मत्तय 10:1-23
मत्तय 10:1-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर प्रभुत्त्व दिले व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला. तर त्या बारा प्रेषितांची नावे ही होती: पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान फिलिप्प व बर्थलमय, थोमा आणि मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत. येशूने या बाराजणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की: परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर त्याऐवजी इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढराकडे जा. तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका. सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे व पायातील वहाणा असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याला आपले अन्न मिळणे आवश्यक आहे. ज्या कोणत्याही नगरात किंवा गावात तुम्ही जाल तेथे कोण योग्य व्यक्ती आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा. त्या घरात प्रवेश करतेवेळी येथे शांती असो, असे म्हणा. जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. आणि जो कोणी तुम्हास स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. मी तुम्हास खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल. लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. मनुष्यांविषयी सावध असा कारण ते तुम्हास न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हास फटके मारतील. माझ्यामुळे ते तुम्हास राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व परराष्ट्रीय लोकांपुढे माझ्याविषयी सांगाल. जेव्हा तुम्हास अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. तेव्हा तुम्ही काय बोलायचे ते तुम्हाला सांगितले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या देवाचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल. भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील. माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. एका ठिकाणी जर तुम्हास त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हास खरे सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
मत्तय 10:1-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलाविले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला. त्यांच्या बारा प्रेषितांची नावे ही: शिमोन ज्याला पेत्र असेही म्हणतात आणि त्याचा भाऊ आंद्रिया; जब्दीचा पुत्र याकोब, त्याचा भाऊ योहान; फिलिप्प आणि बर्थलमय; थोमा आणि मत्तय जकातदार; अल्फीचा पुत्र याकोब आणि तद्दय; शिमोन कनानी आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने येशूंना विश्वासघाताने धरून दिले. येशूंनी बारा प्रेषितांना सूचना देऊन पाठविले: “गैरयहूदी लोकांकडे जाऊ नका किंवा शोमरोन्यांच्या कोणत्याही शहरात प्रवेश करू नका. इस्राएलांच्या हरवलेल्या मेंढराकडे जा. जात असताना, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे’ अशी घोषणा करा. आजार्यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या. “प्रवासाला जाताना कमरपट्ट्यात सोने, चांदी किंवा तांबे असे काहीही घेऊ नका. तुमच्या प्रवासासाठी थैली किंवा अधिक अंगरखा किंवा पायतण किंवा काठी घेऊ नका; कारण कामकरी अन्नास पात्र आहे. ज्या एखाद्या शहरात किंवा गावात तुम्ही प्रवेश कराल, त्यावेळी एखाद्या योग्य मनुष्याचा शोध करा आणि निघेपर्यंत त्याच्याच घरी राहा. एखाद्या घरात प्रवेश करताना शुभेच्छा द्या. ते घर योग्य असेल, तर तुमच्या आशीर्वादाप्रमाणे तिथे शांती नांदेल. पण याउलट परिस्थिती असली तर तुमचा आशीर्वाद तुम्हाकडे परत येईल. जर कोणी तुमचे स्वागत केले नाही किंवा तुमचे शब्द ऐकले नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून निघा आणि तुमच्या पायाची धूळ तिथेच झटकून टाका. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल. “मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरांसारखे निर्दोष असा. तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल. तुम्हाला माझ्या नावासाठी त्यांना व गैरयहूदीयांना साक्ष व्हावी म्हणून अधिकारी व राजांसमोर आणले जाईल. तुम्हाला अटक करून नेल्यावर न्यायालयासमोर काय बोलावे व कसे बोलावे याविषयी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला काय बोलावे ते सुचविले जाईल. कारण तुम्ही बोलणार नाही पण तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल. “भाऊ भावाला, पिता आपल्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील. माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहतील, त्याचे मात्र तारण होईल. तुमचा एका शहरात छळ होऊ लागला की दुसर्या शहरात पळून जा. कारण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मानवपुत्र येण्याअगोदर इस्राएलाच्या नगरांमधून तुमचे फिरणे संपणारच नाही.
मत्तय 10:1-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या बारा प्रेषितांची नावे अशी आहेत : पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, शिमोन कनानी व त्याला (येशूला) धरून देणारा यहूदा इस्कर्योत. ह्या बारा जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की, “परराष्ट्रीयांकडे जाणार्या वाटेने जाऊ नका व शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका; तर इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करत जा की, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’ रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका, वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकर्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. आणि घरात जाताना, ‘तुम्हांला शांती असो,’ असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. मी तुम्हांला खचीत सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल. पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील, आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हांला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हांला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, ‘मुले आईबापांवर उठून’ त्यांना ठार करतील; आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसर्यात पळून जा; मी तुम्हांला खचीत सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत.
मत्तय 10:1-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व रोग व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या बारा प्रेषितांची नावे अशी: पहिला पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार; अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, शिमोन कनानी व येशूला धरून देणारा यहुदा इस्कर्योत. ह्या बारा जणांना पाठवताना येशूने आदेश दिला, “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना बरे करा, भुते काढा, तुम्हांला मोफत मिळाले, मोफत द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या खिशात घेऊ नका. वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका कारण कामगार त्याच्या वेतनाला पात्र आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल, त्या त्या ठिकाणी उचित व्यक्तीचा शोध घ्या आणि तुम्ही तेथून निघून जाईपर्यंत तेथेच राहा. घरात प्रवेश करताना नमस्कार करा. ते घर पात्र असेल तर तुमची शांती त्याला मिळो परंतु ते अपात्र असेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा त्या नगरातून निघताना तुमच्या पायांची धूळ झटकून टाका. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरातील लोकांपेक्षा सदोम व गमोरा ह्या नगरांतील लोकांना परमेश्वर अधिक दया दाखवील. लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो. तुम्ही सापांसारखे चाणाक्ष व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. माणसांच्या बाबतीत जपून राहा. ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. त्यांच्या सभास्थानांत तुम्हांला फटके मारतील. तुम्हांला माझ्यामुळे सत्ताधिकारी व राजे ह्यांच्यापुढे खटल्यासाठी नेण्यात येईल, तेव्हा तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष देऊ शकाल. जेव्हा तुम्हांला त्यांच्यापुढे नेतील, तेव्हा कसे बोलावे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका. ते तुम्हांला त्याच वेळी सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलणारा आहे. भाऊ भावाला व वडील मुलाला ठार मारण्यासाठी धरून देतील. मुले आईवडिलांवर उठून त्यांना ठार मारवतील. माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल त्याचे तारण होईल. जर एका नगरात तुमचा छळ झाला तर दुसऱ्या नगरात तुम्ही आश्रय घ्या. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सगळ्या नगरांत तुमचे कार्य पूर्ण झालेले नसेल.