लूक 23:27-38
लूक 23:27-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लोकांचा व स्त्रियांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला, त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा. कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही. तेव्हा ‘ते पर्वतास म्हणतील, आम्हावर पडा आणि ते टेकड्यांस म्हणतील. आम्हास झाका’ ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय?” आणि दुसरे दोघे जण अपराधी होते त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जिवे मारण्यास नेले. आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. लोक तेथे पाहत उभे होते आणि पुढारी थट्टा करून म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे! शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास आंब दिली. आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!” त्याच्यावर असे लिहिले होते “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”
लूक 23:27-38 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंच्या मागे लोकांचा प्रचंड समुदाय चालला होता. त्यांच्यामध्ये अनेक शोक करणार्या स्त्रियाही होत्या. तेव्हा येशू त्या स्त्रियांकडे वळून त्यांना म्हणाले, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण असे दिवस येत आहेत की, त्या दिवसात तुम्ही म्हणाल, ‘लेकरे न झालेल्या स्त्रिया, न प्रसवलेली उदरे व न पाजलेली स्तने धन्य आहेत.’ ” त्यावेळी, “ ‘ते पर्वतांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!” आणि टेकड्यांना म्हणतील, आम्हाला “झाकून टाका!” ’ कारण जर लोक हिरव्या वृक्षाची अशी गत करतात, तर सुकलेल्या वृक्षाचे काय होईल?” येशूंबरोबर आणखी दोन माणसे, दोघेही अपराधी होते, त्यांनाही जिवे मारण्याकरिता नेण्यात आले. जेव्हा ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तिथे त्यांनी त्याला अपराध्यांबरोबर क्रूसावर खिळले, एक त्यांच्या उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. तेव्हा येशू म्हणाले, “हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही.” आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली. लोक उभे राहून पाहत होते आणि शासक त्यांची थट्टा करीत होते. ते म्हणत होते, “त्याने दुसर्यांचे तारण केले, तो परमेश्वराचा निवडलेला म्हणजे ख्रिस्त असेल तर त्याने स्वतःचा बचाव करावा.” सैनिकांनीही त्यांना शिरक्यात भिजविलेला आंब पिण्यास दिला आणि त्यांचा उपहास केला. ते त्याला म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.” त्यांच्या डोक्याच्या वर एक लेखपत्रक लावण्यात आले. त्यावर लिहिले होते: हा यहूद्यांचा राजा आहे.
लूक 23:27-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याच्यामागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण पाहा, असे दिवस येतील की ज्यांत वांझ, न प्रसवलेली उदरे, व न पाजलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील. त्या समयी ते ‘पर्वतांना म्हणू लागतील, आमच्यावर पडा, व टेकड्यांना म्हणतील, आम्हांला झाका.’ ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय होईल?” त्याच्याबरोबर दुसर्या दोघा जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खिळण्यासाठी नेले. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभांवर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” नंतर त्याची ‘वस्त्रे आपसांत वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.’ लोक ‘पाहत’ उभे होते; अधिकारीही ‘नाक मुरडत म्हणाले,’ “त्याने दुसर्यांना वाचवले, जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःस वाचवावे.” शिपायांनीही जवळ येऊन ‘आंब’ त्याच्यापुढे धरून, त्याची अशी थट्टा केली की, “तू यहूद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव.” हा यहूद्यांचा राजा आहे, असा [हेल्लेणी, रोमी, व इब्री अक्षरांत लिहिलेला] एक लेखही त्याच्या वरती होता.
लूक 23:27-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो, यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. पाहा, असे दिवस येतील की, त्या वेळी लोक म्हणतील, ‘ज्यांनी मुले प्रसवली नाहीत व ज्यांनी मुलांना स्तनपान केले नाही त्या स्त्रिया धन्य आहेत.’ त्या समयी लोक पर्वतांना म्हणतील, ‘आमच्यावर पडा’, व टेकड्यांना म्हणतील, ‘आम्हांला झाका.’ ओल्या झाडाला असे करतात, तर वाळलेल्याचे काय होईल?” येशूबरोबर दुसऱ्या दोघा जणांना ते अपराधी असल्यामुळे क्रुसावर खिळण्यासाठी नेले. ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा त्यांनी येशूला व त्या अपराध्यांना, एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे असे क्रुसावर खिळले. [तेव्हा येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.” त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.] लोक पाहत उभे होते. अधिकारीही कुचेष्टा करीत म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे.” शिपायांनीही जवळ येऊन, आंब त्याच्यापुढे धरून त्याचा उपहास केला, “तू यहुदी लोकांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.” ‘हा यहुदी लोकांचा राजा आहे’, अशी पाटीदेखील येशूच्या क्रुसावर लावली होती.