लूक 23:26-56
लूक 23:26-56 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते त्यास घेऊन जात असताना, कुरेनेकर शिमोन नावाचा कोणीएक शेतावरून येत होता त्यांनी त्यास धरले व त्याने येशूच्या मागे चालून वधस्तंभ वाहावा म्हणून तो त्याच्यावर ठेवला. लोकांचा व स्त्रियांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला, त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा. कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही. तेव्हा ‘ते पर्वतास म्हणतील, आम्हावर पडा आणि ते टेकड्यांस म्हणतील. आम्हास झाका’ ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय?” आणि दुसरे दोघे जण अपराधी होते त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जिवे मारण्यास नेले. आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. लोक तेथे पाहत उभे होते आणि पुढारी थट्टा करून म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे! शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास आंब दिली. आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!” त्याच्यावर असे लिहिले होते “हा यहूदी लोकांचा राजा आहे.” तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव! पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. पण आपली शिक्षा योग्य आहे कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही.” नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.” येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.” त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही. आणि परमेश्वराच्या भवनातील पडदा मधोमध फाटला आणि त्याचे दोन भाग झाले. येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे बोलून त्याने प्राण सोडून दिला. जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.” हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले. परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालील प्रांताहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या. तेथे योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद व चांगला आणि नीतिमान मनुष्य होता. त्याने त्याच्या कामाला व विचारला संमती दिली नव्हती. तो यहूदीया प्रांतातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ सुरु होणार होता. गालील प्रांताहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केला. शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.
लूक 23:26-56 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते येशूंना घेऊन जात असताना, कुरेने गावचा रहिवासी शिमोन नावाचा एक मनुष्य रानातून परत येत होता. त्याला त्यांनी धरले व येशूंचा क्रूसखांब त्याच्यावर ठेवला व त्याला तो येशूंच्या मागोमाग वाहून नेण्यास भाग पाडले. येशूंच्या मागे लोकांचा प्रचंड समुदाय चालला होता. त्यांच्यामध्ये अनेक शोक करणार्या स्त्रियाही होत्या. तेव्हा येशू त्या स्त्रियांकडे वळून त्यांना म्हणाले, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण असे दिवस येत आहेत की, त्या दिवसात तुम्ही म्हणाल, ‘लेकरे न झालेल्या स्त्रिया, न प्रसवलेली उदरे व न पाजलेली स्तने धन्य आहेत.’ ” त्यावेळी, “ ‘ते पर्वतांना म्हणतील, “आमच्यावर येऊन पडा!” आणि टेकड्यांना म्हणतील, आम्हाला “झाकून टाका!” ’ कारण जर लोक हिरव्या वृक्षाची अशी गत करतात, तर सुकलेल्या वृक्षाचे काय होईल?” येशूंबरोबर आणखी दोन माणसे, दोघेही अपराधी होते, त्यांनाही जिवे मारण्याकरिता नेण्यात आले. जेव्हा ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तिथे त्यांनी त्याला अपराध्यांबरोबर क्रूसावर खिळले, एक त्यांच्या उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. तेव्हा येशू म्हणाले, “हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही.” आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली. लोक उभे राहून पाहत होते आणि शासक त्यांची थट्टा करीत होते. ते म्हणत होते, “त्याने दुसर्यांचे तारण केले, तो परमेश्वराचा निवडलेला म्हणजे ख्रिस्त असेल तर त्याने स्वतःचा बचाव करावा.” सैनिकांनीही त्यांना शिरक्यात भिजविलेला आंब पिण्यास दिला आणि त्यांचा उपहास केला. ते त्याला म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.” त्यांच्या डोक्याच्या वर एक लेखपत्रक लावण्यात आले. त्यावर लिहिले होते: हा यहूद्यांचा राजा आहे. गुन्हेगारांपैकी एकजण त्यांची निंदा करून म्हणाला, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव.” पण दुसर्या गुन्हेगाराने पहिल्याला दटावून म्हटले, “तुला परमेश्वराचे भय वाटत नाही काय, तू सुद्धा तीच शिक्षा भोगीत आहेस? आपल्या दुष्ट कृत्यांमुळे आपणास झालेली मरणाची शिक्षा अगदी यथायोग्य आहे. पण याने तर काहीही चूक केली नाही.” मग तो येशूंना म्हणाला, “अहो येशू, आपण आपल्या राज्यात याल, तेव्हा माझी आठवण ठेवा.” येशूंनी त्याला उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.” आता दुपारची वेळ झाली होती, आणि संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. सूर्यप्रकाश देण्याचे थांबला. मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला. तेव्हा येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारून म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो.” हे शब्द बोलल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. काय घडले हे पाहून रोमी शताधिपतीने परमेश्वराचे गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.” क्रूसावर खिळण्याचा प्रसंग पाहण्याकरिता आलेल्या जमावाने घडलेल्या घटना पाहिल्या, तेव्हा ते शोकाकुल होऊन छाती बडवित घरी परतले. परंतु जे सर्व येशूंना ओळखत होते, त्यामध्ये गालीलाहून त्यांच्यामागे आलेल्या अनेक स्त्रिया काही अंतरावर थांबल्या आणि या गोष्टी पाहत होत्या. यहूदीयातील अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून चांगला व नीतिमान होता. त्याने त्यांच्या या निर्णयाला आणि कारवाईला संमती दिली नव्हती. तो यहूदीयातील अरिमथिया नगरातून आला असून, तो स्वतः परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता. पिलाताकडे जाऊन त्याने येशूंचे शरीर मिळण्यासाठी विनंती केली. त्याने येशूंचे शरीर क्रूसावरून खाली घेतले आणि ते तागाच्या वस्त्रात गुंडाळून खडकात खोदलेल्या एका कबरेत ठेवले, ज्यामध्ये आतापर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. हे सर्व संस्कार शब्बाथाची तयारी करण्याच्या दिवशी करण्यात आले. येशूंबरोबर गालीलाहून आलेल्या स्त्रियांनी मागोमाग येऊन ती कबर पाहिली आणि येशूंचे शरीर कबरेत कसे ठेवले हे पाहिले. नंतर त्या घरी गेल्या आणि त्यांनी मसाले आणि सुगंधी द्रव्ये तयार केली. परंतु यहूदी नियमशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी शब्बाथाच्या दिवशी विसावा घेतला.
लूक 23:26-56 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणीएक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावले. तेव्हा त्याच्यामागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण पाहा, असे दिवस येतील की ज्यांत वांझ, न प्रसवलेली उदरे, व न पाजलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील. त्या समयी ते ‘पर्वतांना म्हणू लागतील, आमच्यावर पडा, व टेकड्यांना म्हणतील, आम्हांला झाका.’ ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय होईल?” त्याच्याबरोबर दुसर्या दोघा जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खिळण्यासाठी नेले. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभांवर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” नंतर त्याची ‘वस्त्रे आपसांत वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.’ लोक ‘पाहत’ उभे होते; अधिकारीही ‘नाक मुरडत म्हणाले,’ “त्याने दुसर्यांना वाचवले, जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःस वाचवावे.” शिपायांनीही जवळ येऊन ‘आंब’ त्याच्यापुढे धरून, त्याची अशी थट्टा केली की, “तू यहूद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव.” हा यहूद्यांचा राजा आहे, असा [हेल्लेणी, रोमी, व इब्री अक्षरांत लिहिलेला] एक लेखही त्याच्या वरती होता. वधस्तंभांवर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव.” परंतु दुसर्याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत; परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही.” मग तो म्हणाला, “अहो येशू,1 आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” आता सुमारे दोन प्रहर झाले, आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तिसर्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला; आणि पवित्रस्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!” असे बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.” हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले. तेव्हा त्याच्या ‘ओळखीचे’ सर्व जण व ज्या स्त्रिया त्याच्यामागे गालीलाहून आल्या होत्या त्या हे पाहत ‘दूर उभ्या राहिल्या होत्या.’ यहूद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन व नीतिमान होता. त्याने त्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करत होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. ते त्याने खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंडाळले व खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ह्या कबरेत अद्याप कोणाला ठेवले नव्हते. तो तयारी करण्याचा दिवस होता; आणि शब्बाथ सुरू होणार होता. गालीलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्यामागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. शब्बाथ दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या.
लूक 23:26-56 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शिपाई येशूला घेऊन जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर माणूस गावातून शहराकडे जात होता. त्याला त्यांनी वेठीस धरून त्याच्यावर क्रूस लादला आणि त्याला तो येशूच्या मागे वाहण्यास लावले. येशूच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो, यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. पाहा, असे दिवस येतील की, त्या वेळी लोक म्हणतील, ‘ज्यांनी मुले प्रसवली नाहीत व ज्यांनी मुलांना स्तनपान केले नाही त्या स्त्रिया धन्य आहेत.’ त्या समयी लोक पर्वतांना म्हणतील, ‘आमच्यावर पडा’, व टेकड्यांना म्हणतील, ‘आम्हांला झाका.’ ओल्या झाडाला असे करतात, तर वाळलेल्याचे काय होईल?” येशूबरोबर दुसऱ्या दोघा जणांना ते अपराधी असल्यामुळे क्रुसावर खिळण्यासाठी नेले. ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा त्यांनी येशूला व त्या अपराध्यांना, एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे असे क्रुसावर खिळले. [तेव्हा येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.” त्यानंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.] लोक पाहत उभे होते. अधिकारीही कुचेष्टा करीत म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे.” शिपायांनीही जवळ येऊन, आंब त्याच्यापुढे धरून त्याचा उपहास केला, “तू यहुदी लोकांचा राजा असशील तर स्वतःला वाचव.” ‘हा यहुदी लोकांचा राजा आहे’, अशी पाटीदेखील येशूच्या क्रुसावर लावली होती. क्रुसावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करीत म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला व आम्हांला वाचव.” परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता, तू देवालासुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय्य आहे कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत. परंतु ह्याने काही अपराध केला नाही.” तो पुढे म्हणाला, “हे येशू, तू तुझ्या राजाधिकाराने येशील, तेव्हा माझी आठवण ठेव.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला खातरीने सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” दुपारी सुमारे बाराची वेळ झाली आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला. पवित्र स्थानातील पडदा मधोमध दुभंगला. मग येशूने मोठ्याने आरोळी मारत म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो,” असे बोलून येशूने प्राण सोडला. तेव्हा जे घडले, ते पाहून सैन्याधिकाऱ्याने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा एक नीतिमान मनुष्य होता.” बघण्याकरता जमलेले सर्व लोक जे काही घडले ते पाहून दुःखाने ऊर बडवीत परत गेले. ज्या स्त्रिया येशूच्या मागे गालीलहून आल्या होत्या त्यांच्यासह येशूला व्यक्तिशः ओळखणारे सर्व जण हे पाहत दूर उभे राहिले होते. तेथे यहुदियातील अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक सज्जन व प्रतिष्ठित मनुष्य होता. तो देवराज्याची प्रतीक्षा करीत होता. जरी तो न्यायसभेचा सदस्य होता, तरी त्याने यहुदी लोकांच्या निर्णयाला व कृत्याला दुजोरा दिला नव्हता. त्याने पिलातकडे जाऊन येशूचा मृतदेह मागितला. मग तो त्याने खाली काढून तागाच्या कापडात गुंडाळला व खडकात खोदलेल्या कबरीत ठेवला. ह्या कबरीत अद्याप कोणाला ठेवले नव्हते. साबाथची तयारी करण्याचा तो दिवस होता आणि साबाथ सुरू होणार होता. गालीलहून येशूबरोबर आलेल्या स्त्रियांनी योसेफच्या बरोबर जाऊन ती कबर पाहिली व येशूचा मृतदेह कसा ठेवला हेही पाहिले. त्यानंतर त्यांनी घरी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. नियमशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे साबाथ दिवशी त्यांनी विश्रांती घेतली.