YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 23:27-38

लूक 23:27-38 MACLBSI

येशूच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो, यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. पाहा, असे दिवस येतील की, त्या वेळी लोक म्हणतील, ‘ज्यांनी मुले प्रसवली नाहीत व ज्यांनी मुलांना स्तनपान केले नाही त्या स्त्रिया धन्य आहेत.’ त्या समयी लोक पर्वतांना म्हणतील, ‘आमच्यावर पडा’, व टेकड्यांना म्हणतील, ‘आम्हांला झाका.’ ओल्या झाडाला असे करतात, तर वाळलेल्याचे काय होईल?” येशूबरोबर दुसऱ्या दोघा जणांना ते अपराधी असल्यामुळे क्रुसावर खिळण्यासाठी नेले. ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा त्यांनी येशूला व त्या अपराध्यांना, एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे असे क्रुसावर खिळले. [तेव्हा येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.” त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.] लोक पाहत उभे होते. अधिकारीही कुचेष्टा करीत म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे.” शिपायांनीही जवळ येऊन, आंब त्याच्यापुढे धरून त्याचा उपहास केला, “तू यहुदी लोकांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.” ‘हा यहुदी लोकांचा राजा आहे’, अशी पाटीदेखील येशूच्या क्रुसावर लावली होती.