मत्तय 21:1-17
मत्तय 21:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू व त्याचे शिष्य यरूशलेम शहराजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगराजवळ बेथफगे या जागी थांबले. नंतर येशूने त्याच्या दोन शिष्यांना पाठवले, त्यांना असे सांगितले की, “तुम्ही समोरच्या गावात जा आणि लागलीच एक गाढवी बांधलेली व तिच्याबरोबर एक शिंगरु असे तुम्हास आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे घेऊन या. जर कोणी तुम्हास काही विचारले, तर त्यास सांगा की, प्रभूला यांची गरज आहे, तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.” हे यासाठी घडले की संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावेः ते असे की, “सियोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राज लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.” तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. शिष्यांनी गाढवी व शिंगरु आणून त्यांनी त्यावर आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला. पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे वाटेवर अंथरले. दुसऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!” जेव्हा येशूने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर गजबजून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?” जमावाने उत्तर दिले, “हा गालील प्रांतातील नासरेथ नगरातून आलेला, येशू संदेष्टा आहे.” मग येशूने देवाच्या भवनात प्रवेश केला. तेथे जे लोक विक्री व खरेदी करीत होते त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. पैश्याचा व्यवहार करणाऱ्यांची मेजे आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या. तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे, ‘माझ्या घरास प्रार्थनेचे घर म्हणतील,’ पण तुम्ही त्यास लुटारुंची गुहा केली आहे.” मग आंधळे आणि पांगळे लोक त्याच्याकडे परमेश्वराच्या भवनात आले आणि त्यांना त्याने बरे केले. परंतु जेव्हा मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि परमेश्वराच्या भवनाच्या आवारात लहान मुलांना, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषणा देताना पाहिले, तेव्हा त्यांना संताप आला. त्यांनी त्यास विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, “होय. परंतु तू बालके व तान्हुली यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे. हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?” नंतर येशू त्यास सोडून शहराबाहेर बेथानीस गेला. तो रात्रभर तेथे राहिला.
मत्तय 21:1-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते यरुशलेमेजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे या गावास आले, तेव्हा येशूंनी आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले. त्यांना म्हणाले, “समोरच्या गावात जा, तेथे पोहोचताच, तुम्हाला एक गाढवी दिसेल, तिच्याजवळ शिंगरू बांधून ठेवलेले असेल; त्यांना सोडून माझ्याकडे आणा. कोणी तुम्हाला विचारले, तर त्यांना एवढेच सांगा, प्रभुला त्याची गरज आहे आणि ते लागलीच पाठवून देतील.” संदेष्ट्याने केलेले भविष्यकथन पूर्ण व्हावे म्हणून असे झाले: “सीयोन कन्येला सांगा की, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे, आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे.” शिष्य गेले आणि येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी केले. त्यांनी गाढवी व शिंगरू ही आणली आणि त्यांचे कपडे गाढवी व शिंगरूच्या पाठीवर टाकले मग येशू त्यावर बसले. गर्दीमधील काही लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर त्यांच्यापुढे पसरले; तर इतर काहींनी झाडांच्या डाहळ्या तोडून त्यांच्यापुढे पसरल्या. मग जमावातील जे लोक त्यांच्यापुढे गेले, ते आणि जे लोक त्यांच्यामागून चालले. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” “प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो.” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!” येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्व शहर जागे झाले आणि त्यांनी विचारले, “हा कोण आहे?” “हे येशू आहेत!” गर्दीतील लोकांनी उत्तर दिले, “गालीलाच्या नासरेथहून आलेले संदेष्टा आहेत.” येशू मंदिराच्या परिसरात गेले आणि तेथे खरेदीविक्री करणार्या सर्वांना त्यांनी बाहेर घालवून दिले. पैशाची अदलाबदल करणार्यांचे तक्ते आणि कबुतरे विकणार्यांची आसने त्यांनी उधळून लावली. ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील पण तुम्ही याला लुटारूंची गुहा केली आहे.” मग मंदिरात त्यांच्याकडे आंधळे व अपंग लोक आले आणि त्यांनी त्यांना बरे केले. तरी जेव्हा मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षक यांनी ही अद्भुत कामे पाहिली आणि लहान मुलांना मंदिराच्या परिसरात, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” असे ओरडतांना ऐकले, तेव्हा ते संतापले. त्यांनी येशूंना विचारले, “ही मुले काय म्हणत आहेत, हे तुम्ही ऐकत आहात ना?” “हो,” येशूंनी उत्तर दिले, “ ‘लहान लेकरे व बालके यांच्या करवी हे प्रभू तू आपली स्तुती प्रकट केली आहे,’ हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” मग ते बेथानीस परत आले आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी तेथेच केला.
मत्तय 21:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की, “तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हांला आढळतील; ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हांला काही म्हटले, तर ‘प्रभूला ह्यांची गरज आहे,’ असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.” संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले; ते असे की, “सीयोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे.” तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले; गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्यांच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; काही झाडांच्या डाहळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना!’ ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित!’ ‘ऊर्ध्वलोकी होसान्ना!’ तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, “हा कोण?” लोकसमुदाय म्हणाले, “गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा आहे.” नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रयविक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्यांच्या बैठका पालथ्या केल्या. तो त्यांना म्हणाला, “‘माझ्या घरास प्रार्थनामंदिर म्हणतील’ असे लिहिले आहे; परंतु तुम्ही ते ‘लुटारूंची गुहा’ करत आहात.” मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना’ असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले; व त्याला म्हणाले, “ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “होय; ‘बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करवली आहे’, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?” नंतर तो त्यांना सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला.
मत्तय 21:1-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते यरुशलेमजवळ आले असता ऑलिव्ह डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले, तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले, “तुम्ही समोरच्या गावात जा. तेथे लगेच तुम्हांला एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू बांधलेले आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे आणा. तुम्हांला कोणी काही म्हटले तर ‘प्रभूला ह्यांची गरज आहे’, असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.” संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे: सियोनकन्येला सांगा, ‘पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो नम्र आहे म्हणून तो गाढवावर व गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ शिष्य गेले आणि त्यांनी येशूच्या सांगण्याप्रमाणे केले. त्यांनी गाढवी व शिंगरू आणून त्यांवर आपली वस्त्रे पसरली व येशू त्यांच्यावर बसला. लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी डाहळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या. पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! दावीदपुत्राचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! ऊर्ध्वलोकी होसान्ना!” तो यरुशलेममध्ये आल्यावर सर्व नगर गजबजले. लोक म्हणाले, “हा कोण आहे?” लोकसमुदाय म्हणाला, “हा येशू आहे - गालीलमधील नासरेथहून आलेला संदेष्टा.” येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना त्याने बाहेर घालवून दिले आणि सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली आणि त्यांना म्हटले, “‘माझ्या मंदिराला प्रार्थनागृह म्हणतील’, असे लिहिले आहे, पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.” तेथे आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. त्याने केलेले चमत्कार पाहून व “दावीदपुत्राचा गौरव असो!”, असा जयघोष करणारी मुले मंदिरात पाहून मुख्य याजक व शास्त्री संतापले आणि त्याला म्हणाले, “ही मुले काय बोलतात, हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “हो, “बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करविली आहेस’, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” नंतर तो त्यांना सोडून शहराबाहेर बेथानीस गेला व तेथे तो रात्रभर राहिला.