सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने येशूला अरण्यात नेले. तेथे त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला व त्याला भूक लागली. सैतान त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र असशील तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.” परंतु त्याने उत्तर दिले, “असे लिहिले आहे, “मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगतो.’” नंतर सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, ‘तू देवाचा पुत्र असशील तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे, “तो त्याच्या दूतांना तुझ्याविषयी आदेश देईल आणि तुझे पाय धोंड्यांवर आपटू नयेत म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.’” येशूने त्याला म्हटले, “परंतु असेही लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची तू परीक्षा पाहू नकोस.’” पुन्हा सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेले आणि जगातील सर्व राज्ये त्यांच्या वैभवासह त्याला दाखवली आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून माझी आराधना करशील, तर मी हे सर्व तुला देईन.” येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असे लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची तू आराधना कर व केवळ त्याचीच सेवा कर.’” नंतर सैतान येशूला सोडून गेला आणि पाहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले.
मत्तय 4 वाचा
ऐका मत्तय 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 4:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ