नहेम्या 9:32-37
नहेम्या 9:32-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर आता हे आमच्या देवा, हे थोर, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणार्या देवा, अश्शूरी राजाच्या काळापासून आजपर्यंत आम्हांला, आमच्या राजांना, आमच्या अधिपतींना, आमच्या याजकांना, आमच्या संदेष्ट्यांना, आमच्या वाडवडिलांना आणि तुझ्या सर्व लोकांना जे कष्ट झाले आहेत ते क्षुल्लक लेखू नकोस. आमच्यावर जे काही गुदरले आहे त्याच्या बाबतीत तू न्यायशील आहेस; तू आमच्याशी सत्यतेने वागलास पण आम्ही दुष्टाई केली आहे. आमचे राजे, अधिपती, याजक आणि वाडवडील ह्यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही, आणि आपल्या ज्या आज्ञांच्या व निर्बंधांच्या योगे तू त्यांना बजावले त्यांकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपल्या राज्यात तुझी सेवा केली नाही; तू त्यांचे मोठे कल्याण केलेस, आणि तू त्यांना विस्तृत व सुपीक भूमी दिली, तरीही तुझी सेवा त्यांनी केली नाही आणि आपल्या दुष्कर्मापासून ते परावृत्त झाले नाहीत. पाहा, आज आम्ही दास बनलो आहोत; आमच्या पूर्वजांनी उत्तम उत्पन्न उपभोगावे म्हणून जो देश तू त्यांना दिलास त्यात आम्ही केवळ दास आहोत. आमच्या पापांमुळे जे राजे तू आमच्यावर नेमले आहेत त्यांना ह्या देशाचे पुष्कळ उत्पन्न मिळत आहे; ते आमच्या देहांवर व आमच्या गुराढोरांवर हवी तशी सत्ता चालवत आहेत; आम्ही फार फार संकटात आहोत.”
नहेम्या 9:32-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे आमच्या देवा, महान, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणाऱ्या देवा, आमच्यावर अनेक आपत्ती आल्या त्यांना छोट्या समजू नकोस आणि आमचे राजे आणि नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या. पण देवा, आमच्या बाबतीत जे घडले त्या सगळया गोष्टींच्या बाबतीत तुझे खरे होते. तुझे बरोबर होते आणि आम्ही दुष्टाई केली आहे. आमचे राजे, नेते, याजक आणि पूर्वज यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही. तुझ्या आज्ञा ऐकल्या नाहीत. तू दिलेल्या सूचनाकंडे त्यांनी दुर्लक्ष केले. स्वत:च्या राज्यात राहत असताना देखील आमच्या पूर्वजांनी तुझी सेवा केली नाही. त्यांनी दुष्कृत्ये करायचे थांबवले नाही. तू त्यांना बहाल केलेल्या अनेक उत्तमोत्तम गोष्टींचा त्यांनी उपभोग घेतला. सुपीक जमीन आणि विशाल प्रदेश याचा त्यांनी उपभोग घेतला. पण तरीही स्वत:च्या वाईट कृत्यांना त्यांनी आळा घातला नाही. आणि आता आम्ही गुलाम झालो आहोत. या भूमीत, आमच्या पूर्वजांनी इथली फळे चाखावी आणि इथे पिकणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा म्हणून तू त्यांना दिलेल्या या भूमीत आम्ही गुलाम आहोत. या जमिनीत मुबलक पीक येते पण आम्ही पाप केले, त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते. या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे. ते मन मानेल तसे वागतात. आम्ही मोठ्या संकटात आहोत.
नहेम्या 9:32-37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“म्हणून आता, हे आमच्या महान, पराक्रमी व भयावह परमेश्वरा, तुम्ही तुमच्या प्रीतीचे वचन पाळता, म्हणून ज्या हालअपेष्टा आम्ही सहन केल्या, त्यांना तुमच्या नजरेत क्षुल्लक मानू नका—जी आमच्यावर, आमच्या राजांवर व अधिकार्यांवर, आमच्या याजक व संदेष्ट्यांवर, आमच्या पूर्वजांवर व तुमच्या सर्व लोकांवर, अश्शूरी राजाच्या राजवटीपासून आतापर्यंत संकटे आली. जे सर्वकाही आमच्याबाबत घडले, त्यात तुमची विश्वासार्हता कायम होती; तुमची वागणूक विश्वासयोग्य होती, पण आम्ही मात्र दुष्टपणे वागलो. आमचे राजे, आमचे अधिकारी, आमचे याजक आणि आमचे पूर्वज यांनी तुमचे नियम पाळले नाहीत किंवा तुमच्या आज्ञा व आदेश पाळण्याच्या ताकिदीकडे लक्ष दिले नाही. ते स्वतः राज्य करीत असताना, त्यांनी विशाल व सुपीक देशात तुमच्या थोर चांगुलपणाचा उपभोग घेतला. तरी देखील त्यांनी तुमची भक्ती केली नाही वा दुष्टपणापासून मागे वळले नाही. “पण पाहा, आज आम्ही गुलामगिरीत आहोत, आम्ही ज्या भूमीतील उत्तम फळे व इतर गोष्टींचा उपभोग घ्यावा त्या आमच्या पूर्वजांना तुम्ही दिलेल्या या समृद्ध देशात गुलाम आहोत. आमच्या पापांमुळे, या देशाचे विपुल उत्पन्न, आमच्यावर राज्य करणाऱ्या राजांकडे जात आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे ते आमच्या शरीरावर व आमच्या पशूंवर सत्ता करतात. खरोखर आम्ही घोर दैन्यावस्थेत आहोत.