मार्क 6:17-29
मार्क 6:17-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती कारण त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले होते. व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.” याकरिता हेरोदीयेने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्यास ठार मारण्याची संधी पाहत होती. परंतु ती त्यास मारू शकली नाही, कारण योहान नीतिमान आणि पवित्र मनुष्य आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरीत असे व त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा, फार गोंधळून जाई, तरी तो त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेत असे. मग एके दिवशी अशी संधी आली की हेरोदिया काहीतरी करू शकेली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालील प्रांतातील प्रमुख लोकांस मेजवानी दिली. हेरोदीयाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदित केले. तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.” तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मागशील ते मी तुला देईन.” ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.” आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.” राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्यास तिला नकार द्यावा असे वाटले नाही. तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठवले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले. ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले. हे ऐकल्यावर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले.
मार्क 6:17-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण हेरोदाने योहानाला बांधून तुरुंगात टाकण्यासाठी हुकूम दिला होता. हेरोदाने हे यासाठी केले, की त्याचा भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिच्याशी त्याने विवाह केला होता. कारण योहान हेरोदाला म्हणत असे, “आपला भाऊ फिलिप्पाची पत्नी हेरोदिया हिला तू ठेवावे हे नियमाने अयोग्य आहे.” यामुळे हेरोदियाने योहानाविरुद्ध डाव धरला होता आणि ती योहानाचा जीव घेण्यास पाहत होती. परंतु ती काही करू शकत नव्हती, कारण हेरोद योहानाला भीत असे आणि तो नीतिमान व पवित्र मनुष्य आहे म्हणून त्याचे संरक्षण करत असे. हेरोद योहानाचे बोलणे ऐकून गोंधळात पडत असे; तरी त्याचे ऐकून घ्यावयास त्याला आवडे असे. अखेर योग्य समय आला. हेरोदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या दरबारातील मुख्य अधिकारी आणि लष्करातील सेनापती तसेच गालील प्रांतातील प्रमुख नागरिकांना मोठी मेजवानी दिली. त्या समारंभात हेरोदियेची कन्या आत आली व नृत्य करून तिने हेरोदाला संतुष्ट केले आणि त्याचबरोबर मेजवानीसाठी आलेल्या इतर पाहुणे मंडळीलाही खुश केले. हेरोद राजाने मुलीला म्हटले, “तुला हवे असेल ते माग आणि ते मी तुला देईन.” शपथ घेऊन व वचन देऊन तो तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्याइतके जे काही तू मला मागशील, ते मी तुला देईन.” ती बाहेर गेली आणि आपल्या आईला विचारले, “मी काय मागू?” आईने सल्ला दिला, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिर माग.” घाईघाईने ती मुलगी राजाकडे परत आली आणि त्याला म्हणाली, “मला बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिर तबकात घालून आता हवे आहे.” तेव्हा राजा अतिशय अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे तिला नकार देणे त्याला बरे वाटले नाही. शेवटी राजाने आपल्या एका शिरच्छेद करणार्याला तुरुंगात पाठवून योहानाचे शिर आणण्याची आज्ञा केली. त्या मनुष्याने योहानाचा तुरुंगात शिरच्छेद केला, आणि त्याचे शिर तबकात घालून त्या मुलीला दिले व तिने ते आपल्या आईला दिले. ही घटना ऐकल्यानंतर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि कबरेत ठेवले.
मार्क 6:17-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जखडून ठेवले होते; कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते, व योहान त्याला म्हणत असे, “तू आपल्या भावाची बायको ठेवावीस हे सशास्त्र नाही.” ह्याकरता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना; कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई. नंतर एक सोईचा दिवस आला. तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार व गालीलातील प्रमुख लोक ह्यांना मेजवानी दिली. आणि हेरोदियेच्या मुलीने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदाला व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांना खूश केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन.” तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.” तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर!” तेव्हा लगेचच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, “माझी इच्छा अशी आहे की, बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे.” तेव्हा राजा फारच खिन्न झाला; तथापि वाहिलेल्या शपथांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याला तिला नाही म्हणावेसे वाटले नाही. राजाने लगेच आपल्या पहार्यातील एका शिपायाला पाठवून योहानाचे शीर आणण्याची आज्ञा केली; त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला, आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले. हे ऐकल्यावर त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले.
मार्क 6:17-29 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हेरोदचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदने स्वतः माणसे पाठवून योहानला पकडून कैदेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदने तिच्याबरोबर लग्न केले होते व योहान त्याला सांगत असे, “तू तुझ्या भावाची बायको ठेवावीस, हे धर्मशास्त्राला धरून नाही.” ह्यासाठी हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करायला पाहत होती. परंतु तिचे काही चालेना. योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे, हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐकायचा, तेव्हा फार अस्वस्थ व्हायचा, तरीही त्याचे म्हणणे ऐकायला त्याला आवडत असे. शेवटी हेरोदियाला एक संधी मिळाली. हेरोदने त्याच्या वाढदिवशी त्याचे सरकारी प्रधान, सैन्यातील सरदार व गालीलमधील प्रमुख नागरिक ह्यांना मेजवानी दिली. तेव्हा हेरोदियाच्या मुलीने स्वतः तेथे येऊन नृत्य करून हेरोद व त्याच्याबरोबर भोजनाला बसलेले पाहुणे ह्यांना खूष केले. त्या वेळी राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे, ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन.” तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.” तिने बाहेर जाऊन तिच्या आईला विचारले, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर.” तिने लगेच घाईघाईने राजाकडे येऊन म्हटले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे, अशी माझी इच्छा आहे.” राजा फारच खिन्न झाला. तरी पण वाहिलेल्या शपथेमुळे व भोजनाला बसलेल्या पाहुण्यांमुळे त्याला नाही म्हणवेना. राजाने लगेच त्याच्या रक्षकांतील एका शिपायास पाठवून योहानचे शिर आणण्याचा आदेश दिला. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला. शिर तबकात घालून ते मुलीला देण्यात आले व मुलीने ते तिच्या आईला दिले. हे ऐकल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून कबरीत नेऊन ठेवला.