मार्क 1:16-20
मार्क 1:16-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले. त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
मार्क 1:16-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” हे ऐकताच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले. थोडे पुढे जाताच, त्यांनी जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना होडीत बसून आपली जाळी तयार करताना पाहिले. त्यांनी उशीर न करता त्यांना बोलावले, तेव्हा ते आपला पिता जब्दी याला नावेमध्ये मजुरांबरोबर सोडून त्यांच्यामागे गेले.
मार्क 1:16-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर गालील समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.” मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले. आणि त्याने त्यांना लगेचच बोलावले; मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
मार्क 1:16-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एकदा गालील सरोवराजवळून जात असताना येशूला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते कोळी होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” ते लगेच त्यांची जाळी सोडून येशूच्या मागे निघाले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचे मुलगे याकोब व योहान दिसले. ते त्यांच्या तारवात जाळी नीट करीत होते. त्याने त्यांनाही बोलावले. तेव्हा त्यांचे वडील जब्दी ह्यांना नोकरांबरोबर तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.