YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 2:11-20

नहेम्या 2:11-20 MARVBSI

मी यरुशलेमेस जाऊन पोहचल्यावर तेथे तीन दिवस होतो. मी रात्रीचा उठून थोडीशी माणसे बरोबर घेतली; यरुशलेमेसंबंधाने काय करावे ह्याविषयी माझ्या देवाने माझ्या मनात घातलेला विचार मी कोणा मनुष्याला सांगितला नाही, आणि माझ्या बसायच्या पाठाळाखेरीज माझ्याबरोबर दुसरे कोणतेही जनावर नव्हते. मी रात्री खोरेवेशीने बाहेर पडून अजगराच्या झर्‍याकडे, व उकिरडावेशीकडे जाऊन यरुशलेमेचे जे तट पडले होते आणि तिच्या ज्या वेशी अग्नीने जळाल्या होत्या त्यांची पाहणी केली. मग मी तसाच पुढे झरावेशीकडे व राजकुंडाकडे गेलो, पण माझ्या पाठाळास पुढे जाण्यास जागा नव्हती. तेव्हा मी रात्री ओहोळाच्या वाटेने वर चढून कोट लक्षपूर्वक पाहिला; मग मागे वळून खोरेवेशीने परत आत आलो. मी कोठे गेलो होतो व काय केले होते हे सरदारांना ठाऊक नव्हते; मी अद्यापि यहूदी, याजक, अमीर-उमराव, शास्ते व वरकड कामकरी ह्यांतल्या कोणालाही काहीएक सांगितले नव्हते. मग मी त्यांना म्हणालो, “आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हांला दिसतच आहे; यरुशलेम उजाड झाले आहे, व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत; तर चला, आपण यरुशलेमेचा कोट बांधू म्हणजे ह्यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही.” माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले, व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण उठून बांधण्याच्या कामास लागू.” तेव्हा त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिंमत बांधली. हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास आणि गेशेम अरबी ह्यांनी आमची निर्भर्त्सना केली; आम्हांला तुच्छ लेखून ते म्हणाले, “तुम्ही हे काय मांडले आहे? राजाविरुद्ध बंड करता काय?” मी त्यांना उत्तर दिले की, “स्वर्गीचा देव आम्हांला यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कंबर कसून हे बांधणार; पण यरुशलेमेत तुमचा हिस्सा, हक्क किंवा स्मारक राहणार नाही.”