YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 7:1-50

लूक 7:1-50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ऐकणाऱ्या लोकांस त्याने आपली सर्व वचने सांगणे संपवल्यानंतर त्याने कफर्णहूमात प्रवेश केला. तेव्हा कोणाएका शताधीपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता. मग त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून, तू येऊन माझ्या दासास वाचवावे, अशी त्यास विनंती केली. जेव्हा ते येशूजवळ आले तेव्हा त्यांनी त्यास आग्रहाने विनंती केली, ज्याच्यासाठी तू हे करावे, तो योग्य आहे. कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रीती करतो आणि त्याने आमच्यासाठी आमचे सभास्थान बांधून दिले. त्यामूळे येशू त्यांच्याबरोबर मार्गात चालत गेला आणि तो घरापासून फार दूर नव्हता, तोच त्या शताधीपतीने मित्रांना त्यांच्याकडे पाठवून म्हटले, प्रभू, आपण त्रास करून घेऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावे असा मी योग्य नाही. त्यामुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा सेवक बरा होईल. कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला मनुष्य असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत; आणि याला मी म्हणतो, जा, म्हणजे हा जातो व दुसऱ्याला ये म्हणतो, म्हणजे तो येतो आणि माझ्या दासास म्हणतो, हे कर, म्हणजे तो ते करतो. जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्यास त्याच्याविषयी आश्चर्य वाटले, तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, “मी तुम्हास सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.” आणि जे पाठवलेले होते, ते घरी परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे. आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की, तो नाईन नावाच्या नगराकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते. जसा तो गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा पाहा कोणाएका मरण पावलेल्या मनुष्यास बाहेर घेऊन जात होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती; आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला “रडू नकोस” मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले आणि तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, उठ!” आणि तो मरण पावलेला उठून बसला व बोलू लागला; मग येशूने त्यास त्याच्या आईजवळ दिले. तेव्हा सर्वांना भय वाटले आणि ते देवाला गौरव करीत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे” येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीया प्रांतात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली. योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्वकाही सांगितले, नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलावले आणि त्याने त्यांना प्रभूकडे हे विचारण्यासाठी पाठवले की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? जेव्हा ते लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हास तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” त्याच घटकेस येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील दुष्ट आत्मे काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली. येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा, आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात. आणि जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य आहे.” मग योहानाचे निरोपे गेल्यावर तो योहानाविषयी समुदायांशी बोलू लागला, “तुम्ही काय पाहायला बाहेर रानात गेला? वाऱ्याने हलवलेला बोरू काय? तर तुम्ही काय पाहायला बाहेर गेला? मऊ वस्त्रे घातलेल्या मनुष्यास काय? पाहा, भडक पोषाख घातलेले व चैनीत असणारे लोक राजवाड्यांत असतात. तर तुम्ही काय पाहायाला बाहेर गेला? संदेष्ट्याला काय? होय, मी तुम्हास सांगतो, संदेष्ट्याहूनही जो अधिक मोठा आहे त्याला. पाहा, ‘मी आपल्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो; तो तुझ्यापुढे तुझी वाट तयार करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. मी तुम्हास सांगतो की स्त्रियांपासून जे जन्मले त्यांच्यांमध्ये योहानापेक्षा मोठा असा कोणी नाही, तरी देवाच्या राज्यांत जो अगदी लहान आहे, तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.” आणि जकातदारांसह सर्व लोकांनी ऐकून ‘देव न्यायी आहे’ असे ठरवले कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता. परंतु परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा न घेऊन आपल्या संबंधीची देवाची योजना धिक्कारली. प्रभूने म्हटले, “तर मग मी या पिढीच्या मनुष्यांना कोणती उपमा देऊ? आणि ती कशासारखी आहेत? जी मुले बाजारामध्ये बसून एकमेकांना हाक मारतात त्यांच्यासारखी ती आहेत, ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही विलाप केला तरी तुम्ही रडला नाही. कारण बाप्तिस्मा करणारा योहान भाकर न खाता आणि द्राक्षरस न पिता आला आहे आणि तुम्ही म्हणता, त्यास भूत लागले आहे. मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाडा मनुष्य व दारूबाज, जकातदारांचा व पाप्यांचा मित्र! परंतु ज्ञान आपल्या सर्व लेकरांकडून न्यायी ठरलेले आहे.” तेव्हा परूश्यांपैकी कोणा एकाने, “तू माझ्याबरोबर जेवावे.” अशी येशूला विनंती केली. मग तो परूश्याच्या घरात जाऊन जेवायला बसला. आणि पाहा, कोणीएक पापी स्त्री त्या नगरांत होती; येशू परूश्यांच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकू ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या परूश्याने येशूला बोलावले होते, त्याने हे पाहून आपल्या मनांत म्हटले, “हा संदेष्टा असता तर जी स्त्री त्यास स्पर्श करीत आहे ती कोण व कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्यास कळले असते.” तेव्हा येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “शिमोना, तुझ्याशी मला काही बोलायचे आहे.” तेव्हा तो म्हणाला, “गुरूजी बोला.” येशूने म्हटले, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला चांदीचे पाचशे नाणे व दुसऱ्याला पन्नास असे देणे होते. परंतु कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने दोघांना क्षमा केली. तर त्यांच्यापैकी कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?” तेव्हा शिमोनाने उत्तर देऊन म्हटले, “ज्याला अधिक माफ केले तो, असे मला वाटते.” मग येशू त्यास म्हणाला, “ठीक ठरवलेस.” तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “ही स्त्री तुला दिसते ना? मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले आणि आपल्या केसांनी ते पुसले. तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही, तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले आहे. या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे; कारण हिने पुष्कळ प्रीती केली; परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो.” तेव्हा येशूने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” मग त्याच्याबरोबर जेवायला बसले होते ते आपसांत म्हणू लागले, “पापांची देखील क्षमा करणारा हा कोण आहे?” मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”

सामायिक करा
लूक 7 वाचा

लूक 7:1-50 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जे लोकांनी ऐकावे, ते येशूंनी सांगून पूर्ण केल्यावर, त्यांनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला. तेथे एका शताधिपतीचा सेवक, जो त्याच्या दृष्टीने महत्वाचा होता, तो आजारी असून मरावयास टेकला होता. त्या शताधिपतीने येशूंविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडिलांना येशूंकडे पाठवून, त्यांनी आपण येऊन सेवकाला बरे करावे अशी विनंती केली. ते येशूंकडे आले आणि त्यांना आग्रहाने विनंती करून म्हणाले, “तुम्ही हे करावे यासाठी हा मनुष्य पात्र आहे, कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रेम करतो, एवढेच नाही, तर आमच्यासाठी आमचे सभागृह ही बांधून दिले आहे.” म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले. पण घरापासून फार दूर नव्हते तेव्हा शताधिपतीने आपल्या मित्रांच्या हाती निरोप पाठविला: “प्रभू, माझ्या छप्पराखाली येण्याचा आपण त्रास घेऊ नका कारण त्यासाठी मी योग्य नाही. आणि या कारणामुळेच तुमच्याकडे येण्यासाठी मी स्वतःला सुद्धा योग्य समजत नाही. परंतु तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः अधिकाराच्या अधीन असलेला मनुष्य असून, माझ्या अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला, ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्‍याला, ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला, ‘हे,’ कर अथवा, ‘ते,’ कर असे म्हटले तर तो ते करतो.” येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते त्याच्या बोलण्यावरून आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यामागे आलेल्या लोकांच्या गर्दीकडे वळून ते म्हणाले, “मी तुम्हाला सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलमध्ये सुद्धा दिसून आला नाही.” त्या अधिकार्‍याचे मित्र त्याच्या घरी परतले, तेव्हा सेवक पूर्ण बरा झालेला त्यांना आढळला. त्यानंतर लगेच, येशू नाईन नावाच्या गावी गेले आणि त्यांचे शिष्य आणि मोठा जमावही त्यांच्याबरोबर गेला. ते गावाच्या वेशीजवळ आले, एक मरण पावलेल्या मुलाची प्रेतयात्रा बाहेर पडत होती व तो आपल्या विधवा आईचा एकुलता एक पुत्र होता. तिच्याबरोबर गावातील मोठा लोकसमूह होता. प्रभुने तिला पाहिले, तेव्हा त्यांचे हृदय कळवळ्याने भरून गेले आणि ते तिला म्हणाले, “रडू नकोस.” नंतर पुढे जाऊन ज्या तिरडीवर त्याला ठेवले होते त्याला स्पर्श केला, तेव्हा तिरडी वाहणारे थांबले. येशूंनी म्हटले, “तरूणा, मी तुला सांगतो, ऊठ!” तेव्हा तो मृत मुलगा उठून बसला आणि बोलू लागला. मग येशूंनी त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. हे पाहून सर्व लोक भयचकित झाले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले, “आम्हामध्ये एक थोर संदेष्टा उदय पावला आहे. परमेश्वर आपल्या लोकांच्या साहाय्यासाठी आले आहेत.” येशूंची ही बातमी यहूदीया प्रांताच्या कानाकोपर्‍यातून आणि सरहद्दीच्या पलीकडेही पसरली. योहानालाही या सर्व गोष्टींविषयी त्याच्या शिष्यांनी सांगितले. त्याने दोघांना बोलावले, आणि त्यांना प्रभुकडे विचारण्यास पाठविले: “जे यावयाचे ते आपण आहात किंवा आम्ही इतराची वाट पाहावी?” ते लोक येशूंकडे आल्यानंतर त्यांना म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहानाने आम्हास आपणाकडे असे विचारावयास पाठविले आहे की, जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?” त्याच घटकेस, येशूंनी पुष्कळ लोकांस रोग, पीडा व दुरात्मे यापासून मुक्त केले आणि पुष्कळ आंधळ्यांना दृष्टी दिली. तेव्हा जे निरोप घेऊन आले होते त्यांना म्हणाले, “तुम्ही जे पाहिले आणि ऐकले ते योहानाला सांगा: आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते. जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.” योहानाचे शिष्य गेल्यानंतर, येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्‍याच्या झोताने हलणार्‍या लव्हाळ्याला काय? नाही, तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही. भारी पोशाख घालणारे व सुखविलासातील लोक राजमहालात राहतात. परंतु तुम्ही काय पाहावयास गेला होता? संदेष्टा? संदेष्ट्यांपेक्षाही अधिक. कारण हाच तो आहे ज्याच्याविषयी असे लिहिले आहे: “मी आपला संदेशवाहक तुझ्यापुढे पाठवीन आणि, तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करील, मी तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या व्यक्तिंमध्ये योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीपण परमेश्वराच्या राज्यामध्ये जो कनिष्ठ आहे, तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.” जकातदारांसह सर्व लोकांनी येशूंचे हे शब्द ऐकले. परमेश्वराचे मार्ग न्याय्य आहेत, हे त्यांनी योहानाकडून पूर्वीच बाप्तिस्मा घेऊन मान्य केले होते. तरी, परूशी आणि नियमशास्त्रज्ञ यांनी त्यांच्याबद्दल असलेला परमेश्वराचा संकल्प धुडकावून लावला होता व योहानाकडून बाप्तिस्मा घेतला नव्हता. येशू पुढे बोलत राहिले, “तर मग काय, या पिढीच्या लोकांची तुलना मी कोणाबरोबर करू? ते कोणासारखे आहेत?” लहान मुलांसारखी ही पिढी आहे. ते बाजारपेठेत आपल्या मित्रांना बोलावतात: “ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजविली, तरी तुम्ही नाचला नाही; आम्ही शोकगीत गाईले, तरी तुम्ही रडला नाही.’ कारण योहान भाकरी खात नसे किंवा द्राक्षारस पीत नसे आणि तुम्ही म्हणता, ‘त्याला दुरात्म्याने पछाडले आहे.’ मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि तुम्ही म्हणता, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी मनुष्य! जकातदार आणि पापी लोकांचा मित्र!’ परंतु ज्ञान आपल्या मुलांच्या योगे न्यायी ठरते.” एका परूश्याने येशूंना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रण दिले व येशूंनी ते स्वीकारले. ते भोजनास बसले असताना, त्या नगराची एक पापी स्त्री, येशू परूश्याच्या घरी भोजनास गेले आहेत हे ऐकून मोलवान सुगंधी तेलाने भरलेली एक संगमरवरी कुपी घेऊन तेथे आली. आत जाऊन ती येशूंच्या मागे उभी राहिली, व रडू लागली आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय भिजवू लागली. मग तिने ते आपल्या केसांनी पुसले. त्यांच्या पायांची चुंबने घेतली आणि सुगंधी तेल त्यावर ओतले. ज्या परूश्याने येशूंना भोजनास यावे अशी विनंती केली होती, त्याने हे पाहिले, तेव्हा तो मनाशीच म्हणाला, “यावरूनच येशू संदेष्टा नाहीत हे सिद्ध होते, कारण परमेश्वराने त्यांना खरोखरीच पाठविले असते, तर ही स्त्री पापी आहे हे त्यांना समजले असते.” येशू त्या परूश्याला म्हणाले, “शिमोना, मला तुला काहीतरी सांगावयाचे आहे.” शिमोन म्हणाला, “गुरुजी बोला.” तेव्हा येशूंनी त्याला एक दाखला सांगितला: “एकाने दोन माणसांना कर्ज दिले, एकाला चांदीची पाचशे नाणी आणि दुसर्‍याला चांदीची पन्नास नाणी. परंतु त्यापैकी एकालाही त्याची परतफेड करता आली नाही. तेव्हा त्याने दोघांचेही कर्ज माफ केले. आता या दोघांपैकी कोणाला त्याच्याबद्दल अधिक प्रीती वाटेल?” “ज्याचे अधिक कर्ज माफ झाले त्याला” शिमोनाने उत्तर दिले. येशू म्हणाले, “तू बरोबर न्याय केला आहेस.” नंतर ते त्या स्त्रीकडे वळाले आणि शिमोनाला म्हणाले, “तू ही स्त्री पाहिली का? मी तुझ्या घरात आलो. माझे पाय धुण्यासाठी तू मला पाणी दिले नाहीस, परंतु तिने माझे पाय तिच्या अश्रूंनी भिजविले आणि तिच्या केसांनी ते पुसले. तू मला चुंबन दिले नाहीस. परंतु मी आत आलो, तेव्हापासून हिने माझ्या पायांची चुंबने घेण्याचे थांबविले नाही. तू माझ्या डोक्यावर तेल लावले नाहीस, परंतु हिने तर माझ्या पायांवर सुगंधी अत्तर ओतून दिले आहे. यास्तव, मी तुला सांगतो, हिने दाखविलेल्या पुष्कळ प्रीतिमुळे तिच्या अनेक पापांची क्षमा करण्यात आली आहे. ज्याच्या थोड्या पापांची क्षमा होते, त्याची प्रीतिही थोडीच असते.” येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या पापांची क्षमा करण्यात आली आहे.” त्याठिकाणी आलेल्या दुसर्‍या पाहुण्यांनी एकमेकांमध्ये बोलण्यास सुरुवात केली, “हा कोण आहे जो पापांची सुद्धा क्षमा करतो?” येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या विश्वासाने तुझे तारण झाले आहे; शांतीने जा.”

सामायिक करा
लूक 7 वाचा

लूक 7:1-50 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफर्णहूमास गेला. तेव्हा कोणाएका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व विनंती केली की, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली व सांगितले, “आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे; कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्याकरता सभास्थान बांधून दिले आहे.” तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला; मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रांना पाठवून त्याला म्हटले, “प्रभूजी, श्रम घेऊ नका; कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही; ह्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही; तर शब्द मात्र बोला1 म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत; मी एकाला ‘जा’ म्हटले म्हणजे तो जातो, दुसर्‍याला ‘ये’ म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले म्हणजे तो ते करतो.” ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्‍चर्य वाटले; आणि तो वळून आपल्यामागे चालणार्‍या लोकसमुदायाला म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलातही आढळला नाही.” नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. नंतर लवकरच असे झाले की, तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.” मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी उभे राहिले; मग तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.” तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.” त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहूदीयात व चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली. ह्या सर्व गोष्टींविषयी योहानाला त्याच्या शिष्यांनी सांगितले. मग योहानाने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले की, “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?” ती माणसे त्याच्याकडे येऊन म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाने आम्हांला आपल्याकडे असे विचारण्यास पाठवले आहे की, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?” त्याच घटकेस त्याने पुष्कळ लोकांना रोग, पीडा व वाईट आत्मे ह्यांपासून मुक्त केले होते आणि बर्‍याच आंधळ्यांना दृष्टी दिली होती. मग त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, ‘आंधळे डोळस होतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.’ जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.” मग योहानाचे निरोप्ये गेल्यावर तो योहानाविषयी लोकसमुदायांना म्हणू लागला, “तुम्ही काय पाहण्यास रानात गेला होता? वार्‍याने हलवलेला बोरू काय? तर मग काय पाहण्यास गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, उंची पोशाख करणारे व चैन करणारे राजवाड्यात असतात. तर तुम्ही काय पाहण्यास गेला होता? संदेष्ट्याला काय? मी तुम्हांला सांगतो, होय; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला. ‘पाहा, मी आपला निरोप्या तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो तोच आहे. मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानापेक्षा मोठा कोणी नाही; तरी देवाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.” आणि जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचे ऐकून देवाच्या नीतिमत्त्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता. परंतु परूशी व शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता. तेव्हा प्रभूने म्हटले, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत? जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत; ती म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही आक्रोश केला, तरी तुम्ही रडला नाहीत.’ बाप्तिस्मा करणारा योहान भाकरी खात आला नाही की द्राक्षारस पीत आला नाही, आणि तुम्ही म्हणता, त्याला भूत लागले आहे. मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे, आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पातक्यांचा मित्र! परंतु ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योगे न्यायी ठरते.” परूश्यांतील कोणीएकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली; आणि तो त्या परूश्याच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पाहा, त्या गावात कोणीएक पापी स्त्री होती; तो परूश्याच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली; आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या परूश्याने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.” तेव्हा येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरूजी, बोला.” “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला पाचशे रुपये देणे होते व एकाला पन्नास होते. देणे फेडण्यास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांना ते सोडले. तर त्यांतून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?” शिमोनाने उत्तर दिले, “ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते.” मग तो त्याला म्हणाला, “बरोबर ठरवलेस.” तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तुम्ही माझा मुका घेतला नाही; परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही; परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले. ह्या कारणास्तव मी तुम्हांला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो.” मग त्याने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसांत म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा कोण?” मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”

सामायिक करा
लूक 7 वाचा

लूक 7:1-50 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ही सर्व वचने लोकांना सांगून झाल्यावर येशू कफर्णहूम गावी गेला. तेथे एका रोमन अधिकाऱ्याच्या मर्जीतला दास आजारी पडून मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुदी लोकांच्या काही वडील मंडळींना त्याच्याकडे पाठवले व विनंती केली, “आपण येऊन माझ्या दासाला वाचवा.” त्यांनी येशूकडे येऊन कळकळीने विनंती केली, “आपण त्याच्यासाठी हे करावे, अशा योग्यतेचा तो आहे. कारण आपल्या राष्ट्रावर तो प्रेम करतो आणि त्यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे.” येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घराजवळ येताच रोमन अधिकाऱ्याने त्याच्याकडे त्याच्या मित्रांना पाठवून त्याला विनंती केली, “प्रभो, आपण तसदी घेऊ नका कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. ह्यामुळे आपल्याकडे येण्यास मी स्वतःला योग्य मानले नाही; आपण एक शब्द बोलला तरी माझा चाकर बरा होईल. कारण मीदेखील अधिकारी असून माझ्या हाताखाली सैनिक आहेत. मी एकाला जा म्हटले तर तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले तर तो येतो, माझ्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो.” हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्यामागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, असा विश्वास मला इस्राएलमध्येही आढळला नाही!” आणि ज्यांना पाठविले होते, ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला. नंतर लवकरच येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याचे शिष्य व बरेच लोक त्याच्याबरोबर गेले. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला, तेव्हा तेथून एका मृत माणसाची अंत्ययात्रा जात होती. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती. त्या नगरातले पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.” जवळ जाऊन त्याने शवपेटीस स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.” तो मृत माणूस उठून बसला व बोलू लागला. येशूने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. सर्वांना भय वाटले व ते देवाचा गौरव करत म्हणाले, “आमच्यामध्ये महान संदेष्टा उदयास आला आहे, देवाने त्याच्या लोकांची भेट घेतली आहे.” त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहुदियात व भोवतालच्या सर्व प्रदेशांत पसरली. ह्या सर्व गोष्टी त्याच्या शिष्यांनी योहानला सांगितल्या. योहानने त्याच्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारायला पाठवले, “जो येणार आहे तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” त्यांनी त्याच्याकडे येऊन विचारले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने आम्हांला आपल्याकडे असे विचारायला पाठवले आहे की, जो येणार आहे तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” त्याच घटकेस त्याने रोग, पीडा व दुष्ट आत्मे ह्यांपासून अनेकांना मुक्‍त केले आणि बऱ्याच आंधळ्यांना दृष्टी दिली. त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानला जाऊन सांगा. आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मृत उठवले जातात व गरिबांना शुभवर्तमान सांगण्यात येते. जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य होय.” योहानने पाठवलेले शिष्य गेल्यावर तो योहानविषयी लोकसमुदायाला सांगू लागला, “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाऱ्याने हालवलेला बोरू काय? तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे परिधान केलेल्या माणसाला काय? पाहा, उंची पोषाख घालणारे व चैन करणारे राजवाड्यात असतात. तर तुम्ही काय पाहायला गेला होता? संदेष्ट्याला काय? मी तुम्हांला सांगतो, हो, संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला. ‘पाहा, मी माझा संदेशहर तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिद्ध करील’, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे, तोच तो आहे. मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानपेक्षा मोठा कोणी नाही, तरीही देवाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.” जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचा संदेश ऐकून परमेश्‍वराचे समर्थन केले कारण त्यांनी योहानचा बाप्तिस्मा घेतला होता. परंतु परुशी व शास्त्री ह्यांनी त्यांच्यासंबंधी असलेली देवाची योजना फोल ठरवली कारण त्यांनी त्याच्याकडून बाप्तिस्मा घेतला नव्हता. येशू पुढे म्हणाला, “ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत? जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत. ती म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही रडला नाहीत.’ बाप्तिस्मा देणारा योहान भाकर खात किंवा द्राक्षारस पीत आला नाही आणि तुम्ही म्हणता त्याला भूत लागले आहे. मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाड व दारुडा, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र! परंतु सुज्ञता स्वीकारणारे त्या सुज्ञतेची सत्यता स्वतःच्या जीवनाद्वारे सिद्ध करतात.” परुश्यातील एकाने येशूला आपल्या घरी भोजन करण्याची विनंती केली. तो त्या परुश्याच्या घरी जाऊन भोजनास बसला. त्या गावात एक पापी स्त्री होती. तो परुश्याच्या घरात जेवायला बसला आहे, हे ऐकून ती अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायांजवळ रडत उभी राहिली व तिच्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने तिच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. ज्या परुश्याने त्याला बोलाविले होते, त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता, तर आपल्याला स्पर्श करत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.” येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरुजी, बोला.” “एका सावकाराचे दोन कर्जदार होते”, येशूने बोलायला सुरुवात केली. “एकाने पाचशे चांदीची नाणी तर दुसऱ्याने पन्नास चांदीची नाणी कर्ज घेतले होते. कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांचे कर्ज माफ केले. तर त्यांच्यातील कोणता माणूस त्याच्यावर अधिक प्रीती करील?” शिमोनने उत्तर दिले, “मला वाटते, ज्याचे कर्ज जास्त होते तो.” मग तो त्याला म्हणाला, “बरोबर आहे तुझा निर्णय.” तेव्हा येशूने त्या स्त्रीकडे वळून शिमोनला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो, तेव्हा तुम्ही मला पाय घुण्यासाठी पाणी दिले नाही. परंतु हिने तर आसवांनी माझे पाय भिजवून तिच्या केसांनी ते पुसले. तुम्ही चुंबनाने माझे स्वागत केले नाही. परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला ऑलिव्ह तेल लावले नाही. परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले. म्हणून मी तुम्हांला सांगतो, हिची पापे पुष्कळ असूनही त्यांची तिला क्षमा करण्यात आली आहे; कारण तिची प्रीती महान आहे. परंतु ज्याला थोडी क्षमा मिळाली आहे, तो थोडी प्रीती करतो.” मग त्याने तिला म्हटले,”तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे.” तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा आहे तरी कोण?” त्यानंतर त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”

सामायिक करा
लूक 7 वाचा