मत्तय 6:1-34
मत्तय 6:1-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लोकांनी आपले न्यायीपण पाहावे म्हणून तुम्ही तुमची न्यायीपणाची कृत्ये त्यांच्यासमोर करु नये याविषयी जपा, अन्यथा तुम्हास तुमच्या स्वर्गातील पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही. म्हणून ज्यावेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे. म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल, तेव्हा ते गुप्तपणे करा. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे, तो त्याचे प्रतिफळ तुला देईल. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका कारण आपण लोकांस दिसावे म्हणून ते सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हास खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ प्राप्त झाले आहे. पण तू जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आतल्या खोलीत जावून दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुला प्रतिफळ देईल. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी निरर्थक बडबड करू नका कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. तर तुम्ही त्यांच्यासारखे असू नका कारण तुम्हास कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच ठाऊक आहे. म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.) कारण जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हासही क्षमा करील; पण जर तुम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही ढोंगी लोकांसारखे उदास चेहऱ्याचे राहू नका कारण आपण उपवास करीत आहोत हे लोकांस दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना त्यांचे प्रतिफळ प्राप्त झाले आहे. तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा. यासाठी की, तू उपवास करता हे लोकांस दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हास उघडपणे प्रतिफळ देईल. तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे निर्दोष असतील तर तुमचे संपुर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण जर तुमचे डोळे सदोष असतील, तर तुमचे संपुर्ण शरीर अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा प्रकाश हा वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार किती असणार! कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याशी एकनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तसेच तुम्हास देवाची आणि पैशाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही. म्हणून मी तुम्हास सांगतो की, तुम्ही आपल्या जीवनाविषयी काळजी करु नका की आपण काय खावे आणि काय प्यावे किंवा आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे अशी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की नाही? आकाशातील पक्ष्यांकडे पाहा! ती पेरीत नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा कोठारात साठवूनही ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही? आणि चिंता करून आपले आयुष्याची लांबी हाथभरही वाढवणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे का? आणि तुम्ही वस्त्रांविषयी का काळजी करता? रानातील फुलांविषयी विचार करा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत, तरी मी तुम्हास सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यांतील एकासारखा ही सजला नव्हता. तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात त्यांना जर देव त्यांना असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तो तुम्हास घालणार नाही काय? ‘आम्ही काय खावे’ किंवा ‘काय प्यावे’, अथवा ‘आम्ही काय पांघरावे’ असे म्हणून काळजीत करु नका. कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय करत असतात, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हास या गोष्टींची गरज आहे हे ठाऊक आहे. तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील. म्हणून उद्याची चिंता करू नका कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्या स्वतः करेल. ज्या दिवसाचे जे दुःख ते त्या दिवसासाठी पुरेसे आहे.
मत्तय 6:1-34 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुमच्या नीतिमत्वाचे आचरण लोकांसमोर न करण्याची काळजी घ्या. कारण तसे केल्याने तुमच्या स्वर्गीय पित्यापासून मिळणार्या प्रतिफळास तुम्ही मुकाल. “म्हणून तुम्ही एखाद्या गरजवंताला दान देता, तेव्हा तुतार्या वाजवून जाहीर करू नका, ढोंगी जसे, रस्त्यांवर किंवा सभागृहांमध्ये लोकांकडून मान करून घेण्यासाठी करतात. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, त्यांना त्यांचे पूर्ण प्रतिफळ मिळाले आहे. तुम्ही गरजवंतास देता, तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील, मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल. “तुम्ही प्रार्थना करताना ढोंग्यासारखे होऊ नका, रस्त्यांच्या कोपर्यात किंवा सभागृहांमध्ये उभे राहून, दुसर्यांना दिसावे म्हणून प्रार्थना करण्यास त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील. आणि तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा गैरयहूदी लोकांप्रमाणे निरर्थक बडबड करू नका, त्यांच्या पुष्कळ बोलण्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. त्यांच्यासारखे होऊ नका, तुम्ही मागण्यापूर्वीच तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला माहीत असते. “तर, तुम्ही याप्रमाणे प्रार्थना करीत जा: “ ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो, तुमचे राज्य येवो, जशी स्वर्गात तशीच पृथ्वीवरही, तुमची इच्छा पूर्ण होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला द्या. आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा केली आहे, तशी तुम्ही आमच्या पापांची क्षमा करा. आणि आम्हास परीक्षेत आणू नका, परंतु त्या दुष्टापासून आम्हास सोडवा. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्वकाळ तुमचेच आहेत. आमेन’ ज्यांनी तुमच्याविरुद्ध पाप केले, त्यांना तुम्ही क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुमच्याही पातकांची क्षमा करतील. पण जर तुम्ही त्यांना क्षमा करण्याचे नाकारले, तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. “तुम्ही उपास करता त्यावेळी, ढोंग्याप्रमाणे उदास चेहरा करू नका. आपण उपास करीत आहो असे लोकांना दाखविण्यासाठी ते उतरलेल्या चेहर्यांनी वावरतात. मी तुम्हाला खरोखरच सांगतो की, त्यांचे संपूर्ण प्रतिफळ त्यांना मिळून चुकले आहे. तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा, म्हणजे तुम्ही उपास करीत आहा असे लोकांना समजणार नाही. पण केवळ तुमच्या अदृश्य पित्याला समजेल आणि मग तुमचा पिता जे तुम्ही गुप्त प्रकारे केलेल्या गोष्टी पाहतात ते तुम्हाला प्रतिफळ देतील. “तुमची धनसंपत्ती तुम्ही पृथ्वीवर साठवून ठेवू नका, कारण तेथे तिला कसर लागून, गंजून तिचा नाश होतो. शिवाय चोरही ती लुटून नेतात. पण तुमची धनसंपत्ती स्वतःसाठी स्वर्गामध्ये साठवून ठेवा. कारण तेथे तिला कसर लागत नाही व ती गंजून जात नाही, तिचा नाश होत नाही आणि चोरही ती लुटून नेत नाहीत. कारण जेथे तुमची संपत्ती आहे, तेथे तुमचे मनही असेल. “डोळा शरीराचा दिवा आहे. तुमचे डोळे निर्दोष असले, तर सर्व शरीरही प्रकाशमय होईल. पण तुमचे डोळे दोषपूर्ण असले, तर तुमचे संपूर्ण शरीर अंधाराने भरून जाईल. म्हणून तुमच्यातील प्रकाशच जर अंधार असला, तर तो अंधार केवढा मोठा! “कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही. “मी तुम्हाला सांगतो, आपण काय खावे, किंवा काय प्यावे अशी आपल्या जिवाविषयी की आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्वाचे नाही काय? आकाशातील पाखरांकडे पाहा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही व कोठारात साठवित नाही आणि तरीदेखील तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मोलाचे नाही का? शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय? “आणि तुम्ही वस्त्राविषयी काळजी का करावी? रानातील फुले कशी वाढतात हे पाहा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलमोन राजादेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता. जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला किती विशेषकरून पोशाख घालतील? म्हणून ‘आम्ही काय खाणार?’ किंवा ‘आम्ही काय पिणार?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ असे म्हणत काळजी करू नका. कारण परकीय लोक या गोष्टींच्या मागे लागतात, आणि तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या स्वर्गातील पित्याला माहीत आहे. परंतु तुम्ही प्रथम त्यांचे राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून उद्याच्या गोष्टींची चिंता करू नका, उद्याची चिंता उद्या, प्रत्येक दिवसाचा त्रास त्या दिवसासाठी पुरेसा आहे.
मत्तय 6:1-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केलीत तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही. ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणांपुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये; अशा हेतूने की, तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता उघडपणे तुला तुझे फळ देईल. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका; कारण लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ‘आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन’ आपल्या गुप्तवासी पित्याची ‘प्रार्थना कर’ म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा : ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे; आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’] कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू; अशा हेतूने की, तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात; तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घरफोडी करत नाहीत व चोरीही करत नाहीत; कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. डोळा शरीराचा दिवा आहे; ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल; ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा! कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसर्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, आपल्या जिवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा; ती पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत की कोठारात साठवत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो; तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेषेकरून तुम्हांला पोशाख घालणार नाही काय? ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. (कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात.) तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.
मत्तय 6:1-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माणसांना दिसावे म्हणून त्यांच्यापुढे तुमचे धर्माचरण न करण्याची तुम्ही काळजी घ्या, नाही तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हांला पारितोषिक मिळणार नाही. जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे प्रार्थनामंदिरात व रस्त्यांवर लोकांपुढे स्तोम माजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. उलट, तू जेव्हा दानधर्म करतोस, तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू देऊ नकोस. तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल. तसेच जेव्हा तू प्रार्थना करतोस, तेव्हा ढोंग्यांसारखा वागू नकोस. लोकांनी त्यांना पाहावे म्हणून सभास्थानांत व चव्हाट्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. उलट, तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या खोलीत जा व दार लावून तुझ्या गुप्तवासी पित्याकडे प्रार्थना कर, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले ऐकले जाईल, असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत, हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणतो. तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आम्हांला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेनर्.] जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा केली तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांलाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखा तुमचा चेहरा खिन्न करू नका, कारण आपण उपवास करत आहोत, असे लोकांना दिसावे म्हणून ते मलूल चेहऱ्याने वावरतात. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. उलट, तू उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू. अशासाठी की, तू उपवास करत आहेस, हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे. म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. गंज लागून ती नाश पावेल किंवा चोर घर फोडून ती चोरून नेतील. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत. अर्थात, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. डोळा शरीराला दिव्यासारखा आहे. जर तुझी दृष्टी निर्दोष असेल, तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; पण तुझी दृष्टी सदोष असेल तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. तुझ्यातील प्रकाश जर अंधकारमय झाला तर तो अंधार किती भयंकर असेल! कोणीही मनुष्य दोन धन्यांची सेवा करू शकत नाही. तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची सेवा करू शकणार नाही. म्हणूनच मी तुम्हांला सांगतो, तुमच्या जीवनाविषयी, म्हणजे तुम्ही काय खावे व काय प्यावे आणि तुमच्या शरीराविषयी, म्हणजे तुम्ही काय परिधान करावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीवन आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक मौल्यवान आहे किंवा नाही? आकाशातील पक्ष्यांकडे पाहा; ते पेरणी करत नाहीत; कापणी करत नाहीत की कोठारांत धान्य साठवत नाहीत. तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाहीत? चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायला तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्रांविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा. ती कशी वाढतात. ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत. तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्या फुलांमधील एकासारखा सजला नव्हता! जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोषाख घालतो तर तुम्ही अल्पविश्वासी लोकहो, तो तुम्हांला अधिक कपडे पुरवणार नाही काय? म्हणून काय खावे, काय प्यावे किंवा काय पांघरावे, असे म्हणत चिंता करत बसू नका. ह्या सर्व गोष्टी मिळवायची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे, हे तुमचा स्वर्गातील पिता जाणून आहे. तर मग तुम्ही प्रथम देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यासाठी झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्या सर्व गोष्टीदेखील तुम्हांला मिळतील. म्हणून उद्याची चिंता करू नका. उद्याची चिंता उद्या. आजचे दुःख आजच्यासाठी पुरे!