YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 21:5-24

लूक 21:5-24 MRCV

त्यांचे काही शिष्य मंदिराबद्दल प्रशंसा करीत होते की, ते कसे सुंदर पाषाणांनी आणि परमेश्वराला अर्पण केलेल्या देणग्यांनी सजविले आहे. परंतु येशू म्हणाले, “जे तुम्ही पाहत आहात, पण अशी वेळ येत आहे की, त्यावेळेस एकावर एक स्थापित असा एकही दगड राहणार नाही; त्यांच्यामधील प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.” “गुरुजी,” शिष्यांनी विचारले, “या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी होण्याच्या सुमारास काय चिन्हे असतील?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही फसविले जाऊ नये म्हणून सावध राहा, कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मीच तो आहे,’ असा दावा करतील. ते म्हणतील ‘काळ जवळ आला आहे,’ त्यांच्यामागे जाऊ नका. तुम्ही लढायासंबंधी ऐकाल व दंगे याविषयी ऐकाल, तेव्हा भयभीत होऊ नका. प्रथम या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट एवढ्यात होणार नाही.” मग त्यांनी म्हटले: “राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी साथीचे रोग उद्भवतील, भीतिदायक घटना आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील. “तरी हे सर्व घडण्यापूर्वी, ते तुम्हाला पकडून तुमचा छळ करतील. माझ्या नावामुळे तुम्हाला सभागृहामध्ये नेतील व तुरुंगात टाकतील आणि तुम्हाला राज्यपाल आणि राजे यांच्यापुढे आणण्यात येईल. यामुळे तुम्हाला त्यांच्यापुढे माझे साक्षी व्हावे लागेल. तेव्हा स्वतःचा बचाव कसा करावा व काय बोलावे याविषयी आधी चिंता करू नका. कारण मी तुम्हाला योग्य शब्द आणि सुज्ञपणाचे विचार सुचवेन की ज्यास तुमचे शत्रू तुम्हाला अडविण्यास किंवा त्याचे खंडन करण्यास असमर्थ ठरतील. आईवडील, भाऊ आणि बहीण, नातेवाईक आणि मित्र, देखील तुमचा विश्वासघात करतील व तुम्हापैकी काहींना जिवे मारतील. माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु तुमच्या डोक्यावरील एका केसाचा देखील नाश होणार नाही. खंबीरपणे उभे राहा, म्हणजे जीवन मिळवाल. “तुम्ही यरुशलेम शहर शत्रुसैन्यांनी वेढलेले पाहाल, तेव्हा त्याचा विनाशकाळ जवळ आला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे, जे शहरात आहेत त्यांनी ते सोडावे आणि जे बाहेर रानात आहेत, त्यांनी शहरात येण्याचा प्रयत्न करू नये. कारण आता जे सर्व लिहिलेले आहे ते पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. गर्भवती आणि दूध पाजणार्‍या स्त्रियांसाठी तर तो काळ क्लेशाचा असेल! कारण पृथ्वीवर महान संकटे कोसळतील आणि लोकांवर क्रोधाचा वर्षाव होईल. काही तलवारीमुळे पडतील आणि काहींना सर्व राष्ट्रांमध्ये कैद करून नेण्यात येईल आणि गैरयहूदीयांचा काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेम शहरास गैरयहूदी पायाखाली तुडवतील.