YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 6:1-34

मत्तय 6:1-34 MACLBSI

माणसांना दिसावे म्हणून त्यांच्यापुढे तुमचे धर्माचरण न करण्याची तुम्ही काळजी घ्या, नाही तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हांला पारितोषिक मिळणार नाही. जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे प्रार्थनामंदिरात व रस्त्यांवर लोकांपुढे स्तोम माजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. उलट, तू जेव्हा दानधर्म करतोस, तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू देऊ नकोस. तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल. तसेच जेव्हा तू प्रार्थना करतोस, तेव्हा ढोंग्यांसारखा वागू नकोस. लोकांनी त्यांना पाहावे म्हणून सभास्थानांत व चव्हाट्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. उलट, तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या खोलीत जा व दार लावून तुझ्या गुप्तवासी पित्याकडे प्रार्थना कर, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले ऐकले जाईल, असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत, हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणतो. तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आम्हांला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेनर्.] जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा केली तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांलाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखा तुमचा चेहरा खिन्न करू नका, कारण आपण उपवास करत आहोत, असे लोकांना दिसावे म्हणून ते मलूल चेहऱ्याने वावरतात. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. उलट, तू उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू. अशासाठी की, तू उपवास करत आहेस, हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे. म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. गंज लागून ती नाश पावेल किंवा चोर घर फोडून ती चोरून नेतील. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत. अर्थात, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. डोळा शरीराला दिव्यासारखा आहे. जर तुझी दृष्टी निर्दोष असेल, तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; पण तुझी दृष्टी सदोष असेल तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. तुझ्यातील प्रकाश जर अंधकारमय झाला तर तो अंधार किती भयंकर असेल! कोणीही मनुष्य दोन धन्यांची सेवा करू शकत नाही. तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची सेवा करू शकणार नाही. म्हणूनच मी तुम्हांला सांगतो, तुमच्या जीवनाविषयी, म्हणजे तुम्ही काय खावे व काय प्यावे आणि तुमच्या शरीराविषयी, म्हणजे तुम्ही काय परिधान करावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीवन आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक मौल्यवान आहे किंवा नाही? आकाशातील पक्ष्यांकडे पाहा; ते पेरणी करत नाहीत; कापणी करत नाहीत की कोठारांत धान्य साठवत नाहीत. तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाहीत? चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायला तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्रांविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा. ती कशी वाढतात. ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत. तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्या फुलांमधील एकासारखा सजला नव्हता! जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोषाख घालतो तर तुम्ही अल्पविश्‍वासी लोकहो, तो तुम्हांला अधिक कपडे पुरवणार नाही काय? म्हणून काय खावे, काय प्यावे किंवा काय पांघरावे, असे म्हणत चिंता करत बसू नका. ह्या सर्व गोष्टी मिळवायची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे, हे तुमचा स्वर्गातील पिता जाणून आहे. तर मग तुम्ही प्रथम देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यासाठी झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्या सर्व गोष्टीदेखील तुम्हांला मिळतील. म्हणून उद्याची चिंता करू नका. उद्याची चिंता उद्या. आजचे दुःख आजच्यासाठी पुरे!