YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 8:9-18

नहेम्या 8:9-18 MARVBSI

मग नहेम्या तिर्शाथा (प्रांताधिपती), एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, “हा दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका; रडू नका.” कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टान्नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.” “शांत राहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे; दु:ख करू नका.” असे म्हणून लेव्यांनी लोकांना शांत केले. नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकांना ताटे वाढून पाठवण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यांना वाचून दाखवली होती ती त्यांना समजली होती. दुसर्‍या दिवशीही सर्व लोकांच्या पितृकुळांतील प्रमुख पुरुष, याजक व लेवी नियमशास्त्राची वचने लक्षपूर्वक ऐकण्यासाठी एज्रा शास्त्री ह्याच्याजवळ जमा झाले. त्यांना नियमशास्त्रात असे लिहिलेले आढळले की परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सातव्या महिन्याच्या पर्वणीस मांडवांत राहावे. आपल्या सर्व नगरानगरांत व यरुशलेमेत त्यांनी लोकांना जाहीर करावे व कळवावे की, “पहाडावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी आणि दाट पालवीचे वृक्ष ह्यांच्या डाहळ्या आणून शास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे मांडव घालावेत.” मग लोकांनी बाहेर जाऊन डाहळ्या आणल्या आणि आपापल्या घरांच्या धाब्यांवर, त्यांच्या अंगणांत, देवाच्या मंदिराच्या अंगणांत, पाणीवेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशीच्या चौकात मांडव घातले. जे लोक बंदिवासातून सुटून परत आले होते त्यांचा अवघा मेळा मांडव घालून त्यांत राहिला; नूनाचा पुत्र येशूवा ह्याच्या काळापासून ह्या दिवसापर्यंत इस्राएल लोकांनी कधी असे केले नव्हते. चोहोकडे आनंदच आनंद झाला. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ नित्य वाची. ह्या प्रकारे त्यांनी सात दिवसांपर्यंत सण पाळला आणि आठव्या दिवशी विधीपूर्वक सणाचा समारोप केला.