YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 4:7-23

नहेम्या 4:7-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

पण जेव्हा सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरूशलेमेच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले. तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन आणि यरूशलेमेविरुध्द हल्ला करण्याचा कट केला आणि तेथे गोंधळ उडवण्याचा त्यांनी बेत केला. पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली. आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले. मग त्यावेळी यहूदी लोक म्हणाले, “भार वाहकांची शक्ती कमी झाली आहे. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा साचला आहे आणि कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही.” आणि आपले शत्रू म्हणतात, “यहूद्यांना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आम्ही त्यांच्यात शिरकाव केलेला असेल आणि आम्ही त्यांना मारुन टाकू म्हणजे कामच थांबेल.” त्यावेळी जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे आले आणि आमच्याविरूद्ध त्यांनी जी योजना केली होती त्याविषयी इशारा देऊन दहा वेळा बोलले. तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काहीजणांना ठेवले. प्रत्येक कुटुंबाला ठराविक जागेवर नेमले. त्यांच्याजवळ तलवारी, भाले आणि धनुष्य ही शस्त्रे होती. सगळी परिस्थिती मी डोळ्यांखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूंची भीती बाळगू नका. आमचा प्रभू, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे, त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद, मुले, मुली, आपल्या स्त्रिया आणि घरेदारे यांच्यासाठी लढा.” आपले बेत आम्हास कळून चुकले आहेत हे आमच्या शत्रूंनी ऐकले आणि देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या वाट्याचे काम करु लागला. त्यादिवसापासून माझे निम्मे सेवक फक्त तटबंदीचे काम करत होते आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य, यासह चिलखत घालत, सर्व यहूदी लोकांच्या पाठीमागे अधिकारी उभे होते. बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती. तलवार कमरेला बांधूनच प्रत्येकजण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इशाऱ्याचे रणशिंग वाजवणारा मनुष्य माझ्या शेजारीच होता. मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालो “ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखुरलेलो आहोत. एकमेकापासून लांब अंतरावर आहोत. तेव्हा कर्ण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे एकत्र गोळा व्हा. आपला देवच आपल्यासाठी लढेल.” अशाप्रकारे आम्ही यरूशलेमेच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्धे लोक हाती भाले घेऊन पहाटेपासून ते सरळ रात्री आकाशात चांदण्या दिसेपर्यंत उभे असत. त्यावेळी मी लोकांस असेही म्हणालो, “प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरूशलेमेच्या आत राहिले पाहिजे. म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील.” मी, माझे बंधू, माझे सेवक, आणि माझ्यामागून चालणारे राखणदार कोणीही आपले कपडे बदली करत नसत आणि पाण्याला जातानासुद्धा आम्ही प्रत्येकजण आपले शस्त्र धारण करीत असे.

सामायिक करा
नहेम्या 4 वाचा

नहेम्या 4:7-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

यरुशलेमेचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे, त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत असे सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी व अश्दोदी ह्यांनी ऐकले तेव्हा त्यांना फार राग आला; त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुशलेमेबरोबर लढू व तेथे गोंधळ उडवून देऊ. पण आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवली. यहूदी लोक म्हणू लागले की, “भारवाहकांची शक्ती क्षीण झाली आहे, व अजून खच फार पडला आहे, तेव्हा आमच्याने हा कोट बांधवणार नाही.” आमचे शत्रू म्हणाले, “आम्ही त्यांच्यामध्ये शिरून त्यांना मारून टाकू व त्यांचे काम बंद पाडीपर्यंत त्यांना काही कळायचे नाही की दिसायचे नाही.” मग जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे दहादा येऊन म्हणाले की, “तुम्ही आमच्याकडे परत या.” ह्या कारणास्तव लोकांच्या हाती तलवारी, बरच्या व धनुष्ये देऊन कोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्यांप्रमाणे मी त्यांना ठेवले. ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.” देवाने आमच्या शत्रूंची मसलत व्यर्थ केली हे आमच्या शत्रूंनी ऐकले तेव्हा आम्ही सगळे कोटाकडे परत जाऊन आपापल्या कामावर रुजू झालो. त्या दिवसापासून माझे अर्धे सेवक कामास लागत व अर्धे भाले, ढाली, धनुष्ये, चिलखते धारण करत आणि यहूदाच्या सर्व घराण्यांमागे त्यांचे सरदार उभे असत. कोट बांधणारे व भारवाहक एका हाताने काम करत व दुसर्‍या हातात शस्त्रे धारण करत. बांधकाम करणारे आपल्या कंबरेस तलवार लावून काम करत. रणशिंग वाजवणारा माझ्याजवळ असे. मी सरदारांना, शास्त्यांना व वरकड लोकांना सांगून ठेवले होते की, “हे काम मोठे व विस्तृत असून कोटावर काम करत असता आपण एकमेकांपासून दूर असतो. तर रणशिंगाचा शब्द जेथे ऐकू येईल तेथे तुम्ही आमच्याकडे एकत्र व्हा; आपला देव आपल्यातर्फे लढेल.” ह्या प्रकारे आम्ही काम करू लागलो; त्यांच्यातले अर्धे लोक पहाटेपासून तारे दिसू लागत तोपर्यंत भाले घेऊन उभे असत. त्या वेळी लोकांना मी हेही सांगितले होते की प्रत्येक मनुष्याने आपल्या दासासह यरुशलेमेच्या आतच रात्रीचे बिर्‍हाडास राहावे म्हणजे ते रात्री आमची रखवाली करतील आणि ते दिवसा काम करतील.” मी आपले कपडे उतरवीत नसे; तसेच माझे भाऊबंद, माझे चाकर आणि माझ्यामागून चालणारे गारदी कोणीही आपले कपडे उतरवीत नसत; ते सर्व आपापली शस्त्रे हाती घेऊन पाण्याला जात.

सामायिक करा
नहेम्या 4 वाचा