मत्तय 2:1-10
मत्तय 2:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हेरोद राजाच्या काळात यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की, “यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.” हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले; आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे?” ते त्याला म्हणाले, “यहूदीयातील बेथलेहेमात; कारण संदेष्ट्याच्या द्वारे असे लिहिले आहे की, ‘हे यहूदाच्या प्रांता, बेथलेहेमा, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही; कारण माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल.”’ तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली; आणि त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा, व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन.” राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पाहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो, जेथे तो बालक होता, त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्यापुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला
मत्तय 2:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हेरोद राजाच्या दिवसात यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात येशूचा जन्म झाल्यानंतर, पूर्वेकडील देशातून ज्ञानी लोक यरूशलेम शहरात येऊन विचारपूस करू लागले की, “यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.” जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले; हेरोद राजाने सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमवून त्यांना विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे? ते त्यास म्हणाले, “यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात, कारण संदेष्ट्यांच्याद्वारे असे लिहिलेले आहे की; ‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’” मग हेरोद राजाने ज्ञानी लोकांस गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली. त्याने त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हास शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मी ही येऊन त्यास नमन करीन.” राजाचे हे सांगणे ऐकून ते त्यांच्या वाटेने निघाले. जो तारा त्यांनी पूर्वेस पाहीला होता त्याने बेथलेहेम नगरापर्यंत त्यांचे मार्गदर्शन केले आणि ज्ञानी लोक बालकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यापुढे चालला. तो तारा पाहून ज्ञानी लोकांस अतिशय आनंद झाला.
मत्तय 2:1-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंचा जन्म यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नावाच्या गावी, हेरोद राजाच्या कारकीर्दीत झाल्यानंतर, पूर्वेकडून खगोलशास्त्रज्ञ यरुशलेमात आले. ते विचारू लागले, “ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कोठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत.” हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले. हेरोदाने सर्व यहूदी लोकांचे प्रमुख याजक व नियमशास्त्र शिक्षक, यांना एकत्र बोलावले आणि विचारले ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा. “यहूदीयातील बेथलेहेमात,” त्यांनी उत्तर दिले, “कारण संदेष्ट्याने असे लिहिले आहे: “ ‘परंतु बेथलेहेमा, तू यहूदीया प्रांतात, यहूदीयांच्या शासकांमध्ये कमी नाही, तुझ्यातून एक शासक उदय पावेल, तो माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होईल.’ ” मग हेरोदाने त्या खगोल शास्त्रज्ञांना खासगी निरोप पाठवून बोलावून घेतले आणि तारा नक्की कोणत्या वेळी प्रकट झाला याची माहिती मिळविली. मग हेरोदाने त्यांना बेथलेहेमात पाठविले आणि म्हणाला, “जा आणि त्या बालकाचा बारकाईने शोध करा; तो सापडल्यावर, इकडे परत या आणि मला सांगा म्हणजे मी सुद्धा जाऊन त्यांची उपासना करेन.” राजाचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर, ते शास्त्रज्ञ पुढे निघाले तो, पाहा जो तारा त्यांनी पाहिला होता, तो तारा बालक जेथे होता, तेथे येईपर्यंत त्यांच्यापुढे चालला. तो तारा पाहून त्यांना फार आनंद झाला.
मत्तय 2:1-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हेरोद राजाच्या अमदानीत यहुदियातील बेथलेहेम नगरात येशूच्या जन्मानंतर, पूर्वेकडून काही ज्ञानी पुरुष यरुशलेम येथे येऊन विचारपूस करू लागले, “यहुदी लोकांचा राजा जन्मला आहे, तो कुठे आहे? आम्ही पूर्वेकडे त्याचा तारा पाहिला आणि आम्ही त्याची उपासना करायला आलो आहोत.” हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम अस्वस्थ झाले. त्याने सर्व मुख्य याजक व शास्त्री ह्यांना जमवून विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे?” ते त्याला म्हणाले, “यहुदियातील बेथलेहेमात; कारण संदेष्ट्याद्वारे असे लिहिले आहे: हे बेथलेहेमा, यहुदाच्या प्रांता, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस, असे मुळीच नाही. माझ्या इस्राएली लोकांचे नेतृत्व करील असा सरदार तुझ्यातून उदयास येईल.” हेरोदने पूर्वेकडील ज्ञानी लोकांना गुप्तपणे बोलावून, तारा दिसू लागल्याची निश्चित वेळ त्यांच्याकडून काळजीपूर्वक विचारून घेतली. नंतर त्याने त्यांना बेथलेहेमला पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बाळाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याची उपासना करीन.” राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि जो तारा त्यांनी पूर्वेकडे पाहिला होता, तो बाळ होते, त्या जागेवर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्यापुढे मार्गक्रमण करत राहिला. तो तारा त्यांना दिसला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.