YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 2:1-10

मत्तय 2:1-10 MRCV

येशूंचा जन्म यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नावाच्या गावी, हेरोद राजाच्या कारकीर्दीत झाल्यानंतर, पूर्वेकडून खगोलशास्त्रज्ञ यरुशलेमात आले. ते विचारू लागले, “ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कोठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत.” हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले. हेरोदाने सर्व यहूदी लोकांचे प्रमुख याजक व नियमशास्त्र शिक्षक, यांना एकत्र बोलावले आणि विचारले ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा. “यहूदीयातील बेथलेहेमात,” त्यांनी उत्तर दिले, “कारण संदेष्ट्याने असे लिहिले आहे: “ ‘परंतु बेथलेहेमा, तू यहूदीया प्रांतात, यहूदीयांच्या शासकांमध्ये कमी नाही, तुझ्यातून एक शासक उदय पावेल, तो माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होईल.’ ” मग हेरोदाने त्या खगोल शास्त्रज्ञांना खासगी निरोप पाठवून बोलावून घेतले आणि तारा नक्की कोणत्या वेळी प्रकट झाला याची माहिती मिळविली. मग हेरोदाने त्यांना बेथलेहेमात पाठविले आणि म्हणाला, “जा आणि त्या बालकाचा बारकाईने शोध करा; तो सापडल्यावर, इकडे परत या आणि मला सांगा म्हणजे मी सुद्धा जाऊन त्यांची उपासना करेन.” राजाचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर, ते शास्त्रज्ञ पुढे निघाले तो, पाहा जो तारा त्यांनी पाहिला होता, तो तारा बालक जेथे होता, तेथे येईपर्यंत त्यांच्यापुढे चालला. तो तारा पाहून त्यांना फार आनंद झाला.

मत्तय 2 वाचा