मार्क 13:1-23
मार्क 13:1-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू परमेश्वराच्या भवनातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एकजण त्यास म्हणाला, “गुरूजी, पाहा, कसे हे अद्भूत धोंडे व बांधलेली इमारत आहे.” येशू त्यास म्हणाला “तू या मोठ्या इमारती पाहतोस ना? येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक खाली पाडला जाईल.” येशू परमेश्वराच्या भवनासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्यास एकांतात विचारले, “या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हास सांगा आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?” नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील. जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या अफवाविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील आणि दुष्काळ पडतील. पण या गोष्टी म्हणजे केवळ नाशाची सुरूवात आहे. तुम्ही सावध असा. ते तुम्हास न्यायसभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हास मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हास राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे रहावे लागेल. या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे. ते तुम्हास अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळजी करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल. भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील. आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल. जेव्हा तुम्ही नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट, दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जो जिथे नको तेथे पाहाल. (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा) तेव्हा जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये. आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये. त्या दिवसात ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पाजत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल. हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल. परमेश्वराने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या मनुष्यांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत. आणि जर कोणी तुम्हास म्हणेल की ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे,’ तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांस फसवण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील. पहा, तेव्हा तुम्ही सावध राहा. मी काळापूर्वीच तुम्हास सर्वकाही सांगून ठेवले आहे.
मार्क 13:1-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू मंदिरातून बाहेर निघत असताना, त्यांच्या शिष्यांपैकी एकजण त्यांना म्हणाले, “पाहा ना, गुरुजी! किती भव्य हे दगड आणि सुंदर इमारती!” येशू उत्तरले, “तुम्ही आता या भव्य इमारती पाहता ना? याच्या एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड पाडला जाईल.” येशू मंदिरासमोर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर बसले असताना, पेत्र, याकोब, योहान आणि आंद्रिया यांनी त्यांना खाजगी रीतीने विचारले, “या घटना केव्हा घडतील या गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास काय चिन्ह असतील हे आम्हाला सांगा.” येशू त्यांना म्हणाले, “कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा. कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि, ‘तो मीच आहे,’ असा दावा करतील आणि पुष्कळांना फसवतील. जेव्हा तुम्ही लढायांसंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, तेव्हा तुम्ही घाबरू नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण शेवट अजूनही यावयाचा आहे. कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळ पडतील. या गोष्टी तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत. “तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल आणि माझ्यामुळे तुम्हाला राज्यपाल आणि राजे त्यांच्यापुढे माझे साक्षी व्हावे लागेल. प्रथम शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झालाच पाहिजे. परंतु जेव्हा ते तुम्हाला धरून नेतील व तुमच्याविरुद्ध खटला सुरू होईल, तेव्हा तुम्ही काय बोलावे याविषयी आधी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला जे सुचविले जाईल ते बोला. कारण तुम्ही ते बोलणार नाही, तर पवित्र आत्मा बोलेल. “भाऊ भावाला, पिता आपल्या पोटच्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील. माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील, त्याचे मात्र तारण होईल. “जेव्हा तुम्ही ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ ज्या ठिकाणी त्याचा संबंध नाही, त्या ठिकाणी उभा असलेला पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता प्रवेश करू नये; जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये. गर्भवती आणि दूध पाजणार्या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल! तरी हे हिवाळ्यामध्ये होऊ नये, म्हणून प्रार्थना करा, कारण ते दिवस इतके कष्टाचे असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत. “जर प्रभूने ते दिवस कमी केले नसते, तर कोणी वाचला नसता. तरी केवळ निवडलेल्या लोकांसाठी, ज्यांना त्यांनी निवडले आहे, त्यांच्यासाठी ते कमी केले जातील. त्या काळात, ‘येथे ख्रिस्त आहे!’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका. कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील. म्हणून तुम्ही सावध राहा. मी तुम्हाला आधी सर्वकाही सांगून ठेवलेले आहे.
मार्क 13:1-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग तो मंदिरातून निघून जात असता एक शिष्य त्याला म्हणाला, “गुरूजी, पाहा, कसे हे चिरे व कशा ह्या इमारती!” येशू त्याला म्हणाला, “ह्या मोठ्या इमारती तू पाहतोस ना? जमीनदोस्त केला जाणार नाही असा चिर्यावर चिरा येथे राहणार नाही.” नंतर तो मंदिरासमोर जैतुनांच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला एकान्तात विचारले, “ह्या गोष्टी कधी घडतील? आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल हे आम्हांला सांगा.” येशू त्यांना म्हणू लागला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन ‘मीच तो [ख्रिस्त] आहे’ असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील. आणखी तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका; ह्या गोष्टी होणे आवश्यक आहे; परंतु तेवढ्यानेच शेवट होणार नाही. कारण, ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’. आणि जागोजागी भूमिकंप [व दंगे] होतील व दुष्काळ पडतील; हा तर वेदनांचा प्रारंभ होय. तुम्ही आपणांला सांभाळा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, सभास्थानांमध्ये तुम्हांला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्यांच्यापुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हांला माझ्याकरता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल. प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे. ते तुम्हांला धरून नेऊन चौकशीकरता स्वाधीन करतील तेव्हा आपण कसे काय बोलावे ह्याविषयी अगोदर चिंता करू नका; तर त्या घटकेस जे काही तुम्हांला सुचवून दिले जाईल ते बोला; कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही तर पवित्र आत्मा हाच बोलणारा आहे. तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारवण्याकरता धरून देईल आणि ‘मुले आपल्या आईबापांवर उठतील’ व त्यांचा प्राणघात करवतील; आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल. [दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला] ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जेथे नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल (वाचकाने हे समजून घ्यावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरता आत जाऊ नये; आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता परत येऊ नये. त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर किंवा अंगावर पाजणार्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! तरी हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण देवाने निर्माण केलेल्या ‘सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झालेल्या नाहीत’ व पुढेही होणार नाहीत ‘इतक्या हालअपेष्टांचे’ ते दिवस होतील. आणि ते दिवस प्रभूने कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता; परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत. त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हणेल की, ‘पाहा ख्रिस्त अमुक ठिकाणी आहे,’ ‘पाहा, तमुक ठिकाणी आहे,’ तर ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उपस्थित होतील, आणि साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’ तुम्ही तर सावध राहा; मी अगोदरच तुम्हांला सर्वकाही सांगून ठेवले आहे.
मार्क 13:1-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक त्याला म्हणाला, “गुरुवर्य, पाहा, काय हे चिरे व काय ह्या इमारती !” येशू त्याला म्हणाला, “ह्या भव्य इमारती तू पाहतोस ना? पाडला जाणार नाही, असा चिऱ्यावर चिरा तेथे राहणार नाही.” तो मंदिरासमोर ऑलिव्ह डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला खाजगीरीत्या विचारले, “ह्या गोष्टी कधी घडतील आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याची वेळ होईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल, हे आम्हांला सांगा.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मी तो आहे, असे सांगून पुष्कळांना फसवतील. आणखी, तुम्ही लढायांविषयी व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका. ह्या गोष्टी होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होणार नाही. राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ आहे. तुम्ही स्वतःला सांभाळा. ते तुम्हांला न्यायसभांच्याा स्वाधीन करतील. सभास्थानांमध्ये तुम्हांला मारहाण केली जाईल. माझ्याकरता तुम्ही साक्ष द्यावी म्हणून राज्यपाल व राजांसमोर तुम्हांला उभे राहावे लागेल. परंतु प्रथम सर्व राष्ट्रांत शुभवर्तमानाची घोषणा होणे आवश्यक आहे. ते तुम्हांला धरून न्यायालयात नेतील, तेव्हा आपण काय बोलावे, ह्याविषयी अगोदर चिंता करू नका, तर त्या घटकेस जे काही तुम्हांला सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही तर बोलणारा पवित्र आत्मा आहे. त्या वेळी भाऊ भावाला व वडील मुलाला ठार मारण्याकरता धरून देतील. मुले आपल्या आईबापांवर उठतील व त्यांचा प्राणघात करवतील. माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील, त्याचा उद्धार होईल. मात्र जेथे ‘ओसाड अमंगल दुश्चिन्ह’ नसावे तेथे ते असलेले तुम्ही पाहालविाचकाने हे समजून घ्यार्वें तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. जो छपरावर असेल त्याने घरातून काही घेण्याकरता खाली उतरू नये किंवा आत जाऊ नये, जो शेतात असेल त्याने आपले कपडे घेण्याकरता घरी परत जाऊ नये. त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर असतील किंवा अंगावर पाजणाऱ्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा; कारण देवाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झाल्या नाहीत व पुढे होणार नाहीत अशा हालअपेष्टांचे ते दिवस असतील. मात्र ते दिवस प्रभूने कमी केले नसते, तर कोणीही वाचला नसता. ज्यांना त्याने निवडले आहे, त्यांच्यासाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत. त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हणेल, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे’, किंवा ‘पाहा, ख्रिस्त तेथे आहे’, तर ते खरे मानू नका; कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुत गोष्टी दाखवतील. तुम्ही मात्र सावध राहा, मी अगोदरच तुम्हांला सर्व काही सांगून ठेवले आहे.