हेरोदचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदने स्वतः माणसे पाठवून योहानला पकडून कैदेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदने तिच्याबरोबर लग्न केले होते व योहान त्याला सांगत असे, “तू तुझ्या भावाची बायको ठेवावीस, हे धर्मशास्त्राला धरून नाही.” ह्यासाठी हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करायला पाहत होती. परंतु तिचे काही चालेना. योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे, हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐकायचा, तेव्हा फार अस्वस्थ व्हायचा, तरीही त्याचे म्हणणे ऐकायला त्याला आवडत असे. शेवटी हेरोदियाला एक संधी मिळाली. हेरोदने त्याच्या वाढदिवशी त्याचे सरकारी प्रधान, सैन्यातील सरदार व गालीलमधील प्रमुख नागरिक ह्यांना मेजवानी दिली. तेव्हा हेरोदियाच्या मुलीने स्वतः तेथे येऊन नृत्य करून हेरोद व त्याच्याबरोबर भोजनाला बसलेले पाहुणे ह्यांना खूष केले. त्या वेळी राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे, ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन.” तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.” तिने बाहेर जाऊन तिच्या आईला विचारले, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर.” तिने लगेच घाईघाईने राजाकडे येऊन म्हटले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे, अशी माझी इच्छा आहे.” राजा फारच खिन्न झाला. तरी पण वाहिलेल्या शपथेमुळे व भोजनाला बसलेल्या पाहुण्यांमुळे त्याला नाही म्हणवेना. राजाने लगेच त्याच्या रक्षकांतील एका शिपायास पाठवून योहानचे शिर आणण्याचा आदेश दिला. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला. शिर तबकात घालून ते मुलीला देण्यात आले व मुलीने ते तिच्या आईला दिले. हे ऐकल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून कबरीत नेऊन ठेवला.
मार्क 6 वाचा
ऐका मार्क 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 6:17-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ