YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26:1-16

मत्तय 26:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग असे झाले की, येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊक आहे की, दोन दिवसांनी वल्हांडण सण आहे, आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरता धरून दिला जाईल.” तेव्हा कयफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक [व शास्त्री] आणि लोकांचा वडीलवर्ग जमला; आणि येशूला कपटाने धरून जिवे मारावे अशी त्यांनी मसलत केली. परंतु ते म्हणाले, “लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको.” तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता, कोणीएक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, “हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते.” येशूने हे जाणून त्यांना म्हटले, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले हे माझ्या उत्तरकार्यासाठी केले. मी तुम्हांला खचीत सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील.” तेव्हा यहूदा इस्कर्योत नावाच्या बारा जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, “मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” ‘त्यांनी’ त्याला ‘तीस रुपये तोलून दिले.’ तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला.

सामायिक करा
मत्तय 26 वाचा

मत्तय 26:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग येशूने ही सर्व वचने सांगण्याचे संपविल्यानंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “दोन दिवसानी वल्हांडणाचा सण आहे हे तुम्हास माहीत आहे आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जिवे मारला जाण्यासाठी धरून दिला जाईल.” मग मुख्य याजक लोक आणि वडीलवर्ग, महायाजकाच्या महलात जमले. मुख्य याजकाचे नाव कयफा होते. सभेत त्यांनी मिळून मसलत केली की, येशूला कपटाने अटक करून आणि जिवे मारावे. तरीही ते म्हणत होते, “सणाच्या दिवसात नको, नाही तर लोकांमध्ये दंगा होईल.” तेव्हा येशू बेथानी गावामध्ये शिमोन जो कुष्ठरोगी होता त्याच्या घरात होता. येशू तेथे असताना एक स्त्री त्याच्याकडे आली. अतिमौल्यवान सुवासिक तेलाची अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती आणि तो जेवणास टेकून बसला असता तिने ते त्याच्या डोक्यावर ओतले. पण त्याच्या शिष्यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, असा नाश कश्याला? ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते. पण येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या स्त्रीला का त्रास देत आहात? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे. गरीब लोक तुमच्याबरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. कारण तिने माझ्या शरीरावर हे सुवासिक तेल ओतले ते मला पुरण्याच्या तयारीसाठी हिने केले. मी तुम्हास खरे सांगतो, सर्व जगात जेथे सुवार्ता गाजवली जाईल तेथे तेथे या स्त्रीने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.” बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला. यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली. तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.

सामायिक करा
मत्तय 26 वाचा

मत्तय 26:1-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आपले हे सर्व बोलणे संपविल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “जसे तुम्हाला माहीत आहे की, वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण यांना दोनच दिवसांचा अवधी आहे आणि मानवपुत्र क्रूसावर खिळण्यासाठी धरून दिले जातील.” नंतर प्रमुख याजकवर्ग आणि लोकांचे वडील, कयफा नावाचा महायाजक याच्या राजवाड्यात एकत्र जमले. आणि येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधीत होते. पण ते म्हणाले, “आपण हे सणात करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.” येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होते. तेथे ते जेवायला बसले असताना, एक स्त्री अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ते तेल येशूंच्या मस्तकांवर, ते बसले असताना ओतले. जेव्हा शिष्यांनी हे पाहिले त्यावेळी ते संतापले. “का ही तेलाची नासाडी?” ते म्हणाले, “हे तेल अधिक किमतीस विकून आलेले पैसे गोरगरिबांना दान करता आले असते.” हे जाणून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही या स्त्रीला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही. माझ्या अंत्यविधीची तयारी म्हणून तिने हे तेल माझ्या शरीरावर ओतले आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जेथे कोठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तेथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.” यानंतर बारा शिष्यांपैकी एक जो यहूदा इस्कर्योत; प्रमुख याजकांकडे गेला. आणि त्याने त्यांना विचारले, “येशूंना मी तुमच्या स्वाधीन केले, तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी मोजून दिली. त्या वेळेपासून यहूदा येशूंना धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.

सामायिक करा
मत्तय 26 वाचा

मत्तय 26:1-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशूने त्याचे हे बोलणे आटोपल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊक आहे की, दोन दिवसांनी ओलांडण सण आहे आणि मनुष्याचा पुत्र क्रुसावर खिळण्याकरता धरून दिला जाईल.” त्यानंतर कयफा नावाच्या उच्च याजेकांच्या वाड्यात मुख्य याजक व वडील जन जमले. येशूला कपटाने धरून ठार मारावे, अशी त्यांनी मसलत केली. मात्र ते म्हणाले, “आपण हे सणाच्या दिवसांत करू नये, केले तर लोकांत दंगल होईल.” येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोनच्या घरी असता, एक स्त्री फार मौल्यवान अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. हे पाहून शिष्य संतप्त होऊन म्हणाले, “असा अपव्यय कशाला? हे अत्तर विकून चांगलीच रक्कम गोळा करता आली असती व ती गोरगरिबांना देता आली असती.” परंतु येशूला हे समजले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गरीब नेहमी तुमच्याबरोबर असतील परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. हिने माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले, ते माझ्या उत्तरकार्यासाठी केले आहे. मी तुम्हांला निश्‍चितपणे सांगतो, सर्व जगात जेथे जेथे शुभवर्तमानाची घोषणा करण्यात येईल, तेथे तेथे हिने जे केले आहे, ते तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.” नंतर बारा जणांपैकी एक, यहुदा इस्कर्योत, मुख्य याजकांकडे गेला आणि त्याने विचारले, “मी येशूला धरून दिले तर मला काय द्याल?” त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली. तेव्हापासून यहुदा येशूला धरून देण्याची संधी पाहू लागला.

सामायिक करा
मत्तय 26 वाचा