YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 8:9-18

नहेम्या 8:9-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यानंतर नहेम्या हा राज्यपाल, याजक व शिक्षक एज्रा आणि लोकांस स्पष्टीकरण करून सांगणारे लेवी हे लोकांस बोलले. ते म्हणाले, “तुमचा परमेश्वर देव याचा हा पवित्र दिवस आहे. आज दु:खी राहू नका किंवा शोक करु नका.” कारण नियमशास्त्रातील देवाची वचने ऐकत असताना लोक रडू लागले होते. नहेम्या म्हणाला, “आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका, कारण परमेश्वराचा आनंदच तुमचे सामर्थ्य आहे.” लेवी घराण्यातील लोकांनी जमलेल्या लोकांस शांत केले. आणि म्हणाले, “शांत व्हा, आजचा दिवस पवित्र आहे. शोक करु नका.” मग सर्व लोक मेजवानी घ्यायला गेले. खाद्यपेयात त्यांनी इतरांना सहभागी करून घेतले. अतिशय आनंदात त्यांनी हा विशेष दिवस साजरा केला. परमेश्वराची वचने त्यांना अखेर समजली. यानंतर त्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व घराण्यांचे प्रमुख एज्रा शास्त्रीला तसेच याजकांना व लेवींना भेटायला गेले. नियमशास्त्राची वचने लक्षपूर्वक ऐकण्यासाठी ते जमले. परमेश्वराने मोशेद्वारे लोकांस हे नियमशास्त्र दिले. त्यामध्ये यांना अभ्यासातून असे सापडले की, वर्षाच्या सातव्या महिन्यात इस्राएल लोकांनी या सणा दरम्यान तात्पुरत्या तंबूत रहावे. लोकांनी सर्व नगरांमध्ये आणि यरूशलेमभर फिरुन अशी घोषणा करावी की, “डोंगराळ भागामध्ये जाऊन वेगवेगळया प्रकारच्या जैतून वृक्षांच्या फांद्या आणाव्या. देवदारू, खजुरी आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या फांद्या आणाव्या आणि त्यांचे तात्पुरते मांडव उभारावेत. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करावे.” तेव्हा लोक बाहेर पडले आणि त्यांनी फांद्या आणल्या आणि त्यापासून स्वत:साठी आपल्या धाब्यावर आणि स्वतःच्या अंगणात, देवाच्या मंदिराच्या अंगणात, पाणीवेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशी जवळही त्यांनी मांडव घातले. बंदिवासातून परत आलेल्या सर्वांनी मांडव उभारले व त्यामध्ये ते राहिले. नूनचा पुत्र येशूवा याच्या काळापासून ते त्या काळापर्यंत इस्राएलींनी हा मंडपाचा सण साजरा केला नव्हता. सर्वांना अतिशय आनंद झाला होता. प्रतिदिवशीही, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचे पुस्तक वाचीत होता. त्यांनी सात दिवस हा सण साजरा केला आणि नियमानुसार विधीपूर्वक आठव्या दिवशी सभा भरून पाळला.

सामायिक करा
नहेम्या 8 वाचा

नहेम्या 8:9-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती), एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, “हा दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका; रडू नका.” कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.” “शांत राहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे; दु:ख करू नका.” असे म्हणून लेव्यांनी लोकांना शांत केले. नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकांना ताटे वाढून पाठवण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यांना वाचून दाखवली होती ती त्यांना समजली होती. दुसर्‍या दिवशीही सर्व लोकांच्या पितृकुळांतील प्रमुख पुरुष, याजक व लेवी नियमशास्त्राची वचने लक्षपूर्वक ऐकण्यासाठी एज्रा शास्त्री ह्याच्याजवळ जमा झाले. त्यांना नियमशास्त्रात असे लिहिलेले आढळले की परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सातव्या महिन्याच्या पर्वणीस मांडवांत राहावे. आपल्या सर्व नगरानगरांत व यरुशलेमेत त्यांनी लोकांना जाहीर करावे व कळवावे की, “पहाडावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी आणि दाट पालवीचे वृक्ष ह्यांच्या डाहळ्या आणून शास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे मांडव घालावेत.” मग लोकांनी बाहेर जाऊन डाहळ्या आणल्या आणि आपापल्या घरांच्या धाब्यांवर, त्यांच्या अंगणांत, देवाच्या मंदिराच्या अंगणांत, पाणीवेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशीच्या चौकात मांडव घातले. जे लोक बंदिवासातून सुटून परत आले होते त्यांचा अवघा मेळा मांडव घालून त्यांत राहिला; नूनाचा पुत्र येशूवा ह्याच्या काळापासून ह्या दिवसापर्यंत इस्राएल लोकांनी कधी असे केले नव्हते. चोहोकडे आनंदच आनंद झाला. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ नित्य वाची. ह्या प्रकारे त्यांनी सात दिवसांपर्यंत सण पाळला आणि आठव्या दिवशी विधीपूर्वक सणाचा समारोप केला.

सामायिक करा
नहेम्या 8 वाचा