नहेम्या 2:11-20
नहेम्या 2:11-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी यरुशलेमेस जाऊन पोहचल्यावर तेथे तीन दिवस होतो. मी रात्रीचा उठून थोडीशी माणसे बरोबर घेतली; यरुशलेमेसंबंधाने काय करावे ह्याविषयी माझ्या देवाने माझ्या मनात घातलेला विचार मी कोणा मनुष्याला सांगितला नाही, आणि माझ्या बसायच्या पाठाळाखेरीज माझ्याबरोबर दुसरे कोणतेही जनावर नव्हते. मी रात्री खोरेवेशीने बाहेर पडून अजगराच्या झर्याकडे, व उकिरडावेशीकडे जाऊन यरुशलेमेचे जे तट पडले होते आणि तिच्या ज्या वेशी अग्नीने जळाल्या होत्या त्यांची पाहणी केली. मग मी तसाच पुढे झरावेशीकडे व राजकुंडाकडे गेलो, पण माझ्या पाठाळास पुढे जाण्यास जागा नव्हती. तेव्हा मी रात्री ओहोळाच्या वाटेने वर चढून कोट लक्षपूर्वक पाहिला; मग मागे वळून खोरेवेशीने परत आत आलो. मी कोठे गेलो होतो व काय केले होते हे सरदारांना ठाऊक नव्हते; मी अद्यापि यहूदी, याजक, अमीर-उमराव, शास्ते व वरकड कामकरी ह्यांतल्या कोणालाही काहीएक सांगितले नव्हते. मग मी त्यांना म्हणालो, “आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हांला दिसतच आहे; यरुशलेम उजाड झाले आहे, व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत; तर चला, आपण यरुशलेमेचा कोट बांधू म्हणजे ह्यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही.” माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले, व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण उठून बांधण्याच्या कामास लागू.” तेव्हा त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिंमत बांधली. हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास आणि गेशेम अरबी ह्यांनी आमची निर्भर्त्सना केली; आम्हांला तुच्छ लेखून ते म्हणाले, “तुम्ही हे काय मांडले आहे? राजाविरुद्ध बंड करता काय?” मी त्यांना उत्तर दिले की, “स्वर्गीचा देव आम्हांला यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कंबर कसून हे बांधणार; पण यरुशलेमेत तुमचा हिस्सा, हक्क किंवा स्मारक राहणार नाही.”
नहेम्या 2:11-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याकरिता मी यरूशलेमेला गेलो आणि तेथे तीन दिवस होतो. मग मी रात्री उठलो, मी काहीजणांना घेऊन बाहेर पडलो. यरूशलेमसाठी काही करण्याचा जो विचार देवाने माझ्या मनात घातला होता त्याबद्दल मी कोणाला काही सांगितले नाही. मी ज्याच्यावर बसलो होतो तो सोडून माझ्याबरोबर कोणताही पशू नव्हता. मी रात्री खोरे वेशीने बाहेर पडून अजगराच्या झऱ्याकडे, उकिरडा वेशीकडे जाऊन यरूशलेमची मोडलेली तटबंदीची भिंत आणि त्यातील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली प्रवेशद्वारे यांची पाहाणी केली. मग कारंजाचे प्रवेशद्वार आणि राजाचा तलाव यांच्याकडे गेलो. पण माझा घोडा पलीकडे जाऊ शकेल इतकीही जागा नव्हती. तेव्हा मी रात्री भिंतीची बारकाईने तपासणी करत खोऱ्यातून वेशीतून आत शिरलो आणि परत फिरलो. मी कोठे गेलो आणि मी काय केले हे अधिकाऱ्यांना माहित नव्हते आणि यहूदी, याजक, राजाचे कुटुंबीय, अधिकारी आणि जे बांधकामाचे काम करणार होते यांच्यापैकी कोणालाही मी काही बोललो नव्हतो. मग मी या सगळयांना म्हणालो, “इथे आपल्याला काय त्रास आहे तो तुम्ही पाहतच आहात. यरूशलेम उजाड आणि उद्ध्वस्त झाले आहे व त्याच्या वेशी आगीत जळून गेल्या आहेत. चला, आता आपण यरूशलेमची तटबंदी पुन्हा बांधू या, म्हणजे आपली आणखी अप्रतिष्ठा होणार नाही.” देवाची माझ्यावर कृपा असल्याचे व राजा माझ्याशी काय बोलला ते मी त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “आपण आताच उठू आणि बांधू!” म्हणून आम्ही या सत्कार्याला सुरुवात केली. पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनाचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली तेव्हा त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. आणि ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?” पण मी त्यांना असे म्हणालो “स्वर्गातील देवच आम्हास यश देईल. आम्ही देवाचे सेवक असून आम्ही हे नगर पुन्हा उभारू. पण यरूशलेमात तुमचा काहीएक अधिकार, वाटा व ऐतिहासीक हक्क नाही.”
नहेम्या 2:11-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यरुशलेमला पोहोचल्यावर तिथे तीन दिवस राहिल्यानंतर, मी थोडे लोक बरोबर घेऊन रात्रीचा बाहेर पडलो. यरुशलेमबद्दल परमेश्वराने माझ्या मनात उत्पन्न केलेली योजना मी कोणालाही सांगितलेली नव्हती. मी स्वार असलेल्या पशूशिवाय इतर कोणताही पशू आमच्यासोबत नव्हता. आम्ही खोरेवेशीतून बाहेर पडलो आणि कोल्ह्याच्या विहिरीवरून, उकिरडा वेशीतून, यरुशलेमच्या पडलेल्या भिंती व जळालेल्या वेशी पाहण्यास गेलो. पुढे आम्ही झर्याच्या वेशीवरून राजकुंडाकडे गेलो. पण तिथे पडलेल्या दगडविटांच्या ढिगांवरून माझा पशू पुढे जाऊ शकेल इतकी तिथे जागा नव्हती. म्हणून रात्र झाल्यावर आम्ही शहराला वळसा घातला आणि मी ओहोळाच्या वाटेने वर चढून कोटाचे निरीक्षण केले व परत खोरेवेशीने आत आलो. शहरातील अधिकार्यांना, मी कुठे गेलो व काय केले याची गंधवार्ताही नव्हती, कारण आतापर्यंत मी माझ्या योजनांबद्दल यहूदी, याजक किंवा प्रतिष्ठित नागरिक वा अधिकारी या कोणाशीही बोललो नव्हतो. नव्हे. जे प्रत्यक्ष काम करणार होते, त्यांच्याशी देखील बोललो नव्हतो. मग मी त्यांना सांगितले, “आपल्या शहराची दुर्दशा तुम्हा सर्वांना माहीतच आहे: यरुशलेम उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्याच्या वेशी जळालेल्या आहेत. आपण यरुशलेमच्या तटाची पुनर्बांधणी करू आणि आपल्यावरील हा कलंक धुऊन टाकू.” परमेश्वराची हस्तकृपा माझ्यावर असून, तसेच माझे राजाशी झालेले बोलणे आणि माझ्या योजनेला त्याने दिलेली संमती, या गोष्टीही मी त्यांना सांगितल्या. त्यांनी उत्तर दिले, “आपण तटाची पुनर्बांधणी सुरू करू या.” आणि अशा रीतीने त्यांनी या सत्कार्याला सुरुवात केली. पण होरोनी सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीयाह आणि गेशेम अरबी यांनी आमच्या या योजनेबद्दल ऐकले, तेव्हा ते आमची थट्टा व उपहास करून म्हणाले, “हे तुम्ही काय करीत आहात? राजाविरुद्ध बंड करता काय?” पण मी उत्तर दिले, “स्वर्गाचे परमेश्वर आम्हाला यश देतील. आम्ही त्यांचे सेवक या तटाची पुनर्बांधणी करू, परंतु यरुशलेममध्ये वा त्यातील ऐतिहासिक कार्यात तुमचा काहीही सहभाग व अधिकार असणार नाही.”