YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 9

9
इस्राएली लोक पापांगिकार करतात
1याच महिन्याच्या चोवीस तारखेला, इस्राएली एकत्र आले. यावेळी त्यांनी उपास केला व गोणपाट पांघरूण त्यांनी आपल्या डोक्यावर धूळ घातली 2ज्या इस्राएली वंशजांनी स्वतःला सर्व गैरयहूद्यांपासून वेगळे ठेवले, ते आपआपल्या जागेवर उभे राहिले व त्यांनी स्वतःची आणि आपल्या पूर्वजांची पापे कबूल केली. 3ते उभे असताना याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ त्यांना तीन तास मोठ्याने वाचून दाखविण्यात आला. त्यानंतरचे तीन तास पापांगिकार केला व याहवेह आपल्या परमेश्वराची भक्ती केली. 4लेव्यांसाठी नेमलेल्या पायऱ्यावर उभे राहून येशूआ, बानी, कदमीएल, शबन्याह, बुन्नी, शेरेब्याह, बानी व कनानी या लेव्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वरासमोर आपला आवाज उंचाविला. 5मग लेवी—येशूआ, कदमीएल, बानी, हशबन्याह, शेरेब्याह, होदीयाह, शबन्याह व पथह्याह—हे लोकांना म्हणाले: “उभे राहा आणि याहवेह तुमच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते अनादि काळापासून शाश्वत परमेश्वर आहेत.”
“तुमचे वैभवी नाव धन्य असो आणि ते सर्व प्रशंसा व स्तवनाच्या उच्चस्थानी राहो. 6केवळ तुम्हीच एकटे याहवेह आहात. तुम्ही आकाश, अत्युच्च स्वर्ग व त्यातील सर्व तारकामंडल, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. तुम्ही सर्वांना जीवन देता आणि स्वर्गातील असंख्य सेना तुमची आराधना करतात.
7“याहवेह तुम्हीच परमेश्वर आहात, ज्यांनी अब्रामाला निवडले आणि त्याला खाल्डियनांच्या ऊर शहरातून बाहेर काढून अब्राहाम असे नाव दिले. 8त्याचे अंतःकरण तुमच्याशी विश्वासू आहे हे तुम्ही बघितले, म्हणून त्याच्या वंशजांना कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशीचा देश देण्याचा तुम्ही त्याच्याशी करार केला. तुम्ही वचन दिल्याप्रमाणे केले, कारण तुम्ही विश्वासयोग्य आहात.
9“इजिप्तमध्ये आमच्या पूर्वजांच्या हालअपेष्टा तुम्ही पाहिल्या; तांबड्या समुद्राच्या जवळ त्यांनी केलेला तुमचा धावा तुम्ही ऐकला. 10फारोह व त्याच्या अधिकाऱ्याविरुद्ध व त्याच्या प्रदेशातील सर्व लोकांविरुद्ध तुम्ही चिन्ह व चमत्कार केले, कारण ते लोक त्यांना किती कठोरपणाची वागणूक देत होते, हे तुम्हाला ठाऊक होते. तुमच्या नावाचा महिमा तुम्ही प्रकट केला आणि तो आजवर आहे. 11तुम्ही त्यांच्यासमोर समुद्र दुभागला, म्हणजे त्यांनी कोरड्या जमिनीवरून चालत जावे. परंतु त्यांचा पाठलाग करणार्‍यांना असे खोलात फेकले, जणू प्रचंड जलाशयात एखादा दगड फेकला जावा. 12आमच्या पूर्वजांचे दिवसा मेघस्तंभाद्वारे व रात्री त्यांना आपल्या मार्गाने जाता यावे म्हणून अग्निस्तंभाद्वारे मार्गदर्शन केले.
13“तुम्ही सीनाय पर्वतावर खाली उतरले; त्यांच्याशी स्वर्गातून बोलले; त्यांना न्याय्य व योग्य विधी व कायदे दिले आणि उत्तम नियम व आज्ञा दिल्या. 14तुम्ही त्यांना तुमच्या पवित्र शब्बाथाची ओळख करून दिली व तुमचा सेवक मोशेद्वारे त्यांना आज्ञा, नियम व कायदे प्रदान केले. 15ते भुकेले असताना त्यांना स्वर्गातून भाकर दिली आणि तहानलेले असताना खडकातून पाणी दिले; तुम्ही त्यांना आज्ञा दिली की, त्यांनी जावे व जी तुम्ही बाहू उभारून वचनदत्त केली होती, त्या भूमीचा ताबा घ्यावा.
16“पण ते, आमचे पूर्वज गर्विष्ठ व दुराग्रही बनले व त्यांनी तुमच्या आज्ञा पाळल्या नाही. 17त्यांनी तुमचे ऐकण्याचे नाकारले आणि तुम्ही त्यांच्यामध्ये केलेल्या चमत्कारांची आठवण ठेवली नाही. उलट त्यांनी बंडखोरी केली आणि परत गुलामगिरीत आपल्याला न्यावे म्हणून एक पुढारी नेमला. पण तुम्ही क्षमाशील परमेश्वर आहात, दयाळू आणि कृपाळू, मंदक्रोध व प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहात. तुम्ही त्यांचा त्याग केला नाही, 18जरी त्यांनी वासराची ओतीव मूर्ती तयार केली आणि जाहीर केले, ‘हे आमचे परमेश्वर आहेत; यांनीच आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले,’ अथवा जेव्हा त्यांनी भयानक रीतीने ईशनिंदा केली तरीही.
19“तुमच्या महान करुणेमुळे रानातच त्यांचा त्याग केला नाही. मेघस्तंभाने दिवसा त्यांना मार्गदर्शन केले आणि अग्निस्तंभाने रात्री प्रकाश देऊन त्यांना वाट दाखविणे थांबविले नाही. 20आपला चांगला आत्मा पाठवून त्यांना बोध केला. त्यांच्या मुखासाठी स्वर्गातून तुमचा मान्ना पुरविण्याचे आणि तहान भागविण्यासाठी पाणी देण्याचे तुम्ही थांबविले नाही. 21चाळीस वर्षापर्यंत रानात तुम्ही त्यांचे पालनपोषण केले; त्यांना कशाचीही उणीव पडू दिली नाही, त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत की त्यांचे पाय सुजले नाहीत.
22“नंतर राज्ये व राष्ट्रे तुम्ही त्यांना दिली आणि दूरवरच्या कानाकोपर्‍यातील सरहद्दीही दिल्या. त्यांनी हेशबोनचा राजा सीहोन व बाशानचा राजा ओगचे देश काबीज केले. 23तुम्ही त्यांचे वंशज ताऱ्यागत बहुगुणित केले आणि त्यांच्या पूर्वजांना जा व काबीज करा असे वचन दिलेल्या देशात तुम्ही त्यांना आणले. 24त्यांची लेकरे आत गेली व त्यांनी तो प्रदेश ताब्यात घेतला. तुम्ही त्यांच्यापुढे, तिथे राहणारे कनानी लोक नमविले. हे कनानी लोक व त्यांचे राजेसुद्धा त्यांच्या हातात, त्यांना वाटेल तसे वागविण्यासाठी सुपूर्द केले. 25त्यांनी तटबंदीची शहरे आणि सुपीक जमिनी काबीज केल्या; सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेल्या विहिरी, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे व विपुल फळझाडे हस्तगत केली. मग ते खाऊन तृप्त व उत्तमरित्या पोषित झाले; आणि तुमच्या महान चांगुलपणाचा त्यांनी आनंद साजरा केला.
26“पण त्यांनी आज्ञाभंग केला आणि तुमच्याविरुद्ध बंड केले; त्यांनी तुमच्या नियमांकडे पाठ फिरविली. लोकांनी तुमच्याकडे परत यावे असे त्यांना सांगणार्‍या संदेष्ट्यांना ठार मारले आणि इतर अनेक तऱ्हेने महाभयंकर ईशनिंदा केली. 27म्हणून तुम्ही त्यांना शत्रूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांचा छळ केला. पण जेव्हा त्यांचा छळ होऊ लागला, त्यावेळी त्यांनी तुमचा धावा केला. तो तुम्ही स्वर्गातून ऐकला. त्यांच्यावर महान कृपा करून, शत्रूपासून मुक्त करणारे रक्षक त्यांच्याकडे पाठविले.
28“पण सर्व सुरळीत झाले की, ते परत तुमच्या नजरेत पाप करू लागले. मग तुम्ही त्यांना नाकारून, त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, जे त्यांच्यावर शासन करीत. आणि जेव्हा ते परत तुमचा धावा करीत, तेव्हा तुम्ही तो स्वर्गातून ऐकून तुमच्या करुणेने त्यांना वेळोवेळी सोडवित असत!
29“त्यांनी तुमच्या आज्ञांकडे परत वळावे म्हणून तुम्ही त्यांना ताकीद दिली, पण ते गर्विष्ठ झाले व त्यांनी तुमच्या आज्ञा मोडल्या. त्यांनी तुमच्या आदेशाविरुद्ध पाप केले, ज्यात तुम्ही म्हटले होते, ‘जो या आदेशानुसार वागेल तो मनुष्य जगेल.’ दुराग्रहाने त्यांनी तुमच्याकडे पाठ फिरविली, गर्विष्ठ बनले व तुमचे ऐकण्याचे नाकारले. 30अनेक वर्षे तुम्ही त्यांच्याशी सहनशीलतेने वागलात. तुम्ही आपले संदेष्टे पाठवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना आत्म्याद्वारे ताकीद दिली. परंतु तरीही त्यांनी दुर्लक्ष केले, तेव्हा तुम्ही शेजारील लोकांच्या हाती त्यांना दिले. 31पण तुमच्या महान दयेमुळे तुम्ही त्यांचा सर्वनाश केला नाही व त्यांचा त्याग केला नाही, कारण तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात.
32“म्हणून आता, हे आमच्या महान, पराक्रमी व भयावह परमेश्वरा, तुम्ही तुमच्या प्रीतीचे वचन पाळता, म्हणून ज्या हालअपेष्टा आम्ही सहन केल्या, त्यांना तुमच्या नजरेत क्षुल्लक मानू नका—जी आमच्यावर, आमच्या राजांवर व अधिकार्‍यांवर, आमच्या याजक व संदेष्ट्यांवर, आमच्या पूर्वजांवर व तुमच्या सर्व लोकांवर, अश्शूरी राजाच्या राजवटीपासून आतापर्यंत संकटे आली. 33जे सर्वकाही आमच्याबाबत घडले, त्यात तुमची विश्वासार्हता कायम होती; तुमची वागणूक विश्वासयोग्य होती, पण आम्ही मात्र दुष्टपणे वागलो. 34आमचे राजे, आमचे अधिकारी, आमचे याजक आणि आमचे पूर्वज यांनी तुमचे नियम पाळले नाहीत किंवा तुमच्या आज्ञा व आदेश पाळण्याच्या ताकिदीकडे लक्ष दिले नाही. 35ते स्वतः राज्य करीत असताना, त्यांनी विशाल व सुपीक देशात तुमच्या थोर चांगुलपणाचा उपभोग घेतला. तरी देखील त्यांनी तुमची भक्ती केली नाही वा दुष्टपणापासून मागे वळले नाही.
36“पण पाहा, आज आम्ही गुलामगिरीत आहोत, आम्ही ज्या भूमीतील उत्तम फळे व इतर गोष्टींचा उपभोग घ्यावा त्या आमच्या पूर्वजांना तुम्ही दिलेल्या या समृद्ध देशात गुलाम आहोत. 37आमच्या पापांमुळे, या देशाचे विपुल उत्पन्न, आमच्यावर राज्य करणाऱ्या राजांकडे जात आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे ते आमच्या शरीरावर व आमच्या पशूंवर सत्ता करतात. खरोखर आम्ही घोर दैन्यावस्थेत आहोत.
लोकांची संमती
38“हे सर्व बघता, आम्ही असे बंधनकारक, लिखित वचन देतो आणि आमचे अधिपती, आमचे लेवी व आमचे याजक या करारांवर त्यांची मोहर लावतो.”

सध्या निवडलेले:

नहेम्या 9: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन