YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 3:22-35

मार्क 3:22-35 MACLBSI

तसेच यरुशलेमहून आलेले काही शास्त्री म्हणत होते की, त्याला बालजबूलने पछाडले आहे व त्या भुतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने तो भुते काढतो. तो त्यांना स्वतःजवळ बोलावून दाखले देऊन म्हणू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील? आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही. तसेच सैतानाच्या राज्यात फूट पडली तर तेही टिकणार नाही; त्याचा शेवट होईल. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता कुणालाही लुटता येणार नाही, त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. मी तुम्हांला खरोखर सांगतो, लोकांना त्यांच्या सर्व पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणाची क्षमा होईल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याला क्षमा मुळीच मिळणार नाही कारण तो शाश्वत पापाचा दोषीठरतो.” त्याला भुताने पछाडले आहे, असे काही लोक म्हणत होते म्हणून त्याने हे उत्तर दिले. येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून येशूला बोलावले. त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, “आपली आई व आपले भाऊ बाहेर आपल्याविषयी विचारपूस करत आहेत.” त्याने त्यांना उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?” जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”