मत्तय 12:22-32
मत्तय 12:22-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?” परूश्यांनी लोकांस हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भूते काढण्यासाठी येशू बालजबूलचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा अधिपती आहे.” परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल? आणि मी जर बालजबूलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमचे लोक कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात. म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्यास तो बांधून टाकील व मग तो चोरी करील. जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो. म्हणून मी तुम्हास सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची व वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्यास क्षमा करण्यात येणार नाही. एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्यास क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्यास क्षमा होणार नाही. त्यास या युगातही क्षमा होणार नाही व येणाऱ्या युगातही होणार नाही.
मत्तय 12:22-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर त्यांनी एका भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले, जो आंधळा व मुका होता, आणि येशूंनी त्याला बरे केले, व त्याला बोलता व पाहता येऊ लागले. तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हाच दावीदाचा पुत्र असेल काय?” परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान, याच्या साहाय्याने भुते घालवितो.” त्यांचे विचार येशूंना माहीत होते, आणि ते त्यांना म्हणाले, “प्रत्येक फूट पडलेल्या राज्याचा नाश होतो किंवा एखाद्या शहरातील किंवा घरातील लोकांत आपसात फूट पडली, तर ते शहर किंवा ते घर टिकू शकत नाही. जर सैतानच सैतानाला घालवू लागला आणि त्याच्यात फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल? आणि जर मी बालजबूलाच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग, ते तुमचे न्यायाधीश असतील. परंतु, मी जर परमेश्वराच्या आत्म्याने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे. “किंवा मग, बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याला आधी बांधल्याशिवाय त्याची मालमत्ता लुटून नेणे कसे शक्य होईल? त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. “जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही. जो कोणी मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करेल, त्याला या युगात आणि येणार्या युगात कधीही क्षमा होणार नाही.
मत्तय 12:22-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले; आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?” परंतु परूशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भुते काढत नाही.” येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसांत फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. सैतान जर सैतानाला काढत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे; मग त्याचे राज्य कसे टिकणार? आणि मी जर बाल्जबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीजवस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधले तरच तो त्याचे घर लुटील. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो. ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगात नाही व येणार्या युगातही नाही.
मत्तय 12:22-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एकदा आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याला बरे केले आणि तो पाहू व बोलू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “हा दावीदचा पुत्र असेल काय?” परंतु परुशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती बालजबूल त्याला साहाय्य करतो म्हणून भुते काढणे त्याला शक्य होते.” त्याने त्यांच्या मनातील विचार ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा कुटुंब टिकत नाही. सैतान सैतानाशीच लढत असेल तर त्याच्या राज्यात फूट पडली आहे. मग त्याचे राज्य कसे टिकणार? मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग तुम्ही चुकत आहात, हे तेच तुम्हांला दाखवून देतील! मात्र मी देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढत आहे, त्याअर्थी देवाचे राज्य तुमच्यासाठी आले आहे. किंवा बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता कुणालाही लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. जो माझ्या बाजूचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही, तो उधळून टाकतो. म्हणून मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांबद्दल माणसांना क्षमा मिळेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे, त्याबद्दल क्षमा मिळणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल, तर त्याबद्दल त्याला क्षमा मिळेल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल, त्याबद्दल त्याला आताच्या किंवा येणाऱ्या युगातही क्षमा मिळणार नाही.