नहेम्या 13:10-31
नहेम्या 13:10-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लोकांनी लेव्यांना त्यांचा वाटा दिलेला नाही हे ही मला कळले. त्यामुळे लेवी आणि गायक मंदीर सोडून आपापल्या शेतांवर कामाला गेले होते. म्हणून मी आधिकाऱ्यांना विचारले की “देवाच्या मंदीराकडे दुर्लक्ष का झाले आहे?” मग मी सर्व लेव्यांना बोलवून घेतले आणि मंदिरातील आपापल्या जागी आपापल्या कामावर जायला सांगितले. त्यानंतर यहूदातील सर्व लोकांनी पिकाचा एक दशांश वाटा, नवीन द्राक्षरस आणि तेल मंदिरात आणले. या सगळया गोष्टी कोठारात ठेवण्यात आल्या. कोठारांवर या मनुष्यांना मी नेमलेः शलेम्या हा याजक, सादोक शिक्षक, आणि पदाया नावाचा लेवी. मत्तन्याचा पुत्र जक्कूर याचा पुत्र हानान याला त्यांचा मदतनीस म्हणून नेमले. ते विश्वासू होते. आपल्या नातलगांना नेहमी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे हे त्यांचे काम होते. देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवेसाठी मी जी चांगली कामे केली आहेत ती पुसून टाकू नकोस. यहूदात त्या काळात मी शब्बाथ दिवशी लोकांस द्राक्षरसासाठी द्राक्षे तुडवताना पाहिले. धान्य आणून ते गाढवांवर लादताना मी पाहिले आणि द्राक्षरस, द्राक्षे, अंजीर आणि इतर बऱ्याच जड वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये आणत होते. तेव्हा मी त्यांना विरोध केला कारण केला शब्बाथ दिवशी ते अन्नधान्याची विक्री करीत होते. सोरे नगरातील काही लोक यरूशलेमामध्ये राहत होते आणि ते मासे आणि सर्व प्रकारच्या वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये यहूदी व इतर लोकांस आणून विकत. यहूदातील पुढाऱ्यांना मी विरोध केला त्यांना मी म्हणालो, “तुम्ही फार वाईट गोष्ट करून शब्बाथाला अपवित्र करीत आहात. तुमच्या पूर्वजांनी याच गोष्टी केल्या आहेत ना? म्हणूनच देवाने आपल्यावर आणि आपल्या नगरावर अरिष्ट आणले आहे ना? शब्बाथ दिवस अपवित्र करून तुम्ही इस्राएलावर आणखी संकटे आणावयास पाहता.” प्रत्येक शब्बाथ दिवसापूर्वी रात्री अंधार पडल्यानंतर यरूशलेमेच्या वेशी कडेकोट बंद कराव्यात आणि शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज त्यांचे दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझे काही चाकर मी वेशीवर उभे केले ते यासाठी की, शब्बाथ दिवशी कोणताही माल यरूशलेमेमध्ये येणार नाही. एकदोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारचा माल विकणाऱ्या विक्रेत्यांना यरूशलेमेबाहेर रात्री रहावे लागले. मी त्यांना दरडावून म्हणालो, “कोटाच्या भिंतीलगत रात्री मुक्काम का करता? पुन्हा तुम्ही तसे केल्यास तुम्हास पकडण्यात येईल.” तेव्हापासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी आले नाहीत. मग मी लेवींना त्यांच्या शुद्धीकरणाची आज्ञा दिली आणि येऊन त्यांना वेशींची राखण करण्यास सांगितले. त्यामुळे शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखले जाईल. माझ्या देवा या कृत्यांसाठी माझी आठवण ठेव आणि मजवर दया कर कारण तुझ्या कराराचा विश्वासूपणा माझ्यावर आहे. त्या काळात माझ्या असेही लक्षात आले की काही यहूदी लोकांनी अश्दोदी, अम्मोनी आणि मवाबी स्रियांशी लग्ने केली होती. आणि त्यांची मुले अश्दोदी भाषा अर्धवट बोलत परंतु त्यांना यहूदी भाषा येत नव्हती, पण इतर लोकांच्या भाषेपैकी एक भाषा ते बोलत. ते आपआपल्या जातीची मिश्र भाषा बोलत होते. आणि मी त्यांच्याशी वाद केला आणि त्यांना शाप दिला. आणि काहींना मारहाण करून त्यांचे केस उपटले. त्यांना देवाची शपथ घ्यायला लावून, म्हणालो, “तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नका आणि आपल्या पुत्रांना किंवा आपणांला त्यांच्या कन्या पत्नी करून घेऊ नका. अशा विवाहांमुळेच शलमोनाच्या हातून पाप झाले. पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा नव्हता. तो आपल्या देवाला प्रिय होता आणि देवाने सर्व इस्राएलावर त्यास राजा केले. पण अन्य जातीच्या स्त्रियांनी त्यालाही पापात पाडले. तुमचे ऐकून आम्ही हे घोर पातक करावे काय? परक्या स्त्रियांशी लग्न करून आपल्या देवाविरूद्ध विश्वासघातकी कृत्य करावे काय?” योयादा हा मुख्य याजक एल्याशीब याचा पुत्र, योयादाचा एक पुत्र होरोनाच्या सनबल्लटचा जावई होता. यासाठी त्यास मी माझ्यासमोरून हाकून लावले. हे माझ्या देवा, त्यांनी याजकपणाला अपवित्र केले आहे. याजकपणाचा आणि लेवीपणाचा करार त्यांनी मोडला आहे म्हणून त्यांची आठवण कर. याप्रमाणे मी त्यांना सर्व परकीयांपासून शुद्ध केले आणि लेवी व याजक यांना त्यांची कामे आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्या. लाकडाचे अर्पण व प्रथमफळ आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितासाठी, माझी आठवण कर.
नहेम्या 13:10-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मला असेही समजले की, लेव्यांना जो हिस्सा नेमून दिला होता, तो त्यांना देण्यात आला नव्हता आणि यामुळे ते सर्व लेवी व ज्यांची उपासना घेण्याची जबाबदारी होती, ते संगीतकार आपआपल्या शेतांवर परत निघून गेले होते. मी पुढार्यांना भेटून त्यांचा समाचार घेऊन विचारले, “परमेश्वराच्या भवनाकडे असे दुर्लक्ष का करण्यात आले आहे?” नंतर मी सर्व लेव्यांना परत एकत्र बोलाविले व त्यांच्या पूर्वीच्याच जागी त्यांची नेमणूक केली. आणि पुन्हा एकदा यहूदीयाचे सर्व लोक धान्य, नवा द्राक्षारस व तेलाचे दशांश मंदिराच्या कोठारांत आणू लागले. मी शेलेम्याह याजक, सादोक शास्त्री आणि पदायाह नामक लेवींना कोठारांत अधिकारी म्हणून नेमले व त्यांचा मदतनीस म्हणून हानान, जो जक्कूराचा पुत्र व मत्तन्याहचा नातू होता, याची नेमणूक केली. कारण हे सर्वजण विश्वासयोग्य मानले जात होते. आपल्या लेवी बांधवांना अर्पणाचे वाटप प्रामाणिकपणे करण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली. हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि परमेश्वराच्या भवनासाठी मी जे सर्व अत्यंत विश्वासूपणाने केले आहे ते पुसून टाकू नका. त्या दिवसात मी यहूदीयातील काही पुरुषांना शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडांत द्राक्षे तुडविताना व धान्यांच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादतांना, त्याचप्रमाणे द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थांचे ओझे शब्बाथ दिवशी यरुशलेमला विक्रीसाठी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा मी त्यांना त्या दिवशी हे विक्री करण्यास विरोध केला. सोरचेही काही लोक मासे व नाना प्रकारचे पदार्थ यरुशलेमला आणून शब्बाथ दिवशी यहूदीयांना लोकांना विकत असत. मी यहूदीयाच्या प्रतिष्ठितांना फटकारून विचारले, “तुम्ही हे काय दुराचरण करीत आहात—शब्बाथ भ्रष्ट करीत आहात? तुमच्या पूर्वजांनी हेच केले व त्यामुळेच आपण व आपल्या शहरावर हे संकट परमेश्वराने आणले आहे? आणि आता तर तुम्ही शब्बाथ दिवस अशा रीतीने अपवित्र करून इस्राएली लोकांवर अधिक क्रोध आणत आहात.” यरुशलेमच्या वेशींवर संध्याकाळचा अंधार पडेपर्यंत सर्व दारे बंद केली जावीत व ती शब्बाथ संपेपर्यंत उघडली जाऊ नयेत असा मी आदेश दिला. मग मी माझी काही माणसे वेशीवर पहारा ठेवण्यासाठी नेमली. यासाठी की कुठल्याही प्रकारचा माल शब्बाथ दिवशी शहरात आणला जाऊ नये. सर्वप्रकारच्या सामानाचे व्यापारी व विक्रेते यांनी यरुशलेमबाहेर एक दोनदा रात्र घालविली. पण मी त्यांना ताकीद दिली आणि म्हणालो, “तुम्ही येथे तटाजवळ रात्र का घालविली? परत असे काही केले, तर मी तुम्हाला अटक करेन.” मग त्या दिवसानंतर परत ते शब्बाथ दिवशी आले नाही. नंतर मी लेव्यांना आज्ञा दिली की त्यांनी स्वतःला शुद्ध करून घ्यावे आणि शब्बाथ दिवसाचे पावित्र्य राखण्यासाठी वेशींवर पहारा ठेवावा. हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि आपल्या विपुल प्रीतीनुसार मजवर दया करा. याच सुमारास माझ्या निदर्शनास आले की काही यहूदी पुरुषांनी अश्दोदी, अम्मोनी व मोआबी स्त्रियांशी विवाह केला होता. त्यांची अर्धी मुलेबाळे अश्दोदी अथवा इतर लोकांची भाषा बोलत होती, पण त्यांना यहूदीयाची भाषा बोलता येत नसे. तेव्हा मी त्यांना धमकाविले, त्यांना शाप दिला. काही पुरुषांना मार दिला व त्यांचे केस उपटून परमेश्वराची शपथ घालून त्यांच्याकडून वचन घेतले व म्हटले, “इतःपर तुम्ही आपल्या कन्यांचा त्यांच्या पुत्रांशी वा त्यांच्या कन्यांचा आपल्या पुत्रांशी विवाह करून देणार नाही. शलोमोन राजा अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला नव्हता काय? त्याच्याशी तुलना करता येईल असा दुसरा राजा अनेक राष्ट्रांमध्ये नव्हता आणि परमेश्वराने त्याच्यावर प्रीती केली व त्याला संपूर्ण इस्राएलचा राजा केले. असे असूनही त्याला यहूदीतर स्त्रियांनी पापाकडे वळविले. आता तुम्हीही तोच सर्व भयंकर दुष्टपणा करता व यहूदीतर स्त्रियांशी विवाह करून परमेश्वराशी विश्वासघात करीत आहात हे आम्ही ऐकावे काय?” मुख्य याजक एल्याशीबचा पुत्र यहोयादाच्या पुत्रांपैकी एकजण सनबल्लट होरोनी याचा जावई होता, म्हणून मी त्याला माझ्यापासून दूर हाकलून दिले. हे माझ्या परमेश्वरा, त्यांनी याजकपद व याजकांचे आणि लेव्यांचे करार भ्रष्ट केले आहेत, त्यांची तुम्ही आठवण ठेवा. तेव्हा मी त्या याजक व लेव्यांना सर्व यहूदीतर गोष्टींपासून शुद्ध करून घेतले. याजकांची व लेव्यांची कामे आणि प्रत्येकाला त्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या. वेदीसाठी वेळच्या वेळी लाकडे आणि अर्पणांची आणि हंगामातील प्रथम उपजाची अर्पणे पुरविली.
नहेम्या 13:10-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मला आणखी असे कळले की लेव्यांना वाटे न मिळाल्यामुळे कामावरले लेवी व गायक आपापल्या शेतांवर पळून गेले होते. मग मी अधिपतींशी वाद करून म्हणालो की, “लोकांनी देवाचे मंदिर का सोडून दिले आहे?” नंतर मी त्यांना एकत्र करून त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी नेमले. मग सर्व यहूदी लोक धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे दशमांश भांडारात पावते करू लागले; आणि मी शलेम्या याजक, सादोक शास्त्री आणि लेव्यांपैकी पदाया ह्यांना भांडारावर भांडारी नेमले; त्यांच्या हाताखाली हनान बिन जक्कूर बिन मत्तन्या हा होता; हे भरवशाचे होते; त्यांच्या भाऊबंदांना वाटे करून देण्याचे काम मी त्यांच्याकडे सोपवले. हे माझ्या देवा, ह्या कामगिरीबद्दल माझे स्मरण ठेव; माझ्या देवाचे मंदिर व त्यातील उपासना यासंबंधाने चांगली कामे मी केली आहेत, ती पुसून टाकू नकोस. त्या दिवसांत यहूदात काही लोक शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवत असलेले माझ्या दृष्टीस पडले. ते धान्याच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादत; त्याप्रमाणेच द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थ ह्यांचे बोजे शब्बाथ दिवशी ते यरुशलेमेत घेऊन येत. त्यांनी अन्नसामग्रीची विक्री चालवली त्याच दिवशी त्यांची मी कानउघाडणी केली. तेथे सोरकरही राहत असत; ते मासे व नाना प्रकारचे पदार्थ आणून शब्बाथ दिवशी यहूदी लोक व यरुशलेमकर ह्यांना विकत असत. मग यहूदाच्या सरदार मंडळीशी वाद करून मी म्हणालो, “तुम्ही असले दुष्कर्म करून शब्बाथ दिवस पवित्र असा पाळत नाही, हे काय? तुमच्या वाडवडिलांनीही असेच केले ना? त्यामुळे देवाने आमच्यावर व ह्या नगरावर हे सर्व अरिष्ट आणले ना? तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र न मानून इस्राएलावर आणखी अरिष्ट आणायला पाहता.” शब्बाथ सुरू होण्यापूर्वी यरुशलेमेच्या वेशींच्या आसपास अंधार पडू लागे; म्हणून मी आज्ञा केली की वेशींचे दरवाजे लावून घ्यावेत आणि शब्बाथ संपेपर्यंत ते उघडू नयेत; शब्बाथ दिवशी काहीएक बोजा आत आणता येऊ नये म्हणून मी आपले काही चाकर वेशीवर ठेवले. एकदोन वेळा व्यापार्यांना व हरतर्हेच्या मालाची विक्री करणार्यांना यरुशलेमेच्या बाहेर राहावे लागले. तेव्हा मी त्यांना दरडावून म्हटले, “तुम्ही कोटासमोर का उतरलात? पुन्हा असे केल्यास तुमच्यावर मी हात टाकीन.” तेव्हापासून ते पुन्हा शब्बाथ दिवशी आले नाहीत. मग मी लेव्यांना आज्ञा केली की, ‘शब्बाथ दिवस पवित्र मानून पाळावा म्हणून तुम्ही शुद्ध होऊन वेशीवर पहारा करण्यास येत जा.’ हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझ्या ह्याही कामगिरीचे स्मरण ठेव, आणि तुझ्या विपुल दयेस अनुसरून माझा बचाव कर. त्या दिवसांत अश्दोदी, अम्मोनी व मवाबी स्त्रियांशी लग्ने केलेले यहूदी लोक मला आढळले; त्यांची मुलेबाळे अर्धवट अश्दोदी भाषा बोलत, त्यांना यहूदी भाषा बोलता येत नसे, ते आपापल्या जातींची मिश्र भाषा बोलत. मी त्या लोकांशी वाद केला, मी त्यांना शिव्याशाप दिले, त्यांतल्या कित्येकांना मार दिला आणि त्यांचे केस उपटून देवाची शपथ घेऊन असे म्हणायला लावले की, “आम्ही इत:पर आमच्या कन्या त्यांच्या पुत्रांना देणार नाही आणि त्यांच्या कन्या आम्ही व आमचे पुत्र करणार नाही. इस्राएलाचा राजा शलमोन अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला होता ना? पुष्कळ राष्ट्रांत त्याच्यासारखा कोणी राजा झाला नाही; तो देवाचा आवडता असून त्याला सर्व इस्राएलावर राजा केले होते, तरी त्यालाही अन्य जातींच्या स्त्रियांनी पापात पाडले. तुमचे ऐकून आम्ही अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह करून आमच्या देवाचे अपराधी व्हावे व घोर पातक करावे काय?” मुख्य याजक एल्याशीब ह्याचा पुत्र योयादा ह्याच्या पुत्रांपैकी एक जण सनबल्लट होरोनी ह्याचा जावई होता; मी त्याला आपल्याजवळून हाकून लावले. हे माझ्या देवा, त्यांनी याजकपद भ्रष्ट केले आहे आणि याजकवृत्तीचा व लेवीवृत्तीचा करार मोडला आहे, म्हणून त्यांची आठवण ठेव. ह्या प्रकारे मी त्यांना सगळ्या परकीयांपासून शुद्ध करून प्रत्येक याजकाची व लेव्याची पाळी आणि अनुक्रम ही ठरवून दिली; मग लाकडाचे अर्पण व प्रथमउपज आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव.