मत्त. 12
12
शब्बाथाचे पालन
मार्क 2:23-28; लूक 6:1-5
1त्यावेळी एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून चालला होता. शिष्याना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. 2जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.” 3तेव्हा येशूने त्यांना म्हटले, दाविदाला व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? 4तो देवाच्या भवनात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी खाऊ नयेत, असे करणे नियमशास्त्राच्या विरूद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवानगी होती. त्या त्यांनी कशा खाल्ल्या? 5आणि प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी परमेश्वराच्या भवनातील याजक भवनात शब्बाथ पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय? परंतु तरी ते निर्दोष असत. 6मी तुम्हास सांगतो की, परमेश्वराच्या भवनापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे. 7पवित्र शास्त्र म्हणते, मला दया हवी आहे आणि यज्ञ पशू नको. याचा खरा अर्थ तुम्हास समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांस दोष लावला नसता. 8कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.
वाळलेल्या हाताचा मनुष्य
मार्क 3:1-6; लूक 6:6-11
9नंतर येशूने ते ठिकाण सोडले व यहूद्यांच्या सभास्थानात तो गेला. 10सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्यास विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?” 11येशूने त्यांना उत्तर दिले, “जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्यास वर काढणार नाही काय? 12तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांस शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते.” 13मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला.
येशूला ठार मारण्याचा कट
14नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्यास कसे मारावे याविषयी मसलत केली. 15परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वांना बरे केले. 16आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका. 17यशया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.
18“हा माझा सेवक, याला मी निवडले आहे.
मी त्याजवर प्रीती करतो आणि त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट वाटतो.
मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन,
आणि तो परराष्ट्रीय लोकांस योग्य न्यायाची घोषणा करील.
19तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही,
रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत.
20वाकलेला बोरू तो मोडणार नाही
आणि मंदावलेली वात तो विझवणार नाही.
न्याय विजयास होईपर्यंत तो असे करील.
21परराष्ट्रीय लोक त्याच्यावर आशा ठेवतील. येशूचे सामर्थ्य देवाकडून आहे.”
सैतानाचे साहाय्य घेतल्याचा आरोप
मार्क 3:22-27; लूक 11:14-23
22मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. 23सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?” 24परूश्यांनी लोकांस हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भूते काढण्यासाठी येशू बालजबूलचे #सैतानसामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा अधिपती आहे.” 25परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. 26आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल? 27आणि मी जर बालजबूलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमचे लोक कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात. म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुमचा न्याय करतील. 28परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. 29किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्यास तो बांधून टाकील व मग तो चोरी करील. 30जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो. 31म्हणून मी तुम्हास सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची व वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्यास क्षमा करण्यात येणार नाही. 32एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्यास क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्यास क्षमा होणार नाही. त्यास या युगातही क्षमा होणार नाही व येणाऱ्या युगातही होणार नाही.
33 झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा; कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते. 34अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हास चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंतःकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते. 35चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. 36आणखी मी तुम्हास सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील. 37कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.”
चिन्ह दाखवण्याबाबत येशूला केलेली विनंती
लूक 11:29-30
38काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काहीजणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.” 39येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी अप्रामाणिक आहेत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हास मिळणार नाही. 40कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. 41जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवे शहराचे लोक उभे राहतील, तुमच्याविरुध्द साक्ष देतील आणि तुम्हास दोष देतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणीएक येथे आहे. 42न्यायाच्या दिवशी दक्षिणेकडील देशाची राणी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.”
अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारे धोके
लूक 11:24-26
43 “जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्यास सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्यास मिळत नाही. 44तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्यास दिसते. 45नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्यास झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या मनुष्याची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या या पापी पिढीचे होईल.”
प्रभू येशूचे नातलग
मार्क 3:31-35; लूक 8:19-21
46मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते. 47तेव्हा कोणीतरी त्यास म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.” 48त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?” 49मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ हे आहेत. 50कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई.”
सध्या निवडलेले:
मत्त. 12: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.