मत्त. 10
10
बारा प्रेषित व त्यांचे काम
1येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर प्रभुत्त्व दिले व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला. 2तर त्या बारा प्रेषितांची नावे ही होती: पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान 3फिलिप्प व बर्थलमय, थोमा आणि मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय 4शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत.
5येशूने या बाराजणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की: परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. 6तर त्याऐवजी इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढराकडे जा. 7तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” 8रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. 9तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका. 10सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे व पायातील वहाणा असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याला आपले अन्न मिळणे आवश्यक आहे. 11ज्या कोणत्याही नगरात किंवा गावात तुम्ही जाल तेथे कोण योग्य व्यक्ती आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा. 12त्या घरात प्रवेश करतेवेळी येथे शांती असो, असे म्हणा. 13जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. 14आणि जो कोणी तुम्हास स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. 15मी तुम्हास खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.
सतावाचे दिवस
मार्क 13:9-13; लूक 21:12-17
16 लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा. 17मनुष्यांविषयी सावध असा कारण ते तुम्हास न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हास फटके मारतील. 18माझ्यामुळे ते तुम्हास राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व परराष्ट्रीय लोकांपुढे माझ्याविषयी सांगाल. 19जेव्हा तुम्हास अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. तेव्हा तुम्ही काय बोलायचे ते तुम्हाला सांगितले जाईल. 20कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या देवाचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल. 21भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील. 22माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. 23एका ठिकाणी जर तुम्हास त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हास खरे सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
24 शिष्य त्याच्या गुरूपेक्षा वरचढ नाही किंवा चाकर मालकाच्या वरचढ नाही. 25शिष्य आपल्या शिक्षकासारखा व चाकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल #सैतान म्हणले तर घरातील इतर मनुष्यांना ते किती वाईट नावे ठेवतील! लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा.
26 म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. 27जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छतावरून गाजवा. 28जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या. 29दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही. 30आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत. 31म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात. 32जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. 33पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
34 असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. 35मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे. 36सारांश, मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील. 37जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. 38जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. 39जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील.
40 जी व्यक्ती तुम्हास स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते. 41जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्यास संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. 42मी तुम्हास खरे सांगतो की, या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तोही आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.
सध्या निवडलेले:
मत्त. 10: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.