त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्यास महायाजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते. पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे महायाजकाच्या आवारापर्यंत गेला आणि जाऊन शेकत बसला, काय होते ते पाहण्यासाठी कामदारांसोबत बसला. येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी अधिकारी सभा त्याच्याविरुध्द काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले. पुष्कळ खोटे साक्षीपुढे आले आणि येशूविरूद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली, “हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे भवन मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.” तेव्हा महायाजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत, तुझ्यविरूद्ध जे आरोप आहेत, त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?” पण येशूने काहीच उत्तर दिले नाही. परत एकदा महायाजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?” येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हास सांगतोः यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशातून येताना पाहाल.” जेव्हा महायाजकाने हे ऐकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, “याने देवाविरूद्ध निंदा केली आहे! आम्हास आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले! तुम्हास काय वाटते?” यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्यास मरण पावलेच पाहिजे.” तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्यास मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या. ते म्हणाले, “ख्रिस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?”
यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. महायाजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालील प्रांताच्या येशूबरोबर होतास.” पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही.” मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्यास पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांस म्हणाली, “नासरेथकर येशूबरोबर हा होता.” पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारून, म्हणाला, “मी त्यास ओळखत नाही!” काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्यास म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हास माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हास स्पष्ट दिसून येते.” मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला. नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला.