YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26:57-75

मत्तय 26:57-75 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्यास महायाजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते. पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे महायाजकाच्या आवारापर्यंत गेला आणि जाऊन शेकत बसला, काय होते ते पाहण्यासाठी कामदारांसोबत बसला. येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी अधिकारी सभा त्याच्याविरुध्द काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले. पुष्कळ खोटे साक्षीपुढे आले आणि येशूविरूद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली, “हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे भवन मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.” तेव्हा महायाजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, तुझ्यविरूद्ध जे आरोप आहेत, त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?” पण येशूने काहीच उत्तर दिले नाही. परत एकदा महायाजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?” येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हास सांगतोः यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशातून येताना पाहाल.” जेव्हा महायाजकाने हे ऐकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, “याने देवाविरूद्ध निंदा केली आहे! आम्हास आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले! तुम्हास काय वाटते?” यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्यास मरण पावलेच पाहिजे.” तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्यास मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या. ते म्हणाले, “ख्रिस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?” यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. महायाजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालील प्रांताच्या येशूबरोबर होतास.” पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही.” मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्यास पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांस म्हणाली, “नासरेथकर येशूबरोबर हा होता.” पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारून, म्हणाला, “मी त्यास ओळखत नाही!” काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्यास म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हास माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हास स्पष्ट दिसून येते.” मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला. नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.

सामायिक करा
मत्तय 26 वाचा

मत्तय 26:57-75 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशूंना अटक करून त्यांना प्रमुख याजक कयफा याच्याकडे नेले; त्याठिकाणी सर्व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक एकत्र झाले होते. पेत्र काही अंतरावरुन त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि पहारेकर्‍यांमध्ये जाऊन काय होते ते पाहत बसला. मुख्य याजक, आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी खोटे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु ते त्यांना सापडले नाही जरी अनेक खोटे साक्षीदार पुढे आले. शेवटी दोन माणसे पुढे आली, “हा मनुष्य म्हणाला, ‘मी परमेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यास व तीन दिवसात ते पुन्हा बांधण्यास समर्थ आहे.’ ” हे ऐकून प्रमुख याजक उभा राहिला आणि त्याने येशूंना विचारले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय? हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहे ती काय आहे?” पण येशू शांत राहिले. नंतर महायाजकाने त्यांना विचारले, “जिवंत परमेश्वराच्या नावाने शपथ घालून मी तुला विचारतो की, तू पुत्र परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त आहेस का?” येशूंनी उत्तर दिले, “असे तू म्हणतोस, परंतु मी तुम्हा सर्वांना सांगतो की येथून पुढे तुम्ही मला, अर्थात् मानवपुत्राला, सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.” येशूंचे हे उद्गार ऐकल्याबरोबर महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो ओरडला, “तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे. आता आणखी साक्षीदारांची आपल्याला गरजच काय? पाहा, तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे. तुम्हाला काय वाटते?” “तो मृत्युदंडास योग्य आहे.” त्यांनी ओरडून प्रत्युत्तर दिले. मग ते येशूंच्या तोंडावर थुंकले आणि त्यांना बुक्क्या मारल्या. काहींनी त्यांच्या तोंडात चपडाका मारल्या, आणि म्हटले, “ख्रिस्ता, आम्हासाठी भविष्यवाणी करा. तुम्हाला कोणी मारले?” हे सर्व होत असताना, पेत्र अंगणात बाहेर बसला होता आणि एक दासी त्याच्याकडे आली व ती त्याला म्हणाली, “तू गालीलकर येशूंबरोबर होतास.” परंतु पेत्राने सर्वांच्यासमोर नकार दिला. तो म्हणाला, “तू कशाबद्दल बोलतेस हे मला समजत नाही.” मग तो बाहेरील आवाराच्या दाराजवळ गेला, तेथे त्याला दुसर्‍या एका दासीने पाहिले आणि ती लोकांना म्हणाली, “हा माणूस नासरेथच्या येशूंबरोबर होता.” या खेपेसही पेत्र नाकारून आणि शपथ घेऊन म्हणाला, “मला त्या माणसाची ओळख नाही!” थोड्या वेळाने जी माणसे तेथे उभी होती. ती पेत्राला म्हणाली, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या बोलण्यावरून आम्ही हे सांगू शकतो.” हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला. तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील.” पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.

सामायिक करा
मत्तय 26 वाचा

मत्तय 26:57-75 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग येशूला अटक करणार्‍यांनी त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागेमागे चालत गेला व आत जाऊन, शेवट काय होतो हे पाहण्यास कामदारांमध्ये बसला. मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जिवे मारण्याच्या हेतूने त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत होते; आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघे [खोटे साक्षी] येऊन म्हणाले की, “‘देवाचे मंदिर मोडण्यास व तीन दिवसांत ते बांधण्यास मी समर्थ आहे’ असे ह्याने म्हटले.” तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय?” तथापि येशू उगाच राहिला. ह्यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.”’ येशू त्याला म्हणाला, “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हांला सांगतो, ह्यापुढे तुम्ही ‘मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले’ व ‘आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.”’ तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे; आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? पाहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हांला काय वाटते?” त्यांनी उत्तर दिले की, “हा मरणदंडास पात्र आहे.” तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्‍क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले, “अरे ख्रिस्ता, आम्हांला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले?” इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता; तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.” तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही.” मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथील लोकांना म्हटले, “हा नासोरी येशूबरोबर होता.” पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर, तूही त्यांच्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते.” तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा “कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील” असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.

सामायिक करा
मत्तय 26 वाचा

मत्तय 26:57-75 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशूला अटक करणाऱ्यांनी त्याला उच्च याजक कयफा ह्यांच्याकडे नेले. तेथे शास्त्री व वडीलजन जमले होते. परंतु पेत्र त्याच्यामागे काही अंतर ठेवून उच्च याजकांच्या वाड्यापर्यंत गेला व आत जाऊन शेवट काय होतो, हे पाहायला कामगारांमध्ये जाऊन बसला. मुख्य याजक व सर्व न्यायसभा येशूला ठार मारण्याकरता त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत होती. परंतु बरेच खोटे साक्षीदार जमले असताही तसा पुरावा त्यांना मिळाला नाही. शेवटी दोघे जण पुढे येऊन म्हणाले, “‘देवाचे मंदिर मोडायला व तीन दिवसांत ते पुन्हा बांधायला मी समर्थ आहे’, असे ह्याने म्हटले होते.” उच्च याजक उठून येशूला म्हणाले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत ना?” तथापि येशू काही बोलला नाही. तेव्हा उच्च याजकांनी पुन्हा त्याला म्हटले, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.” येशू त्यांना म्हणाला, “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हांला सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.” त्या वेळी उच्च याजकांनी त्यांचीं वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे, आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? आत्ता तुम्ही ह्याचे दुर्भाषण ऐकले आहे. तुमचा निर्णय काय?” त्यांनी उत्तर दिले, “हा मरणदंडाला पात्र आहे.” ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला मारहाण केली. त्याला चपराका मारणाऱ्यांनी म्हटले, “अरे ख्रिस्ता, संदेष्टा म्हणून आम्हांला सांग, तुला कोणी मारले?” इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता, तेव्हा उच्च याजकांची एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.” परंतु तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही.” तो बाहेर प्रवेशदाराजवळ गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांना म्हटले, “हा नासरेथकर येशूबरोबर होता.” पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.” काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर तूही त्यांच्यापैकी आहेस; कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे कळते.” तो स्वतःला शाप देत व शपथ वाहत म्हणू लागला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला! ‘कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील’, असे जे येशूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले. तो बाहेर गेला व भावनाविवश होऊन रडला.

सामायिक करा
मत्तय 26 वाचा