मार्क 7:1-8
मार्क 7:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेम शहराहून आले होते, ते येशूभोवती जमले. आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध, म्हणजे विधीग्रंथ हात न धुता जेवताना पाहिले. कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांचे नियम पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत. बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीती ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसरे इतर नियमही पाळतात. मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या नियम प्रमाणे का जगत नाहीत? हात न धुता का जेवतात?” येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांस शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’ तुम्ही देवाच्या आज्ञांचा त्याग केला असून, आता तुम्ही मनुष्याची परंपरा पाळत आहात.”
मार्क 7:1-8 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परूशी आणि यरुशलेम नगरातून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंच्या भोवती गोळा झाले. येशूंचे काही शिष्य अशुद्ध हाताने, म्हणजे हात न धुताच जेवतात, असे त्यांनी पाहिले होते. परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडिलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत. ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत. या कारणामुळे परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूंना विचारले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडिलांच्या परंपरा प्रमाणे का वागत नाहीत व ते आपले हात अशुद्ध असताना का जेवतात?” यावर येशूंनी उत्तर दिले, “यशया संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; तो म्हणतो: “ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची हृदये माझ्यापासून फार दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण हे केवळ मनुष्यांनी केलेले नियमच असतात.’ तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.”
मार्क 7:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा परूशी व यरुशलेमेहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत; बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत; आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व असल्या बर्याच दुसर्या रूढी ते पाळतात. ह्यावरून परूश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत?” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा : ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, ते असतात मनुष्यांचे नियम.’ तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. [म्हणजे घागरी व प्याले धुणे व ह्यांसारखीच इतर अनेक कामे करता.]”
मार्क 7:1-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यावेळी काही परुशी व यरुशलेमहून आलेले शास्त्री येशूभोवती एकत्र जमले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परुशी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या रूढीला अनुसरून हात धुतल्यावाचून जेवत नसत. बाजारातून आणलेल्या वस्तू प्रथम धुतल्याशिवाय ते खात नसत. तसेच पेले, घागरी व पितळेची भांडी धुणे, अशा बऱ्याच इतर रूढी ते पाळत असत. म्हणूनच परुश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे ते का चालत नाहीत?” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हां ढोंग्यांविषयी यशयाने योग्य भाकीत करून ठेवले आहे. त्याचा लेख असा: हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते माझी व्यर्थ उपासना करतात, कारण ते धर्मशास्त्र म्हणून मनुष्यांचे नियम शिकवतात. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून माणसांच्या परंपरेला चिकटून राहता.”