; हे हेब्रोन मिसरातील सोअनापूर्वी सात वर्षे आधी बांधले होते. तेथून ते अष्कोल नाल्यापर्यंत आले; तेथे त्यांनी द्राक्षांच्या एका घोसासहित एक फांदी तोडून घेतली व ती दोघा माणसांनी काठीवर घालून नेली; त्याचप्रमाणे त्यांनी काही डाळिंबे व अंजीरेही घेतली. इस्राएल लोकांनी त्या ठिकाणचा द्राक्षांचा घोस तोडला म्हणून त्याचे नाव ‘अष्कोल (म्हणजे घोस) नाला’ असे पडले. देश हेरून ते चाळीस दिवसांनी परत आले. ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्राएलाची सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकिकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखवली.

सामायिक करा
गणना 13 वाचा