YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 4:1-11

मत्तय 4:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले. चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली. तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.” परंतु येशूंनी उत्तर दिले, “कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’” मग सैतानाने त्यांस यरूशलेम या पवित्र शहरात नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर उभे केले. आणि त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की; ‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील.’” येशूंनी त्यास म्हटले, “असेही लिहिले आहे की, ‘तुझा देव, जो प्रभू, याची परीक्षा पाहू नको.’” मग सैतानाने त्यांस एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यांस जगाची सर्व राज्ये, त्यांतील सर्व ऐश्वर्यासहीत दाखवली. आणि तो त्यांस म्हणाला, “जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन.” येशूंनी त्यास म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर.’” मग सैतान येशुंना सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन येशुंची सेवा करू लागले.

सामायिक करा
मत्तय 4 वाचा

मत्तय 4:1-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात नेले. चाळीस दिवस चाळीस रात्र त्यांनी उपवास केला, तेव्हा त्यांना भूक लागली. मग परीक्षक येशूंकडे आला व म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना, भाकरीत रूपांतर होण्यास सांग.” तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “ ‘मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दाद्वारे जगेल’ असे लिहिले आहे.” मग सैतानाने पवित्र नगरीतील मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले. तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे: “तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल, आणि तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.” तेव्हा येशूंनी प्रत्युत्तर दिले, “असेही लिहिले आहे की: प्रभू तुझा परमेश्वर त्यांची परीक्षा पाहू नको.” मग सैतानाने येशूंना एका उंच डोंगराच्या शिखरावर नेले. तेथून त्याने त्यांना जगातील सर्व राज्ये व त्याचे थाटमाट आणि गौरव दाखविले. “जर तू पाया पडून माझी उपासना करशील,” तो म्हणाला, “तर हे सर्व मी तुला देईन.” येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, येथून चालता हो! ‘कारण असे लिहिले आहे की, केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’” मग सैतान त्यांना सोडून निघून गेला आणि देवदूतांनी येऊन त्यांची सेवा केली.

सामायिक करा
मत्तय 4 वाचा

मत्तय 4:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.” परंतु त्याने उत्तर दिले की, “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.” मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले; आणि त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील,’ आणि ‘तुझा पाय धोंड्यांवर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”’ येशूने त्याला म्हटले, “आणखी असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस.”’ पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखवले, आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्वकाही तुला देईन.” तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”’ मग सैतान त्याला सोडून गेला आणि पाहा, देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली.

सामायिक करा
मत्तय 4 वाचा

मत्तय 4:1-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने येशूला अरण्यात नेले. तेथे त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला व त्याला भूक लागली. सैतान त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र असशील तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.” परंतु त्याने उत्तर दिले, “असे लिहिले आहे, “मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगतो.’” नंतर सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, ‘तू देवाचा पुत्र असशील तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे, “तो त्याच्या दूतांना तुझ्याविषयी आदेश देईल आणि तुझे पाय धोंड्यांवर आपटू नयेत म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.’” येशूने त्याला म्हटले, “परंतु असेही लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्‍वर ह्याची तू परीक्षा पाहू नकोस.’” पुन्हा सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेले आणि जगातील सर्व राज्ये त्यांच्या वैभवासह त्याला दाखवली आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून माझी आराधना करशील, तर मी हे सर्व तुला देईन.” येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असे लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्‍वर ह्याची तू आराधना कर व केवळ त्याचीच सेवा कर.’” नंतर सैतान येशूला सोडून गेला आणि पाहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले.

सामायिक करा
मत्तय 4 वाचा