लूक 21:5-24
लूक 21:5-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मंदिर उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी कित्येक जण बोलत असता त्याने म्हटले, “असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहात त्यांतला पाडला जाणार नाही असा चिर्यावर चिरा राहणार नाही.” तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, ह्या गोष्टी केव्हा घडून येतील? आणि ज्या काळात ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय?” तो म्हणाला, “तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा; कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन ‘मीच तो आहे’ आणि ‘तो काळ जवळ आला आहे,’ असे म्हणतील; त्यांच्या नादी लागू नका. आणि जेव्हा तुम्ही लढाया व दंगे ह्यांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका; कारण ह्या गोष्टी प्रथम ‘होणे अवश्य आहे’, तरी एवढ्यात शेवट होणार नाही.” मग त्याने त्यांना म्हटले, “‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल; मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मर्या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात होतील व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील; तुम्हांला सभास्थाने व तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील, आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नावासाठी नेतील. ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही असा मनाचा निर्धार करा; कारण मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हेदेखील तुम्हांला धरून देतील; आणि तुमच्यातील कित्येकांना जिवे मारतील, आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील; तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल. परंतु यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे तिच्या शिवारात असतील त्यांनी आत येऊ नये. कारण शास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे ‘सूड घेण्याचे दिवस’ आहेत. त्या दिवसांत ज्या गरोदर व अंगावर पाजणार्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल. ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.’
लूक 21:5-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिष्यातील काहीजण परमेश्वराच्या भवनाविषयी असे बोलत होते की, “ते सुंदर दगडांनी आणि अर्पणांनी सुशोभित केले आहे.” येशू म्हणाला, “असे दिवस येतील की, हे जे तुम्ही पाहता त्यांतून जो पाडून टाकला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही.” त्यांनी त्यास प्रश्न विचारला, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?” येशू म्हणाला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि ‘तो मी आहे’ असे म्हणतील आणि ते म्हणतील, ‘वेळ जवळ आली आहे. त्यांच्यामागे जाऊ नका!’ जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.” मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल. मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हास सभास्थानासमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हास राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील. यामुळे तुम्हास माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही अशी मनाची तयारी करा, कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही. परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हापैकी काही जणांना ठार मारतील. माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवून घ्याल. तुम्ही जेव्हा यरूशलेम शहरास सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हास कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे. जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये. ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. त्या दिवसात ज्या गरोदर स्त्रिया आहेत व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर क्रोध येईल. ते तलवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना कैद करून राष्ट्रांत नेतील आणि परराष्ट्रीय लोकांचा काळ संपेपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेम शहरास पायाखाली तुडवतील.
लूक 21:5-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांचे काही शिष्य मंदिराबद्दल प्रशंसा करीत होते की, ते कसे सुंदर पाषाणांनी आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या देणग्यांनी सजविले आहे. परंतु येशू म्हणाले, “जे तुम्ही पाहत आहात, पण अशी वेळ येत आहे की, त्यावेळेस एकावर एक स्थापित असा एकही दगड राहणार नाही; त्यांच्यामधील प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.” “गुरुजी,” शिष्यांनी विचारले, “या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी होण्याच्या सुमारास काय चिन्हे असतील?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही फसविले जाऊ नये म्हणून सावध राहा, कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मीच तो आहे,’ असा दावा करतील. ते म्हणतील ‘काळ जवळ आला आहे,’ त्यांच्यामागे जाऊ नका. तुम्ही लढायासंबंधी ऐकाल व दंगे याविषयी ऐकाल, तेव्हा भयभीत होऊ नका. प्रथम या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट एवढ्यात होणार नाही.” मग त्यांनी म्हटले: “राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी साथीचे रोग उद्भवतील, भीतिदायक घटना आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील. “तरी हे सर्व घडण्यापूर्वी, ते तुम्हाला पकडून तुमचा छळ करतील. माझ्या नावामुळे तुम्हाला सभागृहामध्ये नेतील व तुरुंगात टाकतील आणि तुम्हाला राज्यपाल आणि राजे यांच्यापुढे आणण्यात येईल. यामुळे तुम्हाला त्यांच्यापुढे माझे साक्षी व्हावे लागेल. तेव्हा स्वतःचा बचाव कसा करावा व काय बोलावे याविषयी आधी चिंता करू नका. कारण मी तुम्हाला योग्य शब्द आणि सुज्ञपणाचे विचार सुचवेन की ज्यास तुमचे शत्रू तुम्हाला अडविण्यास किंवा त्याचे खंडन करण्यास असमर्थ ठरतील. आईवडील, भाऊ आणि बहीण, नातेवाईक आणि मित्र, देखील तुमचा विश्वासघात करतील व तुम्हापैकी काहींना जिवे मारतील. माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु तुमच्या डोक्यावरील एका केसाचा देखील नाश होणार नाही. खंबीरपणे उभे राहा, म्हणजे जीवन मिळवाल. “तुम्ही यरुशलेम शहर शत्रुसैन्यांनी वेढलेले पाहाल, तेव्हा त्याचा विनाशकाळ जवळ आला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे, जे शहरात आहेत त्यांनी ते सोडावे आणि जे बाहेर रानात आहेत, त्यांनी शहरात येण्याचा प्रयत्न करू नये. कारण आता जे सर्व लिहिलेले आहे ते पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. गर्भवती आणि दूध पाजणार्या स्त्रियांसाठी तर तो काळ क्लेशाचा असेल! कारण पृथ्वीवर महान संकटे कोसळतील आणि लोकांवर क्रोधाचा वर्षाव होईल. काही तलवारीमुळे पडतील आणि काहींना सर्व राष्ट्रांमध्ये कैद करून नेण्यात येईल आणि गैरयहूदीयांचा काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेम शहरास गैरयहूदी पायाखाली तुडवतील.
लूक 21:5-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सुरेख दगडांनी व देवाला समर्पित केलेल्या भेटवस्तूंनी मंदिर कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी कित्येक जण बोलत होते. येशू म्हणाला, “असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहात त्यातला पाडला जाणार नाही असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही.” तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरुवर्य, ह्या गोष्टी केव्हा घडतील? ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील, त्या काळाचे चिन्ह काय?” तो म्हणाला, “तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मी तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे, असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका. जेव्हा तुम्ही लढाया व बंड यांच्याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका कारण ह्या गोष्टी प्रथम होणे आवश्यक आहे. तथापि एवढ्यात शेवट होत नाही.” तो पुढे म्हणाला, “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल. मोठमोठे भूकंप होतील. जागोजागी साथी येतील व दुष्काळ पडतील. भयंकर उत्पात व आकाशात महान चिन्हे घडून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील. तुमचा छळ करतील. तुम्हांला चौकशीसाठी सभास्थानांच्या स्वाधीन करतील. तुरुंगात डांबतील. माझ्या नावाकरिता राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे हजर करतील. ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल. त्या वेळी उत्तर कसे द्यावे, ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही, असा मनाचा निर्धार करा. मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की, तिला रोखण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हेदेखील तुम्हांला धरून देतील. तुमच्यांतील कित्येकांना ठार मारतील. माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तरीदेखील तुमच्या डोक्यावरचा एक केसही गळणार नाही. टिकून राहा म्हणजे तुम्ही स्वतःचा बचाव कराल. मात्र यरुशलेम नगरीस सैन्यांचा वेढा पडत आहे, असे तुम्ही पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे, असे समजा. त्या समयी जे यहुदियात असतील, त्यांनी डोंगरात पळून जावे. जे यरुशलेममध्ये असतील, त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारात असतील त्यांनी नगराच्या आत येऊ नये. धर्मशास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे न्यायनिवाड्याचे दिवस असतील. त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर व अंगावर पाजणाऱ्या असतील, त्यांची केवढी दुर्दशा होणार! देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल. काही तलवारीच्या धारेला बळी पडतील आणि इतरांना बंदिवान करून अन्य राष्ट्रांमध्ये नेण्यात येईल. परराष्ट्रीयांचे वर्चस्व संपुष्टात येईल. तोवर परराष्ट्रीय यरुशलेम नगरास पायांखाली तुडवतील.