YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 1:14-45

मार्क 1:14-45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली. तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले. त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले. नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवीत होता. त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला, आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.” परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.” “नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.” लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!” येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली. येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले. सर्व नगर दरवाजापुढे जमा झाले. त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्यास ओळखत होती. मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते, व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.” मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला. एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला. येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले. आणि म्हटले, “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.” परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.

सामायिक करा
मार्क 1 वाचा

मार्क 1:14-45 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

योहानाला बंदिवासात टाकल्यानंतर, परमेश्वराच्या शुभवार्तेची घोषणा करीत येशू गालील प्रांतात आले. ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!” एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.” लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले. थोडे पुढे जाताच, त्यांनी जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना होडीत बसून आपली जाळी तयार करताना पाहिले. त्यांनी उशीर न करता त्यांना बोलाविले, तेव्हा ते आपला पिता जब्दी याला नावेमध्ये मजुरांबरोबर सोडून त्यांच्यामागे गेले. ते कफर्णहूम येथे गेले, आणि शब्बाथ आला तेव्हा सभागृहामध्ये जाऊन शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते. इतक्यात, सभागृहामध्ये अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला, “हे नासरेथकर येशू, तुम्हाला आमच्याशी काय काम? तुम्ही आमचा नाश करावयास आले काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन आहेस!” “गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!” त्या अशुद्ध आत्म्याने किंकाळी फोडली आणि त्या मनुष्याला पिळवटून तो त्याच्यामधून निघून गेला. हे पाहून सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे? नवी शिकवण आणि काय हा अधिकार! ते अशुद्ध आत्म्यांना आदेश करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.” त्यांच्याबद्दलची बातमी पूर्ण गालील प्रांताच्या सर्व भागात झपाट्याने पसरत गेली. सभागृहातून बाहेर पडल्याबरोबर ताबडतोब, याकोब व योहानासह शिमोन व आंद्रियाच्या घरी गेले. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती आणि त्यांनी लगेच तिच्याबद्दल येशूंना सांगितले. येशू तिच्याजवळ गेले आणि त्यांनी तिचा हात धरून तिला उठविले. तेव्हा एकाएकी तिचा ताप नाहीसा झाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी लोकांनी येशूंकडे सर्व रोग्यांना आणि भूतग्रस्तांना आणले. संपूर्ण शहर दारात गोळा झाले होते, तेव्हा येशूंनी वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांनी ग्रासलेल्या पुष्कळांना बरे केले व अनेक दुरात्म्यांना हाकलून दिले, परंतु दुरात्म्यांना बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते कोण आहेत, हे त्यांना माहीत होते. अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तिथे त्यांनी प्रार्थना केली. शिमोन व त्याचे सोबती त्यांना शोधीत तिथे गेले. ते सापडल्यावर ते त्यांना म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहे!” येशूंनी म्हटले, “आपण दुसरीकडे कुठेतरी आसपासच्या गावात जाऊ म्हणजे मला तिथे प्रवचन देता येईल कारण त्यासाठीच मी आलो आहे.” मग ते सर्वत्र गालील प्रांतात प्रवास करीत, त्यांच्या सभागृहांमध्ये उपदेश करीत आणि दुरात्म्यांना बाहेर काढीत फिरले. एक कुष्ठरोगी येशूंकडे आला आणि गुडघे टेकून विनंती करून म्हणाला, “तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.” येशूंना कळवळा आला. त्यांनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो!” त्याचा कुष्ठरोग निघून गेला आणि तो शुद्ध झाला. येशूंनी त्याला निक्षून सांगितले: “पाहा हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते, ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस याचे हे प्रमाण प्रत्येकाला पटेल.” याउलट, त्याने ही बातमी जाहीरपणे सांगून पसरविली की त्यामुळे येशूंना उघडपणे गावात प्रवेश करता येईना, म्हणून ते एकांतस्थळी राहिले. पण तिथेही चहूकडून लोक त्यांच्याकडे आले.

सामायिक करा
मार्क 1 वाचा

मार्क 1:14-45 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या [राज्याची] सुवार्ता गाजवत गालीलात आला व म्हणाला, “काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्‍चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.” नंतर गालील समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.” मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले. आणि त्याने त्यांना लगेचच बोलावले; मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्यामागे गेले. नंतर ते कफर्णहूमास गेले; आणि लगेचच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नाही तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता; तो ओरडून म्हणाला, “हे येशू नासरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करायला आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच!” येशूने त्याला धमकावून म्हटले, “उगाच राहा व ह्याच्यातून नीघ.” तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांना विचारू लागले, “हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.” ही त्याची कीर्ती लगेच गालीलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. सभास्थानातून निघाल्यावर ते लगेचच याकोब व योहान ह्यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लगेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले व लगेचच तिचा ताप निघाला, आणि ती त्यांची सेवा करू लागली. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखणाइतांना व भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भुते काढली; त्या भुतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही. मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करत गेले, व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध करत आहेत.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मला आसपासच्या गावांत उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ; कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे.” मग तो सबंध गालीलात त्यांच्या सभास्थानांतून उपदेश करत व भुते काढत फिरला. तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” तेव्हा तो बोलता क्षणीच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद देऊन ताबडतोब लावून दिले, आणि सांगितले, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.” पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना; म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला; तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.

सामायिक करा
मार्क 1 वाचा

मार्क 1:14-45 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत गालीलमध्ये आला व म्हणाला, “काळाची परिपूर्ती झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्‍चात्ताप करा व शुभवर्तमानावर विश्वास ठेवा.” एकदा गालील सरोवराजवळून जात असताना येशूला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते कोळी होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” ते लगेच त्यांची जाळी सोडून येशूच्या मागे निघाले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचे मुलगे याकोब व योहान दिसले. ते त्यांच्या तारवात जाळी नीट करीत होते. त्याने त्यांनाही बोलावले. तेव्हा त्यांचे वडील जब्दी ह्यांना नोकरांबरोबर तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले. येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमला गेले असता लगेच येशूने साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन प्रबोधन केले. त्याच्या प्रबोधनावरून लोक थक्क झाले कारण तो त्यांना शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत असे. त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात एक भूतग्रस्त मनुष्य आला आणि ओरडून म्हणाला, “हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस.” येशूने त्याला आदेश दिला, “गप्प राहा व ह्याच्यामधून बाहेर नीघ.” भुताने त्या माणसाला पिळून काढले व आक्रोश करीत ते त्याच्यातून निघून गेले. सर्व लोक इतके थक्क झाले की, ते एकमेकांना विचारू लागले, “हे आहे तरी काय? ही काय नवीन शिकवण आहे? हा भुतांनाही अधिकाराने आज्ञा करतो व ती त्याचे ऐकतात.” ही त्याची कीर्ती गालीलच्या परिसरात सर्वत्र वेगाने पसरली. सभास्थानातून निघाल्यावर लगेच येशू आणि त्याचे शिष्य, याकोब व योहान ह्यांना घेऊन शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले. शिमोनची सासू तापाने खाटेवर पडली होती. तिच्याविषयी त्यांनी येशूला ताबडतोब सांगितले. तो तिच्याजवळ गेला व त्याने तिला हात धरून उठवले. तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी व भूतग्रस्त लोकांना त्याच्याकडे आणले. सगळे नगर दाराशी लोटले. नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूतग्रस्तांना मुक्त केले. त्या भुतांनी येशूला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस उठून येशू नगराबाहेर एकांतात गेला व तेथे तो प्रार्थना करू लागला. परंतु शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध घेऊ लागले. तो भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध घेत आहेत.” परंतु तो त्यांना म्हणाला, “आपण आसपासच्या गावांत जायला हवे. मला तेथेही प्रबोधन केले पाहिजे कारण ह्याच उद्देशाने मी आलो आहे.” म्हणूनच त्यांच्या सभास्थानांत प्रबोधन करत व भुते काढत तो सबंध गालीलमध्ये फिरला. एकदा एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, “आपली इच्छा असली, तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात.” येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो.” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. येशूने त्याला बजावून सांगितल्यानंतर लगेच पाठवून दिले. तो त्याला म्हणाला, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस पण जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि तू बरा झाला आहेस ह्याचा लोकांना पुरावा म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.” परंतु त्याने तेथून जाताना ती गोष्ट इतकी पसरवली आणि तिला प्रसिद्धी दिली की, येशूला उघडपणे कोणत्याही नगरात जाता येईना, म्हणून तो बाहेर रानात एकांत ठिकाणीच राहिला आणि लोक सगळीकडून त्याच्याकडे येत राहिले.

सामायिक करा
मार्क 1 वाचा