मार्क 1:1-11
मार्क 1:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे. यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील; अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.’” त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता. यहूदीया प्रांत व यरूशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे. तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.” त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला. येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले. तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
मार्क 1:1-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त, यांच्याबद्दलच्या शुभवार्तेचा प्रारंभ. यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे: “मी माझा संदेशवाहक तुमच्या पुढे पाठवीन, तो तुमचा मार्ग तयार करील,” “अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली, ‘प्रभुसाठी मार्ग तयार करा, आणि त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ” आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान पापक्षमेसाठी पश्चातापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत अरण्यात प्रकट झाला. यहूदीया प्रांतातील आणि सर्व यरुशलेमेतील लोक त्यांच्याकडे आले. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर, यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा होत असे. योहान उंटाच्या केसांपासून तयार केलेल्या कपड्याचा झगा घालीत असे, कंबरेला चामड्याचा पट्टा बांधीत असे. तो टोळ आणि रानमध सेवन करीत असे. त्याचा संदेश हा होता: “माझ्यानंतर असा एकजण येत आहे, जो माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहे व त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडणारा एक गुलाम होण्याची सुद्धा माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.” त्यावेळी येशू गालील प्रांतातील नासरेथ गावातून आले आणि योहानाने यार्देन नदीत त्यांचा बाप्तिस्मा केला. येशू पाण्यातून बाहेर येत होते त्याचवेळेस, आकाश उघडलेले आणि आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरत आहे असे त्यांनी पाहिले त्याचवेळी स्वर्गातून एक वाणी झाली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”
मार्क 1:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
[देवाचा पुत्र] येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, “पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो; तो तुझा मार्ग तयार करील; अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली, ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा; त्याच्या ‘वाटा नीट करा.”’ त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला. तेव्हा सगळा यहूदीया देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे. तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षा समर्थ असा कोणीएक माझ्यामागून येत आहे; त्याच्या पायतणांचा बंद लवून सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.” त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलातील नासरेथाहून आला आणि योहानाच्या हातून यार्देनेत त्याचा बाप्तिस्मा झाला. आणि लगेचच पाण्यातून वर येताना, आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे, असे त्याला दिसले; तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
मार्क 1:1-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ: यशया संदेष्ट्याने लिहिले आहे, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवीन. तो तुझा मार्ग तयार करील. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी: ‘प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा.’ त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करत बाप्तिस्मा देणारा योहान अरण्यात आला. यहुदिया प्रांतातील व यरुशलेम नगरातील कित्येक लोक त्याच्याकडे गेले आणि त्यांनी स्वतःची पापे कबूल करून योहानकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे व त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे. टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते. तो घोषणा करत म्हणे, “माझ्यापेक्षा अधिक समर्थ असा एक माझ्यामागून येत आहे. लवून त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही. मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु तो तुम्हांला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल.” त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलमधील नासरेथहून आला आणि योहानच्या हातून यार्देन नदीत त्याचा बाप्तिस्मा झाला. लगेच, पाण्यातून वर येत असताना, त्याला दिसले की, आकाश उघडले आहे व आत्मा कबुतरासारखा स्वतःवर उतरत आहे. आणि त्या वेळी आकाशातून वाणी झाली, “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.”