YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 3:22-35

मार्क 3:22-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तसेच यरूशलेम शहराहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, याच्यामध्ये बालजबूल आहे आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने हा भूते काढतो. मग येशूने त्यांना आपणाजवळ बोलावून दाखल्याच्या साहाय्याने त्यांना सांगू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील? आपापसात फूट पडलेले राज्य टिकू शकत नाही. आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही. जर सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही, तर त्याचा शेवट होईल. खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान मनुष्यास बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.” मी तुम्हास खरे सांगतो की, “लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल. पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.” येशू असे म्हणाला कारण त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे असे ते त्याच्याविषयी म्हणत होते. तेव्हा येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्यास बोलावले. लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत.” त्याने त्यांना उत्तर दिले, “माझी आई व माझे भाऊ कोण आहेत?” मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, “पाहा माझी आई आणि माझे भाऊ. जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई.”

सामायिक करा
मार्क 3 वाचा

मार्क 3:22-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्र शिक्षक म्हणाले, “तो बालजबूलाने पछाडलेला आहे! तो भुतांचा राजा सैतान याच्या साहाय्याने भुते घालवितो.” येशूंनी त्यांना जवळ बोलाविले आणि त्यांच्याबरोबर दाखल्याने बोलण्यास सुरुवात केली: “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल? जर एखाद्या राज्यात फूट पडली तर ते राज्य स्थिर राहू शकत नाही. जर एखाद्या घरात फूट पडलेली आहे, तर ते घर स्थिर राहू शकत नाही. सैतानच स्वतःविरुद्ध झाला आणि सैतानातच फूट पडली तर त्याचा टिकाव लागणार नाही; त्याचा शेवट झालाच आहे. खरोखर, एखाद्या बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बळकट मनुष्याला बांधले पाहिजे मगच त्याचे घर लुटता येईल. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मनुष्याला सर्व पापांची व प्रत्येक दुर्भाषण केल्याची क्षमा होईल, परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत.” असे त्यांनी म्हटले कारण येशूंमध्ये, “अशुद्ध आत्मा आहे” असे ते म्हणत होते. इतक्यात येशूंची आई आणि भाऊ येऊन बाहेर उभे राहिले आणि एकाला त्यांना बोलविण्यास पाठविले. त्यांच्या सभोवती समुदाय बसला होता आणि त्याने त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर थांबले आहेत आणि ते तुमचा शोध घेत आहेत.” यावर त्यांनी म्हटले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?” नंतर सभोवतालच्या समुदायाकडे नजर फिरवित ते म्हणाले, “ही माझी आई आणि माझे भाऊ आहेत! जो कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि आई आहे.”

सामायिक करा
मार्क 3 वाचा

मार्क 3:22-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तसेच यरुशलेमेहून आलेले शास्त्री म्हणत होते की, “त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भुतांच्या अधिकार्‍याच्या साहाय्याने भुते काढतो.” तेव्हा तो त्यांना आपणाजवळ बोलावून म्हणू लागला की, “सैतान सैतानाला कसा काढील? आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठला व त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही; त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. मी तुम्हांला खचीत सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे.” “त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे,” असे ते म्हणत होते म्हणून तो हे बोलला. तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले, आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्याच्याभोवती पुष्कळ लोक बसले होते; ते त्याला म्हणाले, “पाहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत.” त्याने त्यांना उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?” मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, ही माझी आई व हे माझे भाऊ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई.”

सामायिक करा
मार्क 3 वाचा

मार्क 3:22-35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तसेच यरुशलेमहून आलेले काही शास्त्री म्हणत होते की, त्याला बालजबूलने पछाडले आहे व त्या भुतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने तो भुते काढतो. तो त्यांना स्वतःजवळ बोलावून दाखले देऊन म्हणू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील? आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही. तसेच सैतानाच्या राज्यात फूट पडली तर तेही टिकणार नाही; त्याचा शेवट होईल. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता कुणालाही लुटता येणार नाही, त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. मी तुम्हांला खरोखर सांगतो, लोकांना त्यांच्या सर्व पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणाची क्षमा होईल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याला क्षमा मुळीच मिळणार नाही कारण तो शाश्वत पापाचा दोषीठरतो.” त्याला भुताने पछाडले आहे, असे काही लोक म्हणत होते म्हणून त्याने हे उत्तर दिले. येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून येशूला बोलावले. त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, “आपली आई व आपले भाऊ बाहेर आपल्याविषयी विचारपूस करत आहेत.” त्याने त्यांना उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?” जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”

सामायिक करा
मार्क 3 वाचा